जव्हार संस्थान…
महादेव कोळ्यांचे साम्राज्य जव्हार किंवा जव्हार तालुका याच्याशी गल्लत करू नका. जव्हार संस्थान इसवी सन १३१६पासून १० जून १९४८पर्यंत अस्तित्वात होते. मुकणे गावातील जयबा हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबा जमीनदार होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी २१ लहान किल्ले जिंकले वर भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. अश्या वेळी इ.स. १३१६मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबा आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले.
इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया, १ डिसेंबर १६६१ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला `शिरपामाळ असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती.
सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजीराजे वाडा तालुक्यातील कोहज गडावर मुक्कामी होते. विक्रमशहाराजे यांच्या पश्चात जव्हार संस्थानच्या गादीवर बसायचे कोणी, या कारणावरून वारसदारांमध्ये वादंग निर्माण झाले होते. या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप करून राणी सगुणाबाईंच्या अज्ञान पतंगशहा नावाच्या अज्ञान मुलाला गादीवर बसविले. मुलाच्या अधिपत्याखाली राणी सगुणाबाई याच राज्यकारभार चालवत असत. पुढे धुळबा राजाचा नातू देवबा यांच्या राजघराण्यातील गादीच्या वादामुळे जुना राजवाडा १८२०साली आगीत जळाला. यात राजवाड्यातील ऐतिहासिक कागदपत्रे जळून खाक झाली. हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता.
जुन्या राजवाड्याचा परिसर २१ हजार चौरस मीटर होता.जव्हार हे शहर महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ समजतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
– Ramdas Landge