कोल्हापूरच्या देवीशी नाते सांगणारे उस्मानाबादमधील जागजी…
इतिहास माझ्या गावाचा
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्राचीन वारसा सांगणारी अनेक ठिकाणे आहेत.तेर,नळदुर्ग,तुळजापूर,परंडा ही काही प्रसिद्ध ठिकानेच लोकांना माहिती आहेत.प्रत्येक गावाच्या आडवाटेवर जुनाट मंदिरे,शिल्पे,वीरगळी सर्रास आढळून येतात.उस्मानाबाद मधल्या प्रत्येक खेडेगावमध्ये वीरगळी आहेत आणि काही ठिकाणी तर ही संख्या 30-40 पर्यंत जाते.हे मी स्वतः पाहिले आहे.
तेर पासून जवळच असणाऱ्या जागजी येथे असणारे देवीचे मंदिर आणि त्यासमोरील पुष्करणी अद्भुत आहे.इथल्या देवीचे नाते कोल्हापूरच्या अंबाबाईसोबत सांगतात.इथे तसाच प्रकाशाचा खेळही होतो,अशी गावकाऱ्यांकडून माहिती मिळते.
परिसरात एक गद्धेगळ आहे जिला शनिदेवाच्या दगडाचे रूप दिले आहे.बाजूलाच एक राशीचक्र पडलेले आहे,ज्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही.
मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे समोर असणारी पुष्करणी.अत्यंत सुबक,उत्कृष्ट आणि आजही चांगल्या स्थितीत ही पुष्करणी आहे.या पुष्करणीच्या प्रत्येक देवकोष्टमध्ये मुर्त्या आहेत.काही दशावतारातील शिल्पे,ब्रम्हा,विष्णू च्या 24 रुपांपैकी काही रूपे,शिव,पार्वती,सरस्वती,गंगा,महिषासूर मर्दिनी अशी अनेक शिल्पे देवकोष्टमध्ये दिसून येतात.
नृसिंह अवतारातील मूर्ती आणि ब्रह्मची मूर्ती मला विशेष आवडल्या.ब्रम्ह त्याच्या हंस वाहनावर दाखवला असून,अतिशय सुंदर प्रकारे ही मूर्ती कोरलेली आहे. येथील पुष्करणीच्या बाहेरील बाजूस कामशिल्पे तसेच काही पौराणिक प्राण्यांची शिल्पेही चित्रीत केली आहेत.
यातील सर्वात विशेष एक शिल्प मला आढळून आले.इथल्या देवीच्या हातामध्ये खड्ग, डमरू,पाश आणि पात्र आहे.काहीजण हिला दुर्गा तर काहीजण महालक्ष्मी म्हणतात.देवीची मूर्ती अर्धपद्म-आसनामध्ये असून काहीशी उग्र रूपातील आहे. देवीच्या मूर्तीच्या बाजूलाच विष्णूची मूर्ती आहे.आणि ही मूर्ती ‘हृषीकेश विष्णू’ च्या रूपामध्ये कोरलेली आहे.बहुदा ही मूर्ती दुसरीकडून उचलून इथे आणून ठेवलेली असावी. मंदिर परिसरात 18 व्या शतकातील 2 समाध्या असून,एक पूर्णतः उध्वस्त झालेली आहे.
कधी आलात तर नक्की जागजीला भेट द्या.
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची