महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,553

कामातून गेलेल्या वस्तू | भाग ६

By Discover Maharashtra Views: 3647 6 Min Read

पखाल, पोहरा,मोट, ओकती

कामातून गेलेल्या वस्तू

झपाट्याने होणारे शहरीकरण. विविध सुधारणा, नवीन सोयींची सहज उपलब्धता यामुळे कालपरवा आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू आता कालबाह्य ठरून नाहीशा होत आहेत. अशा कांही वेगळ्या वस्तूंचा आढावा मी घेत आहे त्यातील हा सहावा लेख !

भारताला असे अभिमानाने म्हणता येईल की Agriculture is the culture of India ! मुख्यत्वेकरून शेती आणि बागायतीचा हा ‘ सुजलाम सुफलाम ‘ देश ! पुरातन काळी नदीच्या काठाने वस्ती करणारा माणूस जेव्हा ती जागा सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला तेव्हा त्याने पाण्यासाठी डबकी, तळी, आड, विहिरी, तलाव, ओढे असे स्रोत निर्माण केले. त्यातून पाणी काढण्यासाठी आणि आपले घर, शेत, बाग यांच्यापर्यंत पाणी नेण्यासाठी व्यवस्था निर्माण केली. रहाट, मोट, ओकती, पन्हळ, पाट निर्माण झाले. ओकती म्हणजे एका उंच खांबावर तराजूच्या दांडीसारखा आडवा खांब तरफेप्रमाणे ( lever ) बसवायचा.

त्याच्या एका बाजूला लांब दोरीला बांधलेला पोहरा आणि दुसऱ्या बाजूला मोठे दगड वजन म्हणून बांधायचे. याच्या साहाय्याने माणसाने आपली शक्ती वापरून आडातून पाणी काढायचे. रहाट म्हणजे माणसाच्या किंवा बैलाच्या शक्तीने एका साध्या यंत्राच्या वापराने पाणी काढले जात असे. ओकती आणि रहाट हे अधिकतर कोकणातच पाहायला मिळायचे. मराठीत ‘ शेंदून काढणे ‘ हे क्रियापद खूप खास आहे. ते फक्त विहिरीतून पाणी ओढून काढण्याचा शब्द म्हणून वापरले जाते. हात रहाट किंवा पाय रहाट असे प्रकार आहेतच. त्यासोबत यासाठी योग्य अशी भांडी, पोहरे, पखाल, मोट अस्तित्वात आली.

साधारण मार्च महिना सुरु झाला की डोक्यावर हंडे ( हंड्यांवर हंडेसुद्धा ), कमरेवर कळशा, टँकरभोवती गर्दी अशाप्रकारची दृश्ये, अगदी आजसुद्धा देशभर पाहायला मिळतात. पण तरीही यातील कांही वस्तू मात्र मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने नाहीशा होत आहेत हे नक्की ! खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी पोहरा आजही वापरला जातो. छोटी बालदी किंवा पत्र्याच्या कडीवाल्या डब्याला दोरी बांधून तो विहिरीत सोडला जातो. पाण्यात बुडून त्यात पाणी भरले की दोरी ओढून तो वर घेतात. त्यातील पाणी अन्य कळशी / हंडा यात ओतून तो पुन्हा विहिरीत सोडतात. गुजरात, राजस्थान येथे बिडाचे एकसंध ओतीव पोहरे पाहायला मिळतात. ( छायाचित्र क्र. १ ) बांबूच्या पट्ट्यांपासून बनविलेले पोहरेही हलके, चिवट आणि स्वस्त असतात. ( छायाचित्र क्र. २ )

छायाचित्र क्र.३– या शृंखलेतील गायब होत असलेली आणखी एक वस्तू म्हणजे ‘ पखाल ‘ ! मेलेल्या जनावराच्या पूर्ण कातड्याची शिवलेली ही पिशवी असते. ‘ खाल से बनती है, वो पखाल ‘ ! तर संस्कृतमध्ये प्रखल्ल म्हणजे कातडी पिशवी. यावरून पखाल शब्द आला. पखालीला खांद्याला अडकविण्यासाठी पट्टा असतो. पखालींमध्ये दोन आकार असतात. त्यांना नर व मादी म्हणतात. यात एकावेळी सुमारे २० ते ४० लिटर पाणी राहते. यातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नसे. पण पूर्वी जी बांधकामे केली जात असत त्यावरील गिलाव्यावर ( plaster ) सतत पाणी मारावे लागत असे. त्यामुळे बांधकाम अधिक मजबूत होत असे. खांद्यावरील पखालीचे डाव्या हाताने तोंड धरून त्यातील पाणी उजव्या हातातील भांड्यातून , सतत या बांधकामावर मारले जात असे. या पखाल वाहणाऱ्याला ” पखालजी ” म्हटले जात असे. ( छायाचित्र क्र. ४ )

भिंती सतत भिजत्या ठेवणारे म्हणून त्यांना ” भिस्ती ” असेही म्हणत असत. त्यांनी मारलेल्या पाण्याच्या सातत्यावर आणि प्रमाणावर त्या त्या बांधकामाची मजबुती अवलंबून असायची. त्यावरूनच एखाद्यावर सगळी ” भिस्त ” असल्याचा शब्द अस्तित्वात आला. इतके वजन सतत उचलून चढउतार केल्याने या भिस्त्यांच्या हातापायाच्या शिरा टरटरुन फुगलेल्या दिसत असत. सामना चित्रपटातील सुरेश भट यांच्या ” अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ” या गीतात ” कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ” या ओळीमुळे ही पखाल पुन्हा अधिक प्रकाशात आली.

प्रामुख्याने शेतीला / बागायतीला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर केला जातो. एकावेळी ३० ते ५० लिटर पाणी राहील अशी कातड्याची मोठी खोळ, एका लोखंडी गोल रिंगला बसविली जाते. या रिंगला बांधलेली मजबूत दोरी एका कप्पीवरून ( pulley ) बैलाच्या मानेवरील जू ला जोडली जाते. मोट चालण्यासाठी बैलाला बिचाऱ्याला सतत reverse and forward होत राहावे लागते. विहिरीतून ही खोळ भरून वर आली की ती एका उतरत्या फळीवर ओतून रिकामी केली जाते. मोट हा प्रकार देशावर पहायला मिळतो. छायाचित्र क्रमांक ५ मध्ये एक छोटी मोट व क्रमांक ६ मध्ये डबल मोट ( अधिक पाणी मावते व पाणी खालच्या बाजूने सोडून मोट रिकामी करता येते ) पाहायला मिळते. या मोटेने मराठी भाषेला अनेक शब्द, वाक्प्रचार आणि गीते दिली आहेत.

पाणी काढतांना दोरी तुटल्याने किंवा अन्य कारणाने पोहरा, बालदी किंवा कळशी विहिरीत पडली तर ? बहुतेक वेळा या गोष्टी पाण्यात बुडून तळाशी जात असत. घराच्या अडगळीत किंवा गावांमधल्या एखाद्याकडे हुकांचा जुडगा असायचा. हा जुडगा म्हणजे लोखंडाचे अनेक हूक एका पट्टीवर किंवा गोलावर बसवलेले असत. त्याला मजबूत दोरी बांधून तो या विहिरीत सोडला जात असे. आत बालदी, पोहरा किंवा कळशी कशीही पडलेली असली तरी हा हूक अशा तऱ्हेने पाण्यातून ढवळून काढला जायचा की या जुडग्यातील एक तरी हुक त्यात अडकून बालदी वर काढता येत असे. या वेळी घरातले, आजूबाजूचे असे बरेच प्रेक्षक जमा होत असत. हूक कसा फिरवावा याबद्दल प्रत्येकजण काठावर उभा राहून सूचना देत असे. हा एक सांस्कृतिक live episode असायचा. मालकाला हूक परत करतांना त्या सोबत कृतज्ञता म्हणून एक नारळ पाठविला जात असे. हे दोन्हीही प्रकारचे हूक छायाचित्र क्रमांक ७ व ८ मध्ये पाहायला मिळतात.

विशेष सूचना *** वरील सर्व वस्तू आणि यंत्रणा आज पूर्णपणे ‘ कामातून गेलेल्या ‘ नाहीत. पण उपसा पंप, नवीन नवीन सिंचन उपकरणांची उपलब्धता आणि जुन्या वस्तू परवडत नाहीत म्हणून बाजूला सारण्याची अपरिहार्यता यामुळे या वस्तू आणि यंत्रणा, फार वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर कालबाह्य आणि नाहीशा होत आहेत. शब्दांमध्ये त्या पकडून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे !

माहिती साभार – Makarand Karandikar





 

 

 

 

Leave a Comment