महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,45,767

जगदंबा मंदिर टाहाकारी

By Discover Maharashtra Views: 171 3 Min Read

जगदंबा मंदिर, टाहाकारी –

जन्मगाव संगमनेरला लागून असलेल्या अकोले तालुक्यातील प्राचीन मंदिराचा परिचय व्हायला निम्म आयुष्य जाव लागल. अकोल्यातील सिद्धेश्वर, गंगाधरेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर नंतर वॉचलिस्टवर होते ते आढळा तटावरचे टाहाकारी गावातले जगदंबा मंदिर. गेलो त्या दिवशी नेमका वार्षिक उत्सव असल्याने विश्वस्त व सुहृद डॉ विष्णू एखंडे जातीने हजार होते. टाहाकारीचे जगदंबा मंदिर हे यादवकालीन म्हणले जाते .चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे.

बाह्य भिंत अगदी छोटय़ा-छोटय़ा अंतरावर विविध कोनात दुमडली आहे. या दुमडलेल्याप्रत्येक छोटय़ा भिंतीच्या मध्यावर ओळीने हे मूर्तिकाम केलेले आहे. काही ठिकाणी देव दानवांच्या मूर्ती तर काही ठिकाणी सैनिक, व्याध, देवतामूर्ती अशी शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांची कोरीव मुर्त्या आहेत. भिंतीचा बाह्य़ भाग आणि खांबांवर मुक्त हस्ते कोरीव काम केलेले. बाह्य़ भागावर शिव, पार्वती, गणेश, देवी आदी देवता; हत्ती, व्याल, घोडे असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सुरसुंदरी आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पेहीकोरलेली! या मूर्तिकामात गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सुरसुंदरीचे तब्बल बावीस आविष्कारप्रकटले आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल त्यांचा मान! त्यांच्या रचना-शैलीतून तत्कालीन कला आणि सौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कधी आरशात स्वत:चे सौंदर्यपाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा – ‘दर्पणा’, तर कुठे नृत्य अवस्थेतील नृत्य सुरसुंदरी! बासरी, मृदंग वाजवणाऱ्या, हाती पक्षी घेतलेल्या शुकसारिका, मुलाला घेतलेल्या मातृमूर्ती असे विविध रूपे मंदिराची रचना अष्टकोनाकृती असून त्याचे अंतराळ, मंडप, गाभारा, या भागात विभाजन केलेले आहे.

मंदिरास बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतील व बाहेरील बाजूस रंभा, मेनका, उर्वशी, तसेच इंद्र देवाच्या दरबारातील प-या नृत्य करताना कोरलेल्या आहेत. मंडपाला असणा-या बारा खांबापैकी आतील बाजूस स्तंभ शिर्षापासून छतापर्यंत दोन अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप आणि अंतराळाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या,यक्ष प्रतिमा आणि देव-देवतांचे मूर्तिकाम केलेले आहे. सभामंडपाच्या छतावर एकात एक गुंफलेली वर्तुळे आणि मधोमध लटकणारे एक दगडी झुंबर आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गाभाऱ्याच्यादरवाजावरही बारीक नक्षीकाम केले असून, त्याच्या शीर्षपट्टीवर गणेशाऐवजी देवीची संकेतमूर्ती स्थापन केली आहे.

मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मुर्तींचे दर्शन घडते. श्री जगदंबा मातेची मुर्तीं संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मुर्तींला अठरा हात आहेत आणि याहाता॔मध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मुर्तींचे वैशिष्ट असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मंदिराच्या गाभार्‍यात दोन्ही बाजूस-पूर्वस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.

डॉ वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे, नाशिक

Leave a Comment