जुनी अजब भांडी भाग ४
सासूचे लाटणे, टोचण्या व बासुंदीची ताटली वगैरे
आधीच्या तीन भागांमधील सर्व वस्तू खूपच पूर्वी इतिहासजमा झालेल्या होत्या.आकाराने मोठ्याही होत्या. या चौथ्या भागातील वस्तू मात्र थोड्या छोट्या आणि अलीकडच्या काळातील आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्या कदाचित पाहिलेल्याही असतील. त्यांची उपयुक्तता आपण पाहिली की आश्चर्य वाटते आणि गंमतही वाटते. ते बनविणाऱ्या कारागिरांचे कौतुक वाटते. आता इतिहासजमा झालेल्या या अगदी वेगळ्याच वस्तूंची आपण माहिती करून घेऊया !
सासूचे लाटणे ( चित्र क्र.१ )–पूर्वी सासू आणि सुनेचे नाते कांही वेगळेच होते. तेव्हां सुनेचा छळ, खाष्ट सासू, द्वाड सून, नाठाळ सासू हे शब्द त्यांचे विशेषणांसहच वाचायला आणि ऐकायला मिळत असत. स्वतः सून असतांना कितीही छळ सोसलेली स्त्री एकदा सासू झाली की ती पूर्वीचीच गादी जोमाने पुढे चालवायची. सासू म्हणजे सुप्रीम कोर्ट, त्यावर अपेलेट कोर्टच नाही. त्यावेळी सुनेला, आपण सासू होईपर्यंत सगळे सोसत राहणे अपरिहार्य असायचे ! याच्याशी संबंधित अशा , भारतामध्ये विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या त्यावेळच्या लाटण्याची गंमतीदार माहिती आपण पाहूया. पूर्वी सूनबाईला पोळ्या लाटायचे काम सांगून स्वतः सासूबाई जप करायला देवघरात बसायच्या. हातात जपमाळ, मनात देवाचे नाव घेण्याची इच्छा पण लक्ष मात्र सदैव सुनेवर ! हे लाटणे पितळी आणि पोकळ असायचे. हे बनवितांना यामध्ये छोटे छोटे दगड / गोटे भरुन ते बंद केले जात असे.
सुनेने पोळ्या लाटणे सुरु केले की लाटण्यामधील खड्यांमुळे देवघरातील सासूबाईंना सतत आवाज पोचत राहत असे. त्यावरून सून काम करते आहे की थांबून आराम करत्ये, किती वेगाने काम करते आहे, किती पोळ्या लाटून झाल्या असतील याचे statistics, ” देवाच्या नामजपामध्ये मग्न ” असलेल्या सासूबाईंना बसल्याजागी प्राप्त होत असे. तेथेच एखादे नातवंड खेळत असेल तर तेही या खुळखुळयासारख्या आवाजामुळे शांत राहत असे. आधी लाकडी लाटण्याला दोन्ही टोकांना घुंगरू लावले जात असत. पूर्वी याची गंमत सांगतांना, माझ्या एका गुजराती मित्राच्या आईने अगदी भूतकाळात शिरून मला हसत हसत एक गंमतीदार गोष्ट सांगितली. तेव्हाच्या चलाख सुना, त्या घुंगुरांमधील खडे पडले असे सांगून सर्व खडे गुपचूप काढून टाकत असत. त्यामुळे सासूबाईंना कांहींच माहिती मिळायची नाही. त्यांचे नामजपाकडे लक्षच लागत नसे. म्हणून मग अशा सासूबाईंनी असे धातूचे लिकप्रूफ लाटणे शोधून काढले असावे.
आता सूनबाईंनी पोळ्या करण्याचे दिवस गेलेच पण सासूबाईंना तरी पोळ्या करायला वेळ कुठे आहे ? तरीही आज सुद्धा सर्व वाहिन्यांवर, सुनेला छळणाऱ्या सासूच्या मालिका सर्वाधिक चालतात असे दिसते…..
…. पण हे सासूचे लाटणे म्हणजे सासूमानु वेळण मात्र कायमचे इतिहासजमा झाले.
टोचण्या ( टोच्या )– ( चित्र क्र. २) — याचा मात्र सासुबाईंनी टोचण्याशी कांहीही संबंध नाही. पूर्वीच्या काळी बहुतेक गोष्टी घरच्याघरीच बनविल्या जात असत. वर्षभराची लोणची, पापड, कुरडया, फेण्या, सांडगे… सर्वकाही घरीच ! छोट्या अख्ख्या कैऱ्या आणि अख्खे आवळे यांचा मुरांबा बनवितांना, साखरेचा पाक पूर्णपणे त्यात शिरला तर हे मुरांबे चवीला चांगले लागत असत आणि अधिक काळ टिकत असत. त्यासाठी कैऱ्या – आवळे यांना सगळीकडून टोचून छिद्रे पडली जात असत. त्यासाठी हा खास टोचण्या वापरला जात असे. एका लाकडी मुठीला अनेक खिळे मारून हा टोचण्या बनवीत असत. हे खिळे जर लोखंडी असतील तर ते ताबडतोब गंजतील म्हणून ते पितळी वापरले जात असत. या टोचण्यामुळे एकावेळी अनेक छिद्रे पडता येत असत. घरातल्या मुलांना हे काम दिले जात असे. आता जाम, सॉस, केचप आले. तयार मुरांबे आले. त्याचबरोबर समाजातील वाढत्या मधुमेहामुळे खाणारे खूप कमी झाले. त्यामुळे ” आपण आता निरुपयोगी झालो ” अशी टोचणी लागलेले हे टोचणेही व्यवहारातून कायमचे बाद झाले.
बासुंदीची ताटली– ( चित्र क्र.३ ) — पूर्वी बासुंदी करण्यासाठी, पेढे बनविण्यासाठी दूध आटविण्याचे काम घरातच केले जात असे. या गोष्टी तयार मिळत नसत आणि त्या बाजारातून तयार आणायची पद्धतही नव्हती. मोठ्या कढईमध्ये दूध आटविले जात असे. जसजशी कढई तापू लागे तसतसे अगदी तळाशी असलेचे दुधाचे कण उष्णतेने तापून तुलनेने हलके होऊन वरच्या बाजूला येत आणि वरचे जड कण खाली जात असत. दूध थोडे आटून जाड झाले की ही प्रक्रिया मंद होऊ लागे आणि तळाशी असलेल्या दुधाच्या एका भागाला खूप उष्णता लागून दूध करपत असे. त्यामुळे संपूर्ण दुधाला खूप वाईट असा जळकट वास येऊन सर्वच फुकट जात असे. अशा वेळी चिनीमातीच्या एक गोल ताटली कढईमध्ये तळाशी ठेऊन मग कढईत दूध ओतून ते आटविले जात असे. या ताटलीला एक आरपार छिद्र असे आणि वरच्या बाजूला चक्राकार वर्तुळ कोरलेले असे. अशा विषम बनलेल्या तळामुळे दुधाला एकाच ठिकाणी खूप उष्णता लागत नसे. त्यामुळे दूध जळून होणारे नुकसान टळू लागले. आता सर्वच रेडिमेड मिळते. मग ही ” बासुंदी रक्षक ताटली ” हवीच कशाला ?
कलाकुसरीची भांडी — ( चित्र क्र. ४ ) — पूर्वीच्या घरांमधून बरंच काही परंपरागत असायचं. स्त्रियांच्या बाबतीत तर ते प्रकर्षाने आढळत असे. पाणी साठवायच्या दगडी द्रोणीपासून बसरा मोत्यांच्या नाकातील नथीपर्यंत, सासूबाईंच्या अस्सल सोन्याच्या जरीच्या शालूपासून ते ३ पदरी चपलाहारापर्यंत ! अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्येही ते घडविणाऱ्या कारागिरांच्या रसिकतेची साक्ष मिळत असे. घरातील स्वयंपाक तयार करणे ते भोजन पूर्ण झाल्यावर विडा खाणे, मुखशुद्धी करणे ही सर्व प्रक्रिया म्हणजे रोजचा एक संस्कार असायचा, एक समारंभ असायचा ! याच्याशी संबंधित असे बसायचे पाट, जेवणाचे चौरंग, ताटे-वाट्या-भांडी, तांब्ये, पेले, अन्न वाढण्याची भांडी, पानविड्याची तबके, डबे, अडकित्ते अशा सर्व वस्तूंमध्ये कलात्मकता
पाहायला मिळत असे. आता स्वयंपाक ( स्वतःच बनविलेले जेवण ), एकत्र जेवणे, जेवायला सर्वांनाच मुक्त वेळ असणे, मोबाईल / टीव्ही / कॉम्पुटर यांचा अडथळा नसणे अशा गोष्टी आता बाद होत चालल्या आहेत. तरीही अनेक जुन्या घरांमधून ” स्वयंपाकाचे दागिने ” वाटावेत अशा कांही छान वस्तू पाहायला मिळतात. सोबतच्या चित्रामधील झारा पाहा. याला नुसती आरपार गोल भोके न पाडता एक कॅलिडोस्कोपिक डिझाईन बनविले आहे. ( हा झारा माझ्या आधीच्या एका पोस्टमध्ये आपण पहिला असेल ). कालथ्याच्या ( उलथणे / काविलथा ) परतण्याच्या जागेवर एक कमळाकृती कोरुन छान आकार तयार केलेला आहे. तेलावर परततांना तेलाचा अंश यामधून आरपार जात असल्याने गरम तेल अंगावर उडण्याची शक्यता कमी होते आणि शोभिवंतही दिसते.
खास द्रोण — ( चित्र क्र. ५ ) – पानाच्या द्रोणांसारखे डिझाईन असलेले हे जर्मन सिल्व्हर या धातूमध्ये बनविलेले द्रोण काही वेगळेच आहेत. पूर्वी पत्रावळीवर जेवतांना पानांचे द्रोण वापरले जात असत. नंतर पानांच्या द्रोणांच्याऐवजी असे द्रोण खास हौसेने बनविले जात असत. वाट्यांच्या ऐवजी हे द्रोण वापरले जात असत. अशा कांही वेगळेपणामुळे यजमानाचे कौतुक होत असे.
मोसंब्याच्या रसाची होडी — ( चित्र क्र. ६) — घरातील आजारी माणसाला ताकत लवकर भरून येण्यासाठी पूर्वी मोसंब्याचा रस दिला जायचा. तेव्हां ज्युसर / मिक्सर आले नव्हते. म्हणून मग मोसंब्याचा रस काढायला असे काचेचे भांडे वापरले जात असे. या चित्रातील हे भांडे कलात्मक आहे. पूर्वी लहानपणी ज्यांनी पावसात कागदाच्या होड्या बनवून सोडण्याची मजा अनुभवली असेल त्यांना हे भांडे पाहून अधिक आनंद होईल. याचा आकार त्या कागदी होडीसारखा आहे. उभ्या कडा असलेल्या मधल्या उंचवट्यावर अर्धे मोसंबे उपडे घालायचे. नंतर ते हाताने दाबून गोल गोल फिरविल्यावर मोसंब्यातून रस निघून होडीमध्ये जमा होतो. होडीच्या एका बाजूने तो पेल्यात ओतून घेता येतो. इतक्या सुंदर आकाराचा विचार करणाऱ्या कलाकाराचे नक्कीच कौतुक करायला हवे !
माहिती साभार – Makarand Karandikar| मकरंद करंदीकर | [email protected]