मजेदार नट क्रॅकर्स !
दिवाळीनिमित्त तयार केल्या जाणाऱ्या फराळाच्या अनेक पदार्थांमध्ये – मिठायांमध्ये सुकामेवा वापरला जातो. भेट म्हणून आलेल्या गोष्टींमध्ये सुकामेवा असतो. यामध्ये येणारे अक्रोड, बदाम, पिस्ते, जायफळ तसेच नेहेमीची सुपारी म्हणजे फोडायला कठीण असे अत्यंत खट असलेले ‘ नट ‘ ( Nut ) ! परंपरागत पद्धतीने फोडताना अनेकांनी एक गंमतीदार अनुभव घेतला असेलच. डाव्या हातात बदाम जमिनीवर धरून ठेऊन उजव्या हाताने बत्त्याचा किंवा हातोडीचा फटका मारल्यावर, बदाम निसटून जातो आणि फटका बोटांवर बसतो. पुन्हा अत्यंत काळजीपूर्वक फटका मारल्यावर बदामाचे इतके तुकडे होतात की त्यातून कवचाचे आणि गराचे तुकडे निवडणे अशक्य होते. मग स्वयंपाकघरातील चिमटा ( सांडशी ), अडकित्ता किंवा सुरी यांचे प्रयोग करावे लागतात. म्हणून मग याच्यावर उपयुक्त असे ‘ कवचभंजक ‘ शोधून काढण्यात आले.
पुरातन ग्रीसमध्ये या नट क्रॅकर्स म्हणजे नटफोड्यांचा उल्लेख आढळतो. १४ व्या शतकात फ्रान्समध्ये तर इंग्लंडमधील कँटरबरी टेल्समध्येही या नट क्रॅकर्सचा उल्लेख आढळतो. लोहाराकडील पक्कडीच्या आकाराचे चांदीचे, बिडाचे, ब्रॉन्झचे तर फ्रान्स व इटलीमध्ये चक्क लाकडाचे क्रॅकर्स होते. अनेकदा ते मनुष्य किंवा प्राण्यांच्या आकारात तयार केले जात असत. सन १८०० नंतर जर्मनीच्या लाकडी क्रॅकर्सनी खूप प्रसिद्धी मिळविली. जर्मनीमध्ये मनुष्य किंवा प्राण्यांच्या आकारातील नट क्रॅकर्स हे शुभसूचक मानले जात असत. तेथे ख्रिसमसच्या क्रिबमधील ( छोटे देखावे ) दैवी व्यक्तिरेखा आणि नट क्रॅकर्स हे लाकडामध्ये कोरणारा एक मोठा उद्योगच भरभराटीला आला. ओर माउंटन्स आणि थुरिंजियातील सोनबर्ग येथील क्रॅकर्सना खूप लोकप्रियता लाभली. ते परंपरागत ख्रिसमसचेच प्रतीक बनले. काही खास कलाकारांच्या क्रॅकर्सना खूप प्रसिद्धी मिळाली आणि या क्रॅकर्सचे संग्राहकही वाढू लागले. विविध संगीत वाद्यांचा वादक माईक ओल्डफिल्ड याने नट क्रॅकर्सच्या आवाजाचा वापर आपल्या संगीतामध्ये केला आहे.
व्हिक्टोरियन काळात युरोपमध्ये डिनरला सुकामेवा आणि त्यासोबत चांदीचे नट क्रॅकर्स ठेवणे हे प्रतिष्ठेचे
लक्षण समजले जात असे. १९ व्या शतकात नट क्रॅकर्सच्या आकारांमध्ये खूप वैविध्य आले. त्याची सोव्हेनियर्स म्हणून खूप विक्री होऊ लागली. मग कॅटलॉग आले, मेल ऑर्डर्स आल्या, डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये शिरकाव झाला. सुक्यामेव्यातील ही कठीण कवचाची फळे, त्यांचे कवच साफ करूनच बाजारात विकायला येऊ लागल्यावर नट क्रॅकर्सचा वापर आणि प्रभाव ओसरू लागला आहे.
आता दिवाळीचे पदार्थ घरोघरी बनवायला सुरुवात होईल. कवच साफ केलेला सुकामेवा वापरतांना या नट क्रॅकर्सना विसरू नका. माझ्या संग्रहातील कांही देखण्या आणि वेगळ्या नट क्रॅकर्सची छायाचित्रे खाली देत आहे.
( कांही संदर्भ — विकिपीडिया )
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]




