महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,153

जंजिरेकर सिद्धी व मराठे

By Discover Maharashtra Views: 2677 9 Min Read

जंजिरेकर सिद्धी व मराठे –

बाळाजी विश्वनाथ पेशव्याने दिल्लीहून २४ मार्च १७१९ ला सय्यद बंधूंच्या मध्यस्थीने बादशाह कडून छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्वराज्य,चौथाई व सरदेशमुखी अधिकार मराठ्यांना बहाल केल्याच्या सनदांवर शिक्का मोर्तब करून घेतले.तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व त्यांच्या बरोबर दिल्लीला नेण्यात आलेल्या राजघराण्यातील अन्य मंडळींची सुटका करून त्यांना महाराष्ट्रात रवाना केले.मराठ्यांना मिळालेल्या सनदानुसार महाराष्ट्रातील मोगलांच्या ताब्यातील सर्व किल्ले,प्रदेश मराठ्यांना त्यांनी परत करावयाचा होता.असे असून सुद्धा महाराष्ट्रातील काही हट्टी,दुराग्रही मोगल अधिकारी बादशहाच्या सनदेची अंमलबजावणी करून आपल्या ताब्यातील किल्ले,प्रदेश मराठ्यांना परत करण्यात टाळाटाळ करत होते.अशा हट्टी,दुराग्रही मोगली अधिकाऱ्यात कोंकणातील जंजिऱ्याचा सिद्धी प्रमुख होता.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना पण सिद्धीचा बंदोबस्त करण्यात त्याच्याकडे असलेल्या बळकट आरमार व तोफखान्यामुळे यश मिळाले नव्हते.अलिबाग व पेण वगळता उरलेला संपूर्ण रायगड जिल्हा त्याच्या नियंत्रणात होता.कान्होजी आंग्रे यांचे आरमार जरी पश्चिम किनार्यावर गस्त घालीत होते तरी त्यांना पण सिद्धीचा बंदोबस्त करता येयीना.सिद्धीच्या अत्याचाराला समस्त जनता कंटाळली होती.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला रायगड पण सिद्धीच्या नियंत्रणात असल्याचे शाहू महाराजांना सलत होते. मराठी सेना काही काळ देशावरचे पुंड पाळेगार,चंद्रसेन जाधव,निजाम,कोल्हापूरकर संभाजी व त्यांना साथ देणाऱ्या अन्य प्रबळ सरदारांच्या बंदोबस्तात १७३१ पर्यंत अडकली होती.कान्होजी आंग्रे जरी शाहू महाराजांना मिळाले होते तरी त्यांना आपल्या प्रांतात दुसर्या मराठे सरदारांचा हस्तक्षेप नको होता.कान्होजी सिद्धी विरुद्ध कारवाई करण्यास विशेष उत्सुक पण नव्हते.कान्होजींच्या कोंकणातील प्रभावामुळे शाहू महाराजांना सिद्धी विरुद्ध मोहीम उघडणे अडचणीचे जात होती.कान्होजी जुलै १७२९ मध्ये मरण पावले.त्यांच्या सरफोजी ह्या वडील मुलास सरखेलीची वस्त्रे देताना सिद्धीवर स्वारी करण्याची अट घालण्यात आली.

सिद्धीविरोधात मोहीम काढण्याची निकड छत्रपती शाहू महाराज तसेच बाळाजी विश्वनाथ पेशवा व अन्य मराठे सरदारांस ते मानत असलेल्या ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या चिपळूण येथील परशुराम मंदिराची जंजिरेकर सिद्धीच्या अंजनवेल येथील सिद्धी सात नावाच्या ठाणेदाराने विटंबना,विध्वंस  केल्यामुळे अधिक भासू लागली.ब्रह्मेंद्र स्वामी हे त्या काळातील मोठे प्रस्थ असून त्यांच्या शिष्य परिवारात दस्तुरखुद्द शाहू महाराज,बाळाजी विश्वनाथ पेशवा,थोरले बाजीराव,परशुराम पंत प्रतिनिधी,कान्होजी आंग्रे तसेच काही मुस्लीम मंडळी पण होती.स्वामींना मानणारे सर्वत्र व सर्व धर्म,पंथात होते.स्वामी बरेचसे व्यावहारिक दृष्टीचे असल्याने त्यांचे बरेच आर्थिक उलाढालीचे व्यवहार असत व त्यामुळे आपले एक विशेष स्थान असल्याचे त्यांना वाटत होते. ह्या भूमिकेतून ते कधी कधी आध्यात्मिक बाबींशी संबंध नसलेल्या गोष्टी पण करत असत.

१७२५-२६ च्या सुमारास अंजनवेल च्या सिद्धी सात ह्या ठाणेदाराला कर्नाटकच्या सावनूर येथील नवाबाने एक सुंदर हत्ती भेट म्हणून दिला होता.त्या काळातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेता इतक्या लांब ठिकाणाहून अंजनवेल ला हत्ती आणणे सोपे नव्हते.ठिकठिकाणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवाने घेणे महाकठीण काम होते. योगायोगाने ब्रह्मेंद्र स्वामी त्याच सुमारास कर्नाटकच्या दौर्यावर जाणार होते.स्वामीजींना मानणारे सर्वत्र असल्याने त्याचा उपयोग करून घेऊन कर्नाटक मधून कोंकणात हत्ती  आणण्याची गळ सात सिद्धीने स्वामींना घातली.स्वामींना हा उद्योग करण्याची जरूर नव्हती तरी पण त्यांनी ते काम अंगावर घेऊन परतीच्या प्रवासात कोल्हापूर छत्रपती तसेच पंत प्रतिनिधीकडून परवाने काढून ठेवले होते.त्यामुळे संगमेश्वर पर्यंत स्वामीनी हत्ती विनासायास आणला.पुढे माखजनला कान्होजी आन्ग्रेंच्या चौक्या होत्या.कान्होजी आपले शिष्य असल्याने त्यांचाकडील परवान्याची जरूर नाही असे स्वामींना वाटल्याने त्यांनी परवाने घेतले नव्हते. स्वामी आधीच्या मुक्कामावर स्नान संध्या करण्यासाठी थांबले व आपल्या लवाजम्यास त्यांनी पुढे पाठवून दिले.

स्वामीनच्या लवाजम्या जवळ परवाने नसल्याने चौकीवरच्या लोकांनी हत्ती जप्त करून जयगडला पाठवला.सिद्धी सात ला हि बातमी कळताच त्याने जयगडला आपले सैनिक पाठवले पण आंग्रे ण च्या सैनिकांनी सिद्धी सात च्या फौजेस पळवून लावले.दरम्यान हि गोष्ट स्वामींना कळून त्यांनी कान्होजीना विनंती करून हत्ती सोडवून घेतला होता.पण हि गोष्ट सिद्धी सात ला माहित नव्हती.या गोष्टीत ब्रह्मेंद्र स्वामींचा हात असल्याचा त्याला संशय येऊन त्याने चिपळूण येथील स्वामींनी जीर्णोद्धार केलेल्या परशुराम मंदिराचा विध्वंस,लुट,तोडफोड करून ब्राह्मणांना मारहाण केली.तो दिवस होता ८ फेब्रुवारी १७२७.ब्रह्मेंद्र स्वामी मंदिराचा सिद्धी सात ने केलेला विध्वंस बघून फार दुःखी झाले व त्यांनी हिंदू धर्माची अवहेलना होणाऱ्या राज्यात राहायचे नाही असे ठरविले.जंजिऱ्याच्या याकुत्खान ह्या मुख्य अधिकाऱ्याने स्वामींची माफी मागून सिद्धी सात ने देवालयाच्या लुटलेल्या सर्व वस्तू परत करायला लावल्या.पण ‘ यवन स्पर्श झालेल्या वस्तू आता अपवित्र झाल्या’ असे म्हणून स्वामीनी त्या याकुत्खानालाच देऊन टाकल्या.सिद्धी सात ने स्वामींना छळणे चालूच ठेवल्याने स्वामींनी चिपळूण सोडून साताऱ्या जवळील धावडशी ह्या ठिकाणी आपला मठ स्थापन केला.पण त्यांच्या मनातून सिद्धी सात चा राग गेला नव्हता.त्यांनी छत्रपती शाहू महाराज,कान्होजी आंग्रे तसेच बाळाजी विश्वनाथ यांच्या मागे जंजिर्याच्या सिद्धींचा बंदोबस्त करण्याचा धोशा चालू ठेवला.

जंजिरेकर सिद्धी व आंग्रे यांच्यात बाळाजी विश्वनाथ ने तह  घडवून आणल्याने सिद्धी व आंग्रे यांचे मैत्री चे संबंध होते.कान्होजीना सिद्धीवर कारवाई करून हे संबंध बिघडवयाचे नव्हते. तसेच ते मराठा मंडळाशी काहीसे फटकून वागायचे.पश्चिम किनारा कान्होजींचे कार्यक्षेत्र होते.त्यामुळे शाहू महाराजांना पण जास्त दबाव अंत येत नव्हता.कान्होजीनी शाहू महाराजांना “ श्यामल ( हबशी) व  वरकड शत्रूंचा उपद्रव बहुत आहे…स्वामिनी आपले स्थळास दुसरा पाठवून आपणास माम्ल्यापासून ( सिद्धीच्या बंदोबस्ताच्या) मुक्त करावे” अशी विनंती केली. कान्होजी आंग्रे इ.स.१७२९ मध्ये मृत्यू पावले. मराठी फौजा १७३१-३२ पर्यंत विविध कारणास्तव विविध ठिकाणी अडकलेल्या मराठी फौजा इ.स.१७३२-३३ मध्ये मोकळ्या झाल्या. थोरल्या बाजीरावने फेब्रुवारी १७३२ ला कुलाब्याला जाऊन सेखोजी आन्ग्रेशी बोलणी केली. ब्रह्मेंद्र स्वामींच्या सततच्या टोचणीमुळे शेवटी इ.स.१७३३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धीस शासन करण्यासाठी कारवाई करण्याचे ठरविले.त्याच दरम्यान फेब्रुवारी १७३३ मध्ये याकुत्खान मरण पावला व त्याचा मोठा मुलगा अब्दुर रहमान मराठ्यांच्या आश्रयाला आला.उन्हाळा सुरु असताना छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्याच्या हाताखाली एक फौज राजपुरी,जंजिर्या वर तर प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली दुसरी फौज राजगड व आसपासचा भाग काबीज करण्यासाठी रवाना केली.

मराठी लष्कर अचानक चालून आल्यामुळे त्याला फारसा प्रतिकार झाला नाही व सिद्धीचे सरदार किल्ल्यात पळून गेले.पेशव्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा नव्हत्या तसेच सिद्धीची रसद तोडण्यासाठी तो सर्वस्वी सेखोजी आंग्रे वर अवलंबून होता ज्याला छत्रपतींनी आपल्या मुलखात हस्तक्षेप करणे आवडले नव्हते.परिणामी तो ताबडतोब पेशव्याच्या मदतीस आला नाही.इकडे सिद्धी सरदारांनी मुंबईकर इंग्रजांशी संधान बांधून इंग्रजी आरमार जंजिर्यात आणले.पावसाळा पण जवळ आला होता.पेशव्याने जंजिरा सर करणे अवघड असल्याचे छत्रपतीना कळविले व रायगड तेथील किल्लेदाराला लाच देऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण बातमी फुटून दिलेले पैसे वाया गेले.पुन्हा साताऱ्याहून पैसे मागवि पर्यंत प्रतिनिधीच्या फौजा २५ मे ला रायगडला पोहचल्या व त्यांनी ८ जून ला किल्ला सर केला.प्रतिनिधी व पेश्व्यातील परस्पर स्पर्धा,आकस इ.मुळे त्यांच्या फौजात परस्पर सहकार्य कठीण झाले.पेशव्याने छत्रपतीना पत्र लिहून इंग्रजांच्या मध्यस्थीने युद्धबंदी घडवून आणली व बाजीराव ११ डिसेम्बर १७३३ ला जंजिर्याचा वेढा उठवून निघून गेला.पेशवा परतताच सिद्धीच्या सरदाराना चेव येऊन त्यांनी मराठ्यांनी जिंकलेल्या ठिकाणांवर,रायगडावर हल्ले सुरु केले.छत्रपतींनी धावाधाव करून फौज जमवून कोंकणात रवाना केली.

पाचाड जवळ १० जानेवारी १७३४ ला सिद्धी लष्कराला मराठ्यांनी घेरून त्यांचा धुव्वा उडवला,प्रमुख सरदार सिद्धी अंबर अफवानी त्यात मारला गेला.सेखोजी आंग्रे १७३३ मध्ये मृत्यू पावला.त्याच्या नंतर सरखेल झालेला संभाजी पेशवे व सातारा दरबार बरोबर फटकून वागायचा.त्यामुळे अलिबागला पेशव्याने मानाजी अंग्रेस नेमले होते.चिमाजी अप्पा १८ एप्रिल १७३६ ला रेवस जवळ फौज घेऊन दाखल झाला.ह्या फौजेने सिद्धी सात,सिद्धी याकुब,सुभानजी घाटगे आदी सिद्धी सरदाराना ठार केले व सिद्धी चा शेवट केला.शेवटी २५ सप्टेंबर १७३६ ला पूर्वी ठरलेल्या अटीवर तह होऊन सिद्धी विरुद्ध दहा वर्षे चाललेली मोहीम समाप्त झाली.सिद्धीचा नाश पाहून कृतकृत्य होऊन स्वामी ९६ व्या वर्षी निजधामास गेले.

‘’ युद्धाचे वर्तमान तपशीलवार श्रवण करून राजश्री स्वामी ( छत्रपती शाहू महाराज )बहुत संतोष पावले.भांडी मारिली,नौबत वाजविली,खुशाली केली.सिद्धी साता सारखा गनीम मारिला,हे कर्म सामान्य ण केले ऐसा स्तुतिवाद वारंवार केला.आप्पास वस्त्रे व पदक व तलवार बहुमान पाठवला.तसाच मानाजी आंग्रे यांचाही बहुमान केला.’’

रियासतकार गो.स.सरदेसाई ह्या जंजिरा मोहिमे विषयात काय म्हणतात ते विचार करण्यासारखे आहे.ते म्हणतात कि,….जंजिरा जिंकून पश्चिम किनारा पूर्णपणे निर्धास्त करणे हे स्वराज्याचे पहिले कर्तव्य प्रत्येक सरदार जाणत होता.प्रतिनिधी,पेशवे,आंग्रे, फत्तेसिंग भोसले वगैरे सरदार व्यक्तीशः प्रबळ व कर्तृत्ववान होते;पण गेल्या पाच सात वर्षांच्या कारभारात प्रत्येकास असा काही अनुभव आला होता,कि एकाने दुसऱ्याच्या भानगडीत केव्हाही पडू नये,आपल्या एकट्याच्या हातून होईल ते करावे,आणि साधेल तितका स्वतःचा पंथ स्वतंत्र ठेवावा;सर्वांची मोट एक ठिकाणी बांधून नुकसान मात्र होते,फलप्राप्ती काहीच होत नाही,हा अनुभव बाजीरावासहि वारंवार आला.उत्तर हिंदुस्थानात जसे त्याला एकतंत्री स्वतंत्र क्षेत्र मिळाले तसे या जंजिरा स्वारीत मिळाले नाही..’’

संदर्भ:
१- मराठ्यांचा इतिहास,संपादक ग.ह.खरे व अ.रा.कुलकर्णी खंड २
२- मंतरलेला इतिहास- ले.हर्षद सरपोतदार.
३- तीर्थरूप महाराष्ट्र.- ले.पं.महादेवशास्त्री जोशी.
४- मराठी रियासत. खंड ३ .ले.गो.स.सरदेसाई.

माहिती साभार – Prakash Lonkar

Leave a Comment