महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,417

कामातून गेलेल्या वस्तू भाग २

By Discover Maharashtra Views: 3760 9 Min Read

भाग २ कामातून गेलेल्या वस्तू !

हुंड्याचा हंडा !!

( एक वेगळेच भांडे … एक कलंक ? )
या आधीच्या लेखात :” ढींचनीया ” या वस्तूची माहिती मी दिली होती. त्याला अक्षरश: अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. अनेक साईट्सवर, ईमेल्सद्वारा , व्हॉट्स ऍप वर तो शेकडोवेळा फॉरवर्ड झाला. त्याला सुमारे ५३०० हुन अधिक लाईक्स, कॉमेंट्स, प्रश्न लाभले. अजूनही तसाच प्रतिसाद सुरूच आहे. अशा गोष्टींमुळे कांही नवीन लिहिण्यास खूप प्रोत्साहन लाभते. सर्वांचे आभार !

आज आणखी एका वेगळ्या आणि लुप्त झालेल्या वस्तूची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. एका चांगल्या परंपरेचे कुप्रथेत रूपांतर झालेला आपल्याकडील एक प्रकार म्हणजे लग्नात घेतला जाणारा हुंडा ! पूर्वी हुंडा हा एका अत्यंत कलात्मक आणि नक्षीदार अशा हंड्यातून दिला जायचा. त्याला ” हुंड्याचा हंडा ” ! ( Dowry Box ) म्हटले जात असे. मात्र हे हंडे महाराष्ट्रामध्ये फारसे वापरले जात नसत. ही सुंदर आणि अत्यंत वेगळी अशी गोष्ट आता व्यवहारातून बाद झाली याचे नक्कीच दु;ख आहे. पण त्यापेक्षाही अधिक दु;ख आहे ते म्हणजे ही कुप्रथा मात्र बाद झाली नाही याचे !

हुंडा म्हणजे मुलीच्या माहेरच्यांनी लग्नामध्ये मुलाकडच्या मंडळींना दिलेल्या रोख, सोने – चांदी, दागिने, जवाहिर, किंमती वस्तू, कपडे इत्यादी वस्तूंचा आहेर ! या हुंड्याचा इतिहास हा खरेतर पुराणकाळापासून माहिती आहे. त्याची व्याप्तीही विश्वभर आहे. स्वरूप मात्र भिन्न भिन्न असे. भेट, आंदण, मदत, आहेर म्हणून तो दिला जात असे. त्यामध्ये अनेक किंमती वस्तूंपासून ते खऱ्या सर्पाची मेखला, व्याघ्रजीन, हजारो गायी, सहस्रावधी घोडे, जमीन अशा काहीही वस्तू असायच्या. अगदी देवदेवतांच्या विवाहांमध्ये इतरांनी त्यांना केलेल्या आहेरची खूप वर्णने आहेत. तर १६६१ मध्ये इंग्लंडचा राजा, चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथेराईन यांच्या लग्नात अख्खी मुंबईच त्यांना हुंडा म्हणून दिली गेली होती.

भारतात याचे पुरातन काळातील स्वरूप आजच्या इतके वाईट नव्हते. राजघराण्यांमध्ये वधू ही स्वयंवर जाहीर करून स्वतः वरपरीक्षा घेऊन मग विवाह संपन्न होत असे. अशा स्वयंवरात जिंकलेला वर हा फारसा श्रीमंत नसेल तर तर वधूपिता राजा, त्याला आपल्या राज्याचा कांही भाग देऊन त्याला आपल्या तोलामोलाचा करीत असे. अनेकवेळा दोन राजे एकमेकांच्या कुटुंबातील मुलांचा विवाह करून अशा देवाणघेवाणीतून आपले वैर संपवीत असत, साम्राज्य वाढवीत असत.

पूर्वी तर सधन घराण्यांमध्ये आणि हिंदू कुटुंबांमध्ये मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळण्याचा हक्क होता. हा हिस्सा मुलाच्या वाट्याच्या एकचतुर्थांश इतकाच असायचा. पण तिच्या लग्नानंतर मात्र तिचा आपल्या पालकांच्या संपत्तीत कुठलाही हक्क राहत नसे. म्हणून तिच्या वाट्याची संपत्ती तिला तिच्या लग्नातच देऊन टाकली जात असे. मला वाटते हे आजच्या हुंड्याचे आद्य आणि चांगले रूप असावे. हा तिचा वाटा तिचे स्वत:चे स्त्रीधन म्हणून, आयुष्यभर तिच्या मालकीचा असे. मुस्लिम समाजामध्येही वरातीच खर्च म्हणून ‘जहेज ‘ ( दहेज नव्हे ) दिला जात असे आणि हा शरियाप्रमाणे दिल्या जाणाऱ्या मेहेरच्या रकमेपेक्षा वेगळा असे.

मुलाकडच्या मंडळींना या फुकटात मिळणाऱ्या संपत्तीने हळूहळू अत्यंत घातकी, विकृत स्वरूप धारण केले. केवळ मुलगा आहे म्हणून स्वतःला मोठे मानणाऱ्यानी, ‘ मुलगी असण्याचे पाप ‘ असलेल्या वधुपित्याची चक्क पिळवणूक सुरु केली. लग्नाच्या बैठकीत सर्वांसमोर झालेल्या कराराच्या बाहेर जाऊन, ऐन लग्नात वाटेल त्या गोष्टींच्या मागण्या सुरु झाल्या, अडवणूक होऊ लागली. मोटारसायकल, मोटार, एसी, फ्रिज, टीव्ही, फ्लॅट, बंगला,सोन्याचे दागिने अशा गोष्टींची आयत्यावेळी मागणी होऊ लागली. मुलीच्या लग्नासाठी वधुपिते कर्जबाजारी होऊ लागले. लग्न झाल्यावरही अशा वस्तूंच्या मागण्या केल्या जातात. अनेकदा त्यासाठी तिचा अनन्वित छळ केला जातो. सुनेला अगदी गरोदर असतांनाही ठार मारल्याच्या घटना सहज घडू लागल्या. तर कधी असह्य छळाला कंटाळून ती सूनच आत्महत्त्या तरी करु लागली.

मुलींच्या लग्नासाठी शेतकरी बापाच्या जमिनी कायमच्या गहाण पडून तो आत्महत्त्या करायला लागला. … म्हणून मग कायदे झाले, नंतर ते अधिक कडक झाले. पण त्यामुळे वेगळ्या मार्गाने व्यवहार होऊ लागले. थोडाफार सोडला तर बाकी परिणाम शून्य…. प्रोत्साहन किंवा कौतुकाचे प्रतीक म्हणून वधूला दिल्या जाणाऱ्या संपत्तीचे रूपांतर भीषण अशा खंडणीमध्ये, गळा दाबून केल्या जाणाऱ्या पठाणी वसुलीमध्ये झाले. आश्चर्य म्हणजे खरेतर ज्या नवरदेवाने पुरुषार्थ दाखवून आपल्या कर्तृत्वाने हे वैभव मिळवून दाखवायला हवे तो, या फुकट संपत्तीसाठी आईवडिलांच्या पदराखाली लपू लागला. अनेक समाजसुधारक, अनेक चळवळी झाल्या. एकविसावे शतक, स्त्रिया या पुरुषांसारख्याच किती कर्तृत्ववान आहेत यावर चर्चासत्रे घेतली जातात. महिला दिवस, नवदुर्गांचे सत्कार, राजकारणात ३३ टक्के आरक्षण असं सगळं कांही आलं पण हुंड्याचा कलंक मात्र कायमचा काही नष्ट होत नाही !

हुंडा हा अत्यंत कलात्मक अशा हंड्यातून दिला जायचा. मात्र हे हंडे महाराष्ट्रामध्ये फारसे वापरले जात नसत. पण महाराष्ट्रातही सासरी जाणाऱ्या नववधूसोबत माहेरहून पुरणपोळ्या, लाडू, फराळाचे खाद्यपदार्थ आणि हळदकुंकू व चोळीचे खण अशा गोष्टी, एका मोठ्या करंड्यात भरून पाठविले जातात. त्याला भूती / बुत्ती म्हटले जाते. सासरी पोचल्यावर आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना बोलावून हा करंडा उघडला जातो. खरे तर याचा मूळ उद्देश हा वधूसोबतच्या ५ स्त्रियांचा मान आणि वाटेत खायला उपयोगी पडतील असे खाद्यपदार्थ सोबत देणे असा असे. पण आता त्यावर प्रतिष्ठा मोजली जाऊ लागली. एका ऐवजी अनेक करंडे पाठविणे , त्यांचा आकार, त्यातील पदार्थांचे प्रमाण, वैविध्य, किंमत यावर दोन्हीही घरांची प्रतिष्ठा, मोठेपणा मोजला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता ऐपत असो वा नसो करंडे खूप मोठे व्हायला लागले आहेत. चोळीच्या खणांऐवजी महागडया साड्या,भेटवस्तू ,मिठाया अशा वस्तूंनी करंडे भरले जायला लागले आहेत. .. त्यामुळे खानदानी प्रतिष्ठा वाढायला लागली आहे.

पूर्वी हुंडा ज्या हंड्यामधून दिला जायचा तो अत्यंत वेगळा असा हुंड्याचा हंडा ( Dowry Box ) मात्र आता वापरातून पार बाद झाला आहे. साधारण मोदकपात्राच्या आकाराचे हे भांडे तांबे, पितळ किंवा कांशामध्ये घडविले जात असे. साधारणतः एक फूट ते अगदी ५ फूट उंच आणि ३ ते ४ फूट इतके रुंद एवढ्या प्रचंड आकाराचा हा हुंड्याचा हंडा असे. मुलीला सासरी जातांना या हंड्यात भरून हुंडा दिला जात असे. सोनेनाणे, चांदीची भांडी, दागिने, रोख रक्कम इतकेच काय पण उंची वस्त्रेही यातच ठेवली जात असत. पूर्वी प्रत्येक घरामध्ये, विविध कपडे आणि मौल्यवान वस्तू या भिंतीतील कपाटे, लाकडी कपाटे, फडताळे, ट्रँका यांच्यामध्ये ठेवल्या जात असत. पण त्यामुळे कपड्यांना बुरशी येणे, कसर / वाळवी लागणे, उंदीर / झुरळे यांनी कुरतडणे अशा प्रकारांनी ते खराब होत असत. म्हणून मग अशा सर्व गोष्टी या हंड्यामध्ये भरून ठेवल्या जात असत. झाकण बंद केल्यावर आत कीटक शिरू शकत नसत . या हंड्याला १ ते २ फूट उंचीचा अंगचाच स्टॅन्ड असे. सर्वात वरती झाकणाला एक अत्यंत मजबूत अशी गोल कडी असायची.

जर गावावर डाकूंचा हल्ला, शत्रूच्या सैनिकांचा हल्ला झाला तर घरातील सर्व जडजवाहीर, पैसे, मूल्यवान वस्तू, दागिने वाचविण्यासाठी ते सर्व या हंड्यांमध्ये ठेवून तो दोरीच्या साहाय्याने जवळच्या विहिरीच्या पाण्यात सोडलाजात असे. तर कधी तो गोठ्यामध्ये किंवा आवारामध्ये जमिनी मध्ये तो पुरून टाकला जात असे. नंतर तो पुन्हा बाहेर काढला जायचा. इतके प्रचंड वजन झेपण्यासाठीच वरची कडी खूप मजबूत असायची. या हंड्यांवर अत्यंत सुंदर नक्षीकाम केले असायचे. त्यावर देवदेवता,अष्टदिक्पाल, यक्ष इत्यादींच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. कांही हंड्यांच्या आतमध्ये खणही पाह्यला मिळतात. मजबूत बिजागराच्या साहाय्याने वरचे झाकण बसविलेले असते आणि तितकाच मजबूत कोयंडा / कडी असते. त्याला कुलूपही घालता येते.

माझ्या संग्रहात असे छोटे हंडे आहेत. पण अहमदाबादमध्ये संपूर्ण जगामधील एकमेव असे घरगुती भांड्यांचे संग्रहालय आहे. तेथे अशा प्रचंड हंड्यांचा मोठा संग्रह आहे. सोबतचे फोटो तेथेच काढलेले आहे. चौकोनी पेट्या, मोठे खोके, पिंपासारखे उंच आणि गोल आकाराचे, सरकविण्यासाठी तळाशी चाके असलेले प्रचंड लाकडी पेटारे असे विविध dowry boxes अस्तित्वात होते. आता सर्वच इतिहासजमा झाले. अनेक दाक्षिणात्य मंदिरातील अशा आकाराच्या दानपात्रांना हुंडी म्हणतात. या हंड्यावरूनच बहुतेक हुंडी शब्द आला असावा. ( प्रॉमिसरी नोटलाही हुंडी म्हटले जाते तो शब्द हुंडुवी या पर्शियन शब्दावरून आलेला आहे. ) हे महाकाय हत्तीसारखे दिसणारे खास ” हुंड्याचे हंडे ” मात्र आता वापरातून कायमचे गेले.
” हुंड्याचा हंडा ” गेला, देवळात त्याची हुंडी झाली !
पण हुंड्याचा कलंक कधी जाणार ?

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

Leave a Comment