जैन मंदिर नाशिक…
नाशिक मुंबई रस्त्यावर पांडवलेण्याच्या पुढे काहीशा अंतरावर हायवेला लागून असलेल्या जैन मंदिराचा परिसर नजरेस पडतो. सुरवातीला भव्य कमान आपले स्वागत करते. अकरा एकर जागेत पसरलेला हा पवित्र परिसर आपल्याला मोहवून टाकतो.जैन मंदिर नाशिक.
अतिशय स्वच्छ वातावरणात इथं मंदिरापर्यंतचा पायी जाण्याचा मार्ग बनवलेला आहे. या मार्गाच्या मध्यभागी आणि आजूबाजूला असलेली हिरवीगार लॉन आणि रंगीबिरंगी फुलझाडं फारच सुंदर भासतात. यात्री निवासस्थान, भोजनशाळा, गुरू महाराजांचं आराधना भवन, कार्यालय अशा इमारती इथे दिसतात. सरळ चालत जाऊन मार्गातल्या कमानींमधून मंदिराकडे जायचं. या कमानींवर बसलेल्या दोन हरणांच्यामध्ये धर्मचक्र शिल्प बघायला मिळतं.
मुख्य मंदिर फारच भव्य आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्याला दक्षिण व उत्तर द्वारं आहेत. मंदिरासमोरच्या मुख्य कमानीवर सुंदर शिल्पकलेचे खांब लावलेले दिसतात. मंदिराच्या दोन्ही जिन्यांतून एक मार्ग खालच्या गर्भगृहात जातो. इथं अतिशय देखणी अशी भगवान महावीरांची मूर्ती आहे. महावीरांची ही मूर्ती तब्बल बारा फूट उंच आहे. इथं आजूबाजूला चौकोनी मांडणीत विविध भगवान आणि मुनींच्या अनेक मूर्ती आहेत. बाहेर येऊन पायऱ्यांनी वरच्या बाजूला जायचं. वरच्या गर्भगृहात चौमुखी मंत्राधिराज पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती आहे. ती गर्भगृहाच्या चार द्वारातून विविध रुपांतून दर्शन देते. मंदिराचे खांब, घुमटाकार छत, नक्षीदार कमानी, भिंतींना नक्षीदार जाळी, हे सर्व खूप सुंदर आहे.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज