महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,598

भारतातली पहिली सर्कस

Views: 1396
6 Min Read

भारतातली पहिली सर्कस | सर्कशीच्या गावात…

भारतातली पहिली सर्कस सुरू करण्याचा मान विष्णूपंत मोरेश्वर छत्रे यांच्याकडे जातो, अशी इतिहासात नोंद आहे. छत्रे यांच्या ग्रँड इंडियन सर्कशीचा पहिला खेळ २६ नोव्हेंबर १८८२ रोजी मुंबईतील क्रॉस मैदानावर झाला, मात्र त्याआधी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावातील यशवंतराव गंगाराम मोरे यांची ग्रँड इंडियन सर्कस अस्तित्वात होती. ही सर्कस १८८१ मध्ये सुरू झाल्याचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे.

वडगाव पान हे गाव पूर्वी विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध होतं, नंतर त्याला नावलौकिक प्राप्त झाला तो सर्कशींमुळे. तब्बल पाच सर्कशी या गावानं दिल्या. इंग्रजांविरोधात लढा उभारणारे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या निमगाव जाळीजवळच नगर-संगमनेर रस्त्यावर वडगाव पान गाव आहे. संगमनेरचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. विठ्ठलराव शेवाळे, सरदार घराण्यातील विजयराव थोरात यांच्याबरोबर वडगाव पानला भेट दिली. गाव आता बरचंस बदललेलं. जुन्या खाणाखुणा मिरवणारे थोडेच वाडे उरलेले. त्यातील काहींना कुलूप लागलेले. मोरे यांच्या वंशजांपैकी सुभाष संपतराव मोरे आणि आबासाहेब संपतराव मोरे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. आबासाहेब हे ग्रँड इंडियन सर्कशीचे संस्थापक यशवंतराव यांचे पणतू. आता त्यांचं वय ७१ आहे. मोरे यांच्या तिसर्‍या पिढीपर्यंत ही सर्कस चालू होती.

“माझ्या आजोबांच्या काळात सर्कस वैभवाच्या शिखरावर होती. माझ्या वडिलांनी १९६५ पर्यंत ती अतिशय चांगल्या प्रकारे चालवली. दरम्यानच्या काळात मनोरंजनाची नवी माध्यमं आल्यामुळं सगळ्याच सर्कशींना उतरती कळा लागली. त्यामुळं वडिलांनी दाक्षिणात्य मंडळींना सर्कस देऊन गावी परत येत शेती कसायला सुरूवात केली. लहानपणी सर्कशीतले हत्ती, वाघ, सिंह, चित्ते, अस्वल, घोडे पाहिल्याचं मला आठवतं. विजयादशमीच्या मुहूर्तावर वडगाव पानमधून सर्कशीचा ताफा निघे. सर्कशीत काम करणारी बरीचशी मंडळी आमच्या गावातलीच होती. मुख्य तंबू दोन खांबी होता. तंबू शिवणारे, दोर लावणारे कारागीरही वडगाव पानचेच होते. शंभरावर बैलगाड्या जुंपून हा ताफा एका गावाहून दुसर्‍या गावी जात असे. वाघ, सिंहांचे पिंजरे बैलगाडीवर ठेवलेले असत. ज्या भागात पाऊस कमी, तिथं सर्कशीचा मुक्काम असे. सगळेजण एखाद्या कुटुंबासारखे एकत्र राहात. दामू धोत्रे यांचे भाऊ कृष्णा धोत्रे आमच्याच सर्कशीत होते,” अशी आठवण आबासाहेब मोरे यांनी सांगितली.

सर्कस चालवणं सोप्पं नव्हतं. नदीपात्रात तंबू ठोकल्यानंतर कधी मुसळधार पाऊस सुरू होऊन पुराच्या पाण्याचा तडाखा बसे. एकदा धांदरफळला सर्कसचा मुक्काम असताना वाघाकडून एकजण मारला गेला होता.

संपतराव मोरे हे सर्कशीचे शेवटचे मालक. जिल्हा लोकल बोर्डाचेही ते सदस्य होते. शेतकरी कामगार पक्षाबद्दल त्यांना आस्था होती. सूट-बुटातले रूबाबदार संपतराव गुलाबी फेटा बांधत. ते अतिशय नम्र होते. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहात. वयानं लहान असणार्‍यांनाही नमस्कार करत. गरजूंना मदत करताना त्यांनी हात कधी आखडता घेतला नाही. भेटायला कुणी आलं, की सर्कशीच्या आठवणी सांगण्यात ते रमून जात. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. त्यांच्या आठवणी नोंदवून ठेवायला हव्या होत्या. ९ एप्रिल २००४ रोजी संपतरावांचं निधन झालं.

मोरे सर्कशीचं नाव नंतर बदललं गेलं. नंतरही या सागर सर्कसचे खेळ संगमनेर आणि नगर जिल्ह्यात झाले. तथापि, नंतरच्या काळात सरकारचं धोरण बदलत जाऊन अनेक निर्बंध लादले गेले. वन्यश्वापदांचा वापर करण्यावर बंदी आली. मुख्य आकर्षण असलेले वाघ-सिंहाचे खेळ नसल्यानं मग बालगोपाळांना सर्कसमध्ये रूची राहिली नाही. फक्त कसरतीचे खेळ लोकांना कितीवेळ खिळवून ठेवणार ? शेवटी सर्कशी बंद पडत गेल्या. लोककलावंत, तमाशा कलावंतांना शासन मानधन देतं. सर्कसमधील मंडळींच्या वाट्याला तेही आलं नाही. नाटक, चित्रपटांना सरकार अनुदान देतं. केरळ सरकारनं तिथल्या सर्कसवाल्यांसाठी मदत दिली, प्रशिक्षण केंद्र चालू केलं. महाराष्ट्रात मात्र हे घडलं नाही.

यशवंतराव मोरे यांचं वास्तव्य असलेलं मूळ घर आता वडगाव पानमध्ये राहिलेलं नाही. त्यांच्या मुलानं बांधलेला वाडा मात्र नंतरच्या पिढ्यांनी छान जपला आहे. समोर भव्य पटांगण आणि प्राचीन मंदिर असलेला मोरे यांचा सध्याचा शंभर खणी वाडा पाहण्यासारखा आहे. वाड्यात चौक आहे. १०० पोती धान्य साठवता येतील इतकं मोठं पेव आहे.

वाड्याच्या दर्शनी बाजूला असलेल्या लोखंडी कड्या जनावरं बांधण्यासाठी असाव्यात. समोरची खिडकी पिंजरा असावी, इतकी मोठी आहे. कदाचित वडगाव पानमध्ये सर्कशीचा मुक्काम असताना वाघ, सिंह या खिडकीत येऊन बसत असावेत. उघड्यावर असलेल्या वाघ, सिंहाचे फोटो मोरे कुटुंबाकडे पहायला मिळाले. दुमजली वाड्याच्या वरच्या बाजूला कोपर्‍यात सर्कशीतील रिंगमास्टरचं उठावशिल्प आहे. वाड्याच्या बैठकीत यशवंतराव गंगाराम मोरे, त्यांचे चिरंजीव काशीनाथराव मोरे, नातू संपतराव मोरे यांच्या तसबिरी आहेत. जुन्या छायाचित्रांचा अल्बम आणि बातमीचं कात्रणही जपून ठेवण्यात आलं आहे.

आबासाहेबांनी आम्हाला वाडा दाखवला. दर्शनी बाजूला असलेलं उठावशिल्प नीट दिसत नसल्यानं वाड्याच्या माळवदावरून (गच्ची) फोटो टिपता येतो का म्हणून वर गेलो. फोटो नाही घेता आला जवळून, पण  सर्कशीत वापरायची छोटी तोफ आणि तेव्हाचे आरसे पहाता आले. खर्‍या तोफेसारखा त्यातून बारही उडवता येत असे. एक होती लोखंडी आणि दुसरी भरभक्कम पितळी. बहुदा पोपटाच्या खेळात या तोफा वापरल्या जात असाव्यात.

मोरे यांच्या वाड्यातून निघताना आणखी एका गोष्टीची माहिती मिळाली. वाड्याशेजारी शिकारखाना म्हणून ओळखली जाणारी जागा असल्याचं मोरे यांच्या बोलण्यात आलं होतं. शिकारखाना पहायची उत्सुकता होती. त्या शिकारखान्यात एक मोलाचा ठेवा पहायला मिळाला. तो म्हणजे मोरे यांच्या ग्रँड सर्कसमधल्या वाघ, सिंहासाठी तयार केलेला पिंजरा! उन, वारा आणि पावसाच्या मारा सहन करणारा तो पिंजरा आता रिकामा असला, तरी मला त्यात माझ्या लहानपणी पाहिलेले वाघ, सिंह दिसत होते. रिंगमास्टरच्या एका इशार्‍यानिशी स्टूलवर चढून बसणारे वाघोबा, विदुषकाचं मुंडकं आपल्या उघड्या जबड्यात सुरक्षित ठेवणारा सिंह, मूड नसला तर मनमानी करत डरकाळी फोडणारा वाघोबा…सर्कशीचे ते रम्य दिवस डोळ्यासमोरून सरकून गेले.

मोरे यांची ग्रँड इंडियन सर्कस इतिहासजमा होऊन कित्येक दशकं उलटली. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमधून पाच सर्कशी निर्माण झाल्या यावर पुढच्या पिढ्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही. सर्कशीत काम करणारे काहीजण वडगाव पानमध्ये अजून आहेत. त्यांची भेट मात्र वेळेअभावी घेता आली नाही…

नगर जिल्ह्याचा इतिहास नव्यानं लिहिला जाईल, तेव्हा त्यात एक सोनेरी पान वडगाव पानच्या या सर्कशींचं असायला हवं…

भूषण देशमुख

Leave a Comment