जहागीरदार गढी, राजापूर | येल्पाने गढी, येल्पाने –
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर नं १ या गावात एक गढी आहे. ती गढी जहागीरदार म्हणून ब्राह्मण कुटुंबाची आहे अशी प्राथमिक माहिती गावकर्यांकडून समजली. राजापूर हे गाव शिरूरपासून ढवळगावमार्गे आहे. शिरूरपासून साधारण १० कि.मी अंतरावर आहे. श्रीगोंदा या तालुक्याच्या गावापासून ४३ कि.मी अंतरावर आहे. गढीचे भक्कम प्रवेशद्वार व तटबंदी आजही शाबूत आहेत. आतमध्ये संपूर्ण झाडोरा झालेला आहे.
गढीचे वंशज खूप पूर्वीच सोडून गेले. गढीपासून जवळच कुकडी नदीच्या काठावर एक पुरातन शिवालय आहे. बाहेर वीरगळी आहेत. भिंतीवर अस्पष्ट शिलालेख आहे. गावात गोविंदमहाराजांचे मंदिर आहे त्याच्याबाहेर एक वीरगळ आहे. गढीचे बांधकाम १८ व्या शतकात पेशवे काळात झाले असावे असा अंदाज आहे. जाणकारांनी याबद्दल आपल्याकडे असलेली माहिती द्यावी.
येल्पाने गढी, येल्पाने –
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील येल्पाने गावात पूर्वी गढी होती. सद्यस्थितीत गढीचे प्रवेशद्वाराचे बुरूज शिल्लक आहेत. बुरूजावर गणेश शिल्प आहे. येल्पाने गाव श्रीगोंदापासून २५ कि.मी अंतरावर आहे. बेलवंडी बुद्रूक या गावापासून १० कि.मी अंतरावर आहे. येथील गावकर्यांकडून काहीच माहिती मिळाली नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.