फारूकी काळातील शासनव्यवस्था –
सुलतान हा राज्यांचा प्रमुख असे आणि लष्करी आणि मुलकी विभागाचे सर्वाधिकार त्याकडे असत.फारूकी काळातील शासनव्यवस्था…
वजीर –
सुलतानानंतर सर्वात जबाबदार अधिकारी होता. त्याला राज्यांच्या सर्व कामकाजावर देखरेख ठेवावी लागे. त्यामुळे सुलतान हा जवळच्या व विश्वासपात्र व्यक्तीचीच वजीर म्हणून नेमणूक करीत असे. प्रशासनावर लक्ष ठेवणे ही जबाबदारी वजीरावर येऊन पडे. सुलताना बरोबर मुलकी, लष्करी व परराष्ट्रीय धोरण यावरही त्याचे नियंत्रण असे तर बरेचदा वजीराचा मुलगा उमदा आणि मुत्सद्दी असला तर सुलतान पदही मिळत असे. याचे उदाहरण म्हणजे स्वत: मलिकराजा हा खान जहान या दिल्ली सुलतानाच्या दरबारातील उमराव आणि बहमनी सुलतानाच्या वजीराचा मुलगा होता. सुलतान मोहिमेवर गेला असला तर राज्याची जबाबदारी ही वजीराची असे. वजीर पदावर ठेवणे दूर करून नविन नियुक्ती करणे ही सर्व सुलतानाचे अधिकार असत. सुलतान अल्पवयीन असेल तर राज्यकारभाराची जबाबदारी वजीरावर असे. सुलतान यास भेटायला येणाऱ्या साधुसंतांचा सत्कार आणि दानधर्म दोन्ही वजीर करत असत. आसफरखान, मलिक पियारू आसफखान, हासन महंमद ही काही फारुकींच्या पदरी असलेल्या प्रभावी आणि जनकल्याण करणाऱ्या वजीरांची नावे आहेत त्यापैकी आसफखान हे विद्वान होते आणि त्यांनी विविध प्रकारचे काव्यनिर्मिती केली आहे.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सुलतानाचे सल्लागार मंडळ असे त्यात अमीर, उमराव आणि वजीर यांचा समावेश होई. युध्दाच्या आणि महत्वाच्या प्रसंगी ते सुलतानाला सल्ला आणि मार्गदर्शन करीत असे.
वकिल –
फारुकी सुलतानाच्या दरबारातील पेशवा किंवा वकिल फार महत्वाचा होता.ही व्यक्ती सुध्दा सुलतानाच्या जवळची आणि विश्वासू असे. काही वेळा जर सुलतान आळशी आणि विलासी निघाला तर सर्व जबाबदारी पेशव्यांवर येऊन पडे. तर काही प्रसंगी सुलतानावर पेशव्यांचे नियंत्रण असे आणि वकिलांना सुलतानाकडे कधीही जाता येत होते. वकिल हा परराष्ट्रीय कारभार पहात असे आणि तहनामे तसेच युध्दाचा निर्णय शांतता प्रस्थापित करण्यासाठी वकिलांचा मोठा वाटा असे. सुलतानाला गुप्त बातम्या पुरवणाऱ्या हेरांवर वकिलांचे नियंत्रण असे. गुजरात मधील सुलतानाशी उद्भवलेल्या तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी तसेच तहाची बोलणी करण्यासाठी आणि खंडणी यांची चर्चा करतांना फारुकी वकिलांचे कसब पणाला लावलेले बऱ्याच घटनांवरून दिसते.
बक्षी –
यास परगण्यातील किल्ले त्यावरील लष्करी बळ ,युध्द साहित्य याची माहिती ठेवावी लागे. हिशोब ठेवणे, सैन्याचा पगार देणे शिवाय किल्ल्यावरील लष्कराचा सर्व तपशील ठेवावा लागे, युध्दाच्या वेळी दक्षता बाळगावी लागे आणि स्वत मोहिमेत भाग घेऊन गडाची पाहणी व गुप्त बातम्या सुलतानाला पुरवण्याचे काम करावे लागे.
राज्यपाल –
फारुकी काळातील राज्यपाल हा किल्ले आणि शहरांचा प्रमुख म्हणून नेमलेला असे. त्याला नियम आणि कायदे बनवण्याचा अधिकार असे. चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड देणे, बंड केलेल्या बंडखोरांना शिक्षा देणे आणि बंड मोडून काढणे. हे अधिकार राज्यपालास दिलेले होते तर बंडखोरांचा प्रभाव वाढू न देणे आणि राज्यकारभारात सुधारणा करण्यासाठी सुलतानाला मदत करणे ही राज्यपालाची जबाबदारी असे.
ठाणेदार –
खानदेशातील संरक्षण करण्यासाठी ठाणे किंवा लष्करी ठाणे हे महत्त्वाचे केंद्र होते आणि प्रत्येक ठाणे हे लष्करी प्रमुखांच्या ताब्यात होते. त्याला ठाणेदार म्हणत असत. ठाणेदाराच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशातील किल्ल्यावरील ताबा हा ठाणेदाराचाच असे. ठाणेदाराला संपूर्ण प्रदेशाचे आणि किल्ल्याचे परकिय आक्रमणापासून संरक्षण करावे लागे.
कोतवाल –
कोतवाल हा शहराचा पोलीस अधिकारी होता.त्याची जबाबदारी शहराचे चोर, दरोडेखोर आणि लुटारूकडून संरक्षण करणे हे होय. तो शहरातील वस्तूंच्या देवाणघेवाणीवर व किंमतीवर नियंत्रण ठेवीत असे. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी कोतवालाची असे तर शहरातील सरकारी तुरुंग व त्यातील गुन्हेगारांवर देखभाल तसेच नियंत्रण हे कोतवालाचे असे. चोऱ्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांना शिक्षा देणे हे त्यांचे काम असे. राजधानीच्या शहराचा प्रमुख हा कोतवाल असे.
अमीर उमराव –
फारुकी दरबारात बरेच अमीर उमराव होते ते अरब,पर्शियन,ॲबगसियन,जमातीपैकी होते.तत्कालीन राजकारणात अंतर्गत दुही माजवण्यात व गटबाजी वाढवण्यात त्हीयांचा बराच पुढाकार होता. परगणा किंवा जिल्ह्याच्या जहागिरीच्या प्रदेशाचे प्रशासन अमीरांकडे सोपवलेले होते. परगण्यातील अधिकाऱ्यांच्या मार्फत जहागिरदार किंवा सरकार कारभार चालवित असत. अमीर उमरावांच्या मदतीने फारूकी राजांनी त्यांच्या राज्यांचे संरक्षण केले.परकिय आक्रमणाच्या काळात त्यांच्या सल्ल्याने आणि मदतीने आक्रमणास तोंड देत असे. त्या अमीरांकडे विशिष्ट प्रदेशाची जहागिरी सोपवलेली असे. त्या जहागिरीच्या संरक्षण व देखभाल ही अमीरांकडे सोपवलेली असे. त्या प्रदेशातील महसूल गोळा करावा लागे आणि काही प्रसंगी बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या खंडणीचा काही भाग त्यांना मिळे. तसेच अमीर उमरावांना सुलतानाला खंडणी पाठवावी लागे. जरी त्यांच्या सहाय्याने कारभार होई तरी त्यांच्यातील दुहु व फुटीरतावादी वृत्तीमुळे ते परकियांना खानदेश वर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन देत आणि शेवटी परिणाम जनतेला भोगावे लागले.
न्यायदान –
या काळातील न्यायदान पध्दतीवर फारसा प्रकाश टाकणारी साधने उपलब्ध नाहीत तरीही फारच दुर्मिळ काजींच्या कागदपत्रांचा अभ्यास केला तर राजधानीच्या तसेच शहरी आणि परगण्याच्या ठिकाणी न्याय देण्यासाठी काजींची नेमणूक केली होती. कुराण आणि हदीस ग्रंथांच्या आधारे न्यायदानाचे काम केले जात होते. फारुकी राजा किंवा शाह हाच याचा प्रमुख होता. सुलतान नसल्यास किंवा आळशी असला तर हे काम वजीरालाच करावे लागे.
राज्यातील हिंदू जनतेसाठी न्याय मिळावा म्हणून धर्मपंडीत आणि गावातील मुकादम आणि इतर पारंपरिक न्यायव्यवस्थेत फारूकींनी ढवळाढवळ केलेली दिसत नाही. बऱ्हाणपूर शहरातील सुफी संत मौलाना शाह भिकारी यांचा शिष्य काझी दौद यासारखे काझी बऱ्हाणपूरचा न्यायदान करीत असल्याचे दुर्मिळ पुरावे सापडतात.(फारूकी काळातील शासनव्यवस्था)
संदर्भ
- टी.टी.महाजन
- खानदेशचा राजकिय व सांस्कृतिक इतिहास कान्टिनेंटल प्रकाशन पुणे
- महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४
साभार – सरला भिरुड & Khandesh FB Page