महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,322

कामातून गेलेल्या वस्तू भाग १

By Discover Maharashtra Views: 3747 4 Min Read

कामातून गेलेल्या वस्तू भाग १
ढींचणिया (ढोपर टेकू, Knee Support)

या भारत देशातील मूळ संस्कृती ही हजारो वर्षे, विविध संक्रमणे आणि बदल करीत पुढे जात असते. अनेक प्रांत, भाषा, धर्म, जाती, आर्थिक स्तर या सर्वांचे प्रतिबिंब त्यात दिसते. त्यातील अनेक जुन्या खुणा आजही पुसल्या गेलेल्या नाहीत. पण त्या बदलत गेल्या. तर बदलणारा काळ आणि त्याच्या गरजा, यामुळे कांही गोष्टी झपाट्याने बदलल्या. अशा स्थित्यंतरांमध्ये आता जवळपास पूर्णपणे अस्तंगत झालेल्या कांही गोष्टींची माहिती आपण या लेख मालिकेतून घेणार आहोत.

जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार….म्हणूनच आपण तिला भारतीय बैठक म्हणतो . उभे राहणे, चौरंग किंवा ओटा – वृक्षाभोवतींचे पार – खाट अशा आसनांवर बसणे हे प्रकार लोकप्रिय होते. घर , देऊळ, चावडी, शाळा, धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी जमिनीवर कांही आसन घेऊन बसणे ही आमची हजारो वर्षांची परंपरा आहे. पाट, बसकर, मृगाजीन, व्याघ्राजीन, चटई, दर्भासन असे काही आसन म्हणून घेऊन त्यावर लोकं अगदी सहज बसत असत.

पूर्वी योगी, साधू , तपस्वी मंडळी ही सुखासन, पद्मासन घालून बसत असत. गायक आणि वादक कलाकार साधी मांडी ठोकून, तासनतास आपली कला सादर करीत असत. मांडी, खुरमांडी, अर्धी मांडी, उभी मांडी, मांड, पालथी मांडी, फतकल, हनुवटी गुडघ्यावर ठेऊन बसणे, उकिडवे बसणे हे सगळे खरे तर मांडीचेच अवतार ! मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघ्यातील वेदना, knee replacement असल्या गोष्टी खूप लांब राहत असत.

खरेतर माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते. मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ” ढींचनीया “, म्हणजे ढोपर टेकू !

अशा टांगलेल्या अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ढींचनीया. हा एक साधारणत: डमरूसारखा , ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे. मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे कांशापासून बनविले जात असत आणि तत्कालीन कारागिरांच्या स्वभावानुसार त्यावर खूप चांगली नक्षी कोरली जात असे. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे ढींचनीया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले ढींचनीया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात आणि राजस्थान या भागांमध्ये हे ढींचनीया वापरले जात असत.
( महाराष्ट्रामध्ये आसनावर, उंच हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी T आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. )

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही मॉडर्न होत चालली आहेत. आता या ढींचनीयांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही झाले. अहमदाबादच्या वेचार वासण म्युझियममध्ये यांचा फार मोठा संग्रह मला पाहायला मिळाला. फोटो काढायला मिळाले. अजून त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या अज्ञात वस्तू म्हणून तेथे शिल्लक राहतील !

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

 

 

 

 

 

 

Leave a Comment