जगदंबामाता मंदिर, टाहाकारी, अकोले –
नगर जिल्ह्यातील अकोले तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. घाटमाथ्याला लागून असल्यामुळे भरपूर पाऊस, घनदाट झाडी, दिग्गज गडकोट, भंडारदरा धरण, विविध सुंदर मंदिरे यांनी हा प्रदेश नटलेला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावातील सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडीत मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील पाषाणात केलेली कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिराच्या पंक्तीमध्ये येते टाहाकारी इथले जगदंबामाता मंदिर. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी ‘टाहो’ फोडला. तिने जिथे टाहो केला ते ठिकाण ‘टाहोकारी’ अर्थात ‘टाहाकारी’ म्हणून प्रसिद्धीला आले अशी या नावामागची कथा सांगितली जाते.
अकोलेच्या वायव्येला २६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडीत यादवकालीन मंदिर आढळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे त्रिदल प्रकारातील मंदिर आहे. गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गर्भगृहात वाघावर आरुढ झालेल्या अठरा हाताच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. या मूर्तीच्या पुढे देवीचा एक तांदळा असून त्यावर चांदीचा मुखवटा दिसतो. मुख्य गर्भगृहाची द्वारशाखा अत्यंत देखणी आहे. मंदिराच्या उर्वरित दोन गर्भगृहात पूर्वेला महालक्ष्मी व पश्चिमेला महाकाली च्या सुंदर मूर्ती दिसतात.
मंदिराचा सभामंडप अनेक नक्षीदार स्तंभानी नटलेला आहे. प्रत्येक स्तंभावर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, लज्जागौरी तसेच भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत. या सभामंडपाचे वितान आठ दिशेला आठ पुत्तलिकांनी म्हजेच स्त्रियांनी तोलून धरलेले दाखवले आहे. मुखमंडपाच्या बाह्य भागावर आपल्याला मिथुन शिल्पे दिसतात. मंदिराच्या बाह्य भागावर सुरसुंदरी म्हणजेच अप्सरांची अप्रतिम शिल्पांकने आहेत. सुरसुंदरीची ही शिल्पांकने इथे टाहाकारीच्या भवानी मंदिरात आवर्जून पाहावीत अशी आहेत.
Rohan Gadekar