जिलब्या मारुती मंदिर, पुणे –
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट, “जिलब्या गणपती” हे सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. आजच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आताच्या मंडई शनिपार रोडवर सुमारे २५० ते ३०० वर्षापुर्वी आंबील ओढा वाहत होता. आंबील ओढ्याचा प्रवाह, भाऊ महाराज बोळाच्या पश्चिमेकडून जिलब्या मारुतीजवळून पुढे जोगेश्वरी देवळाजवळून शनिवारवाड्याच्या पश्चिमेने पुढे जात अमृतेश्वराच्या देवळापाशी नदीला मिळत असे. ह्याच ओढ्याकाठी मंडई शनिपार रोडवर पुर्वी एक स्मशान होते. तिथे एक मारुतीचे छोटस देऊळ होते (जिलब्या मारुती मंदिर). त्याला पुर्वी विसावा मारुती म्हणत. कारण लोक त्या ठिकाणी कायमचा विसावा घेत.
पूर्वी पती निधनानंतर सती जाण्याची पद्धत होती. यामुळे स्वर्गारोहणाचे पुण्य लाभते, असे समज रूढ होता. अशा सती गेलेल्या स्त्रियांची वृंदावने आठवण म्हणून बांधत. ह्या मारुती मंदिराशेजारी सरदार शितोळे घराण्यातील एक स्त्री सती गेली होती, तिचे स्मारक आहे. पुढे पेशवाईत वस्ती वाढु लागल्यावर इ. स. १७३० च्या सुमारास नाना साहेब पेशवे यांनी तो ओढा बुजवला आणि हे स्मशान ह्या ठिकाणाहुन दुसरीकडे हलवले. पण सतीचे स्मारक व मारुतीचे मंदिर तसेच राहिले. या भागात वस्ती वाढल्यावर, या देवळाच्या आजुबाजुला घरे, दुकाने आली. या मंदिराच्या बाजुला एका हलवाईचे दुकान होते. तो दुकानात रोज पहिली जिलबी बनवल्यावर ११ किंवा २१ जिलब्यांचा हार मारुतीला घालायचा व आपल्या व्यवसायाला सुरुवात करायचा. म्हणुन विसावा मारुती हे नाव जाऊन कालांतराने जिलब्या मारुती हे नाव पडले.
ह्याच देवाळाशेजारी काही वर्षापुर्वी या भागातील गणेशभक्त तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सुरु करुन गणपतीला पण या मारुतीचे म्हणजे श्री जिलब्या मारुती मंडळ असे नाव दिले. मारुती मंदिरामध्ये मारुतीची राक्षसावर पाय ठेऊन राक्षसाला मारतानाची मुर्ती होती. पण काही लोकांना ती मुर्ती भंगली आहे असे वाटले, म्हणुन त्यांनी ती त्याकाळी जंगली आणि ओसाड भाग समजल्या जाणर्या नातुबाग परिसरात ठेवली आणि आत्ताची मुर्ती विधिवत बसवली. नातूबाग परिसरात काही तरुण फिरायला आले असताना त्यांच्या नजरेस ती मूर्ती पडली. त्यांनी ती मूर्ती पुर्ण निरखुन बघितली असता त्यांना असे जाणवले, की ती मुर्ती भंगली नसुन राक्षसावर पाय ठेवुन उभी आहे. त्यांनी ती मुर्ती तिथून नेली आणि पर्वती पायथा येथे स्थापन केली.
संदर्भ:
रविंद्र सरनाईक विश्वस्त जिलब्या मारुती मंडळ
मुकुंद सरनाईक
रविंद्र रणधीर मा.अध्यक्ष व विश्वस्त
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पत्ता :
https://goo.gl/maps/R8Bavmqa6THKnSH77
आठवणी इतिहासाच्या