जटाशंकर मंदिर, घोटण, ता. शेवगाव –
अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर घोटण गावात असणारी मल्लिकार्जुन, बळेश्वर व जटाशंकर ही प्राचीन मंदिरे ही अशाच स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते.(जटाशंकर मंदिर, घोटण)
मल्लिकार्जुन मंदिरा पासून अगदी काही अंतरावर जटाशंकर मंदिर असून ही दोन्ही मंदिरे पुरातत्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहेत. पुरातत्व विभागाकडे या मंदिराची नोंद जैन मंदिर अशी असली तरी मंदिरातील गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून स्थानिक लोक या मंदिराला जटाशंकर मंदिर म्हणून ओळखतात. मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली असून गर्भगृहावरील शिखर आज अस्तित्वात नाही.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे वितान हे उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या वर्तुळांचे करोटक वितान आहे. सभामंडपात डाव्या बाजूला एक लहान खोली असून तिथे काही भग्नावशेष विखुरलेले दिसतात. गर्भगृहाची द्वारशाखा सुभगा प्रकारातील असून गर्भगृहात शिवलिंग प्रस्थापित आहे.
Rohan Gadekar