महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,056

जानु भिंताडा

Views: 3084
3 Min Read

जानु भिंताडा –

पानिपत युद्धात आपल्या प्राणांची पर्वा न करता भाऊसाहेब पेशवे यांच्या पत्नी सौ. पार्वतीबाई पेशवे यांना युद्धाच्या धुमचक्रीतून सुखरूप बाहेर काढून सरदार मल्हारराव होळकर यांच्याकडे सुपूर्द करणारे पेशव्यांचे इमानदार खीदमतदार  जानु भिंताडा.

पानिपत युद्धात मराठ्यांची सरशी होत होती परंतु दुपारनंतर युद्धाचे पारडे फिरले व मराठ्यांची युद्धातून पिछेहाट होण्यास सुरवात झाली. मराठा सैन्याने प्राणहाणी टाळण्यासाठी युद्धातून माघार घेण्यास सुरवात केली . सदाशिवभाऊ पेशवे यांनी युद्धात पत्नी पार्वतीबाई यांच्या संरक्षणाची व्यवस्था म्हणून विसाजी कृष्ण जोगदंड याची ५०० धनगरांनसह नेमणूक केली होती व त्यास आज्ञा दिली होती “ आम्ही झुंज पार होऊन निघालो असे कळले तर तुम्ही यांस घेऊन दिल्लीच्या रोखें आमच्या मागे पिछाडीस निघोन यावे . रणात पडलो असे वर्तमान ऐकल्यावारी यांसी जिवे मारून तुम्ही निघोन जावे . भाऊसाहेब यांची स्त्री गिलजांचे हाती सापडली होती असा लौकिक मात्र न व्हावा असे करावे “

मराठ्यांच्या पराभवाची वार्ता युद्धभूमीवर पसरू लागली व मराठे सैन्य व इतर लोक जीव वाचवण्यासाठी इतरत्र पळू लागले . विसाजी कृष्ण जोगदंड यांनी सदाशिवभाऊ पेशवे यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी पूर्ण न करता युद्धभूमीतून पळ काढला. सदाशिवभाऊ पेशवे यांच्या सोबत असणारा जानु भिंताडा भाऊसाहेबांकडून निशाणीची खुण घेऊन पार्वतीबाई यांच्या छावणीपाशी आला . पार्वतीबाई पेशवे ह्या हत्तीवरील अंबारीत बसल्या होत्या परंतु पळापळ सुरु होताच त्या हत्तीवरून खाली उतरल्या व इतर लोकांसोबत भांबावून पळू लागल्या . जानु भिंताडा याने पार्वतीबाई पेशवे यांना घोड्यावर बसवले व शेल्याने पाठीशी बांधले युद्धभूमितून शिताफीने बाहेर काढून दिल्लीच्या मार्गाने निघाला. विरसिंगराव बारावकर हा देखील जानु भिंताडासोबत मदतीस होता. वाटेत त्यांची गाठ पिलाजी राऊत याच्याशी झाली जानु भिंताडाने पार्वतीबाई पेशवे यांना पिलाजी राऊत याच्या घोड्यावर बसवले व पुढील प्रवास चालू केला . काही अंतराचा प्रवास केल्यानंतर घोडा थकला त्याकारणाने पार्वतीबाईंना घोड्यावर खाली उतरवून जानु भिंताडा व पार्वतीबाई यांनी काही अंतर प्रवास हा पायी चालत केला तर काही अंतर प्रवास हा वाटेत कोणी घोडेस्वार भेटल्यास त्याच्या घोड्यावर बसून केला . दिल्लीच्या तीन मजला अगोदर सरदार मल्हारराव होळकर यांच्याशी त्यांची गाठ पडली.

पार्वतीबाई पेशवे यांना पानिपतच्या रंणसंग्रामातून सुखरूपपणे आणणाऱ्या जानु भिंताडास १००० रुपये रोख व एक गाव इनाम म्हणून देण्यात आले. जानु भिंताडा यांचे मूळ गाव भिवडी , तालुका पुरंदर . जानु भिंताडा यांनी आपला भाऊ कान्होजी यांस आपला मुलगा मायाजी दत्तक दीला.

नागेश सावंत

Leave a Comment