महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,194

जगदंबा माता मंदिर, राशीन

By Discover Maharashtra Views: 1395 2 Min Read

जगदंबा माता मंदिर, राशीन –

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे राशीन हे एक ऐतिहासिक गाव. समस्त राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रमुख कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे प्रतीक म्हणजे श्री जगदंबा माता मंदिर होय. देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मूळ मंदिराच्या चारही बाजूंनी ओव-या आहेत. समोर दोन भव्य दीपमाळा आपल्याला दिसून येतात. या दीपमाळा हलवल्यास हलतात हे येथील खास विशेष आहे.(जगदंबा माता मंदिर, राशीन)

श्री जगदंबा मंदिराची रचना साधारण तीन टप्प्यात असून यामध्ये बाहेरील प्रांगण, प्रदक्षिणा मार्ग व सभामंडप यांचा समावेश होतो. मंदिराचे मुख्य महाद्वार पूर्वाभिमुख असून अतिशय भव्य स्वरूपाचे आहे. मंदिर परिसरात आपल्याला अनेक वीरगळ व सतीशीळा दिसून येतात. देवीचे मुख्य मंदिर पुरातन असून ओव-या आणि प्रवेशद्वार २०० ते २५० वर्षापूर्वी बांधले आहेत. पेशवाईतील प्रसिद्ध मुत्सद्दी सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांनी पहिल्या ओव-या बांधल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. मंदिराच्या आवारातून प्रदक्षिणेचा पूर्ण दगडी मार्ग आहे. रंगीबेरंगी रंगात रंगलेलं मंदिर विलोभनीय दिसतं.

जगदंबा देवीने महीषासुराशी नऊ दिवस युद्ध करून त्याचा नवरात्रीत वध केला. त्यापैकी क्षेत्र राशीन हे यमाई देवीचे स्वयंभू स्थान आहे. कोणी यमाई म्हणतात तर कोणी रेणुका मात्र सरकारी दप्तरी जगदंबा देवी नाव प्रचलित आहे. तसंच मंदिरातील पश्चिमेकडील भिंतीवरील शिलालेखामध्ये ‘श्री यमाई’ नावाचा उल्लेख आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची चतुर्भूज स्वयंभू मूर्ती असून हे माहुरच्या रेणुकामातेचे स्थान आहे. देवीच्या उजव्या बाजूला तुकाई हे तुळाजापुरचे स्थान आहे. मध्ये चतुश्रृंगी देवीची पंचधातुची चलमूर्ती आहे. जगदंबा मातेची मूर्ती खूप बोलकी असून आपण त्यावरुन नजर हटवू शकत नाही. दर्शन घेऊन नक्कीच आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं.

जगदंबा देवीचा उत्सव आश्विन शु. १ ते आश्विन पौर्णिमेपर्यंत असतो. शतचंडी यज्ञाचेही आयोजन मंदिरात केले जाते. उत्सवानिमित्त मंदिरात जगदंबा देवीची ओटी भरणे, मिठपिठांनी परडी भरण्याची तसंच माळ परडी पद्धत आहे. उत्सवादरम्यान हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ही मंदिर परिसरात केला जातो.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment