महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,017

जेधे घराणे

By Discover Maharashtra Views: 4890 4 Min Read

जेधे घराणे…

स्वराज्यासाठी ज्या काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यातील एक घराणे म्हणजे कारीचे जेधे घराणे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या अनेक शुरवीरांचा हातभार लागला. यात तानाजी,येसाजी, सुर्याजी यासारखे महाराजांचे सवंगडी होते तर कान्होजी जेधे,बाजी पासलकर यासारखे अनुभवी होते. महाराजांच्या शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यातील एक घराणे म्हणजे कारीचे जेधे घराणे.

शिवकाळात जेधे घराण्यातील कान्होजी जेधे व त्यांचा पुत्र बाजी उर्फ सर्जेराव या दोन कर्तबदार पुरुषांचे मोठे योगदान आहे. कान्होजी जेधे हे भोर जवळच्या कारी गावचे देशमुख होते. कान्होजी जेधे यांचा जन्म कारी गावात झाला तर बालपण मोसे खोऱ्यात गेले. पुढे काही वर्ष ते शहाजी राजांसोबत दक्षिणेत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यावर शहाजी राजांच्या सांगण्यावरून कान्होजी जेधे स्वराज्यात आले. कान्होजी जेधे स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना सहाय्य करीत असले तरी ते आदिलशाहीच्या सेवेत होते. आदिलशहाने त्यांना वतन बहाल केले होते.

अफझलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिलशहाने १६ जून १६५९ रोजी कान्होजी जेधे यांना अफजलखानास मदत करण्याचे फर्मान काढले पण कान्होजी जेधे यांनी वतनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांना आपल्या पाच मुलांसह पाठिंबा दिला. कान्होजींनी स्वराज्यावरची निष्ठा दाखवत १२ मावळचे देशमुख एकत्र आणून स्वतःसोबत अनेक मराठा सरदार स्वराज्यात आणले. प्रतापगडच्या युद्धात जेधेनी भरघोस कामगिरी पार पाडली. कान्होजी जेधे यांनी स्वराज्यासाठी केलेल्या सेवेसाठी शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीच्या प्रथम पानाचा मान दिला. कान्होजी केवळ शुरच नव्हते तर त्याचं मनही आभाळाइतक मोठ होत.

पावनखिंडच्या लढाईत महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचावे यासाठी ३०० बांदलवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. बांदलाच्या या कामगिरीसाठी शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचं प्रथम पानाचा मान देण्याचे ठरविले आहे. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत सांगितले तेव्हा कोणतीही खळखळ न करता कान्होजीनी आपला मान बांदलास देऊन आपले औदार्य दाखवून दिले.

महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला त्यावेळी कान्होजी जेधे यांचे दोन पुत्र सोबत होते. पुरंदर लढाईच्या वेळेस कान्होजी पुत्र बाजी जेधे यांनी पडते निशाण वेळेवर सावरले व निशाण वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली. यावर महाराजांनी त्यांना सर्जेराव किताब दिला.

कान्होजी जेधे यांची समाधी आपल्याला आंबवडे गावात तर जेधे घराण्याचा वाडा आजही कारी गावात पाहायला मिळतो. कान्होजी जेधे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या त्यांच्या कारी येथील वाडयास व आंबवडे येथील समाधीस एकदा तरी भेट द्यायला हवी. जेधे यांचा वाडा असलेले कारी गाव पुण्याहुन कापुरहोळमार्गे ६० कि.मी. तर भोरवरून ३० कि.मी.अंतरावर आहे. आंबवडेमार्गे कारी गावात जाताना आपल्याला कान्होजी जेधे,जिवा महाला यांच्या समाधी तसेच नागेश्वर परीसरात असलेला पंत सचिवांचा वाडा व समाधी तसेच नागेश्वर मंदिर या सर्व गोष्टी पहाता येतात.

कारी गावात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या डावीकडे #धारेश्वर हे #शिवमंदिर तसेच भवानी मातेचे मंदीर आहे. या रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर आपण थेट जेधे यांच्या वाडयाकडे पोहोचतो. वाडयासमोर नव्याने बांधलेले मंदिर असुन मंदिराच्या आवारात मारुतीची मुर्ती आहे. पुर्वाभिमुख असलेल्या या वाडयाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बडेजाव अथवा भपका दिसुन येत नाही. वाड्याच्या बांधकाम चौसोपी असुन दरवाजातुन आत शिरल्यावर समोर मोकळा चौक आहे. या चौकाच्या चारही ओसरी व आत राहण्याची सोय आहे.

कान्होजी जेधे यांचे १३ वे वंशज यशवंत आबासाहेब जेधे येथे वास्तव्यास असून आमची त्यांच्याशी भेट झाली. शासन व पुरातत्व विभागाच्या सहाय्याने या वाड्याची मुळ रचना कायम ठेवत नुतनीकरण करण्यात आले आहे. जेधे यांच्या वंशजांची नाळ अजुनही येथील मातीशी जोडलेली असुन त्यांचा खानदाणीपणा कायम आहे. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व चहापाणी करूनच वाडा दाखवला जातो. वाडा फिरताना आपल्याला शिवकाळात असल्याचा भास होतो. वाडयात आपल्याला जेधे यांचे देवघर व त्यात असलेले पितळी देव व मुर्ती पाहायला पहायला मिळतात. याशिवाय कान्होजी जेधे यांच्या वंशजांनी आजही जपून ठेवलेले त्यांचे चिलखत व काही शिवकालीन तरवारी पहायला मिळतात.

जेधे शकावली व जेधे करीना हि जेधे वंशजांकडून महाराष्ट्राला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. या दोन ऐतिहासिक साधनामुळे शिवकालीन महाराष्ट्राचा संगतवार इतिहास मांडण्यास चांगलीच मदत झाली.

माहिती साभार – सुरेश निंबाळकर

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

Leave a Comment