महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,159

जिवाजी महाले | शिवरायांचे अंगरक्षक

Views: 6221
6 Min Read

जिवाजी महाले | शिवरायांचे अंगरक्षक

“होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी”. स्वराज्याची धुरा ज्यांनी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत स्वतःच्या खांद्यावर घेत वेळप्रसंगी मृत्युलाही सामोरे गेले. अशा अनेक मावळ्यांच्या कर्तुत्वातुन शिवरायांनी भुमिपुत्रांचे स्वराज्य उभे केले. त्यापैकीच एक वीर योध्दा म्हणजे शुरवीर जिवाजी महाले होय.

जिवाजी महाले यांच्या निष्ठेमुळेच शिवरायांनी अफजलखानासारखा गिधाड व कृष्णाजी भास्कर सारखा देशद्रोही सहज संपवला तसेच जिवाजीनी सय्यद बंडासारखा अफजलखानाचा अत्यंत चपळ अंगरक्षक संपवुन शिवरायांचे प्राण वाचवले व शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य वाढीस लागत राहिले.

प्रतापगडाच्या रणसंग्राम प्रसंगी शिवछत्रपतींनी अफजल खानाची आतडी वडून बाहेर काढताना त्याची आरडाओरडा ऐकून हाती पट्टा चढवून

शिवछ्त्रपतींच्यावर वार करण्याकरीता

भेटीच्या शामियान्यात धावून आलेल्या सय्यद बंडाचा हात त्याच्या पट्यासकट आस्मानी उडविणारा ,जिवा महाला हा मूळचा महाबळेश्वरजवळच्या कोंडवली या गावचा रहिवासी होता.यांचा जन्म ९ आॅक्टोबर १६३५ रोजी झाला.हा जातीने न्हावी असून कान्होजी जेधे यांचा प्रतिपाळ करणाऱ्या इतिहासप्रसिद्ध देव महाला यांचा मुलगा होता.

शिवरायांनी आपल्या अनेक छोट्या-छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले; परंतु स्वराज्य निर्माण करताना, अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले. त्यांच्या या कार्यात तन-मन-धनाने या सर्वांनी सहकार्य केले. यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती.

आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी

आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बालपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साता-याच्या तालमीतला लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. जिवाजी दांडपट्टा तर असा फिरवायचा की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता. उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे. शिवाय त्याची नजर तीक्ष्ण अतिशय तिक्ष्ण होती.

शिवरायांना जेव्हा जिवाजी महालेविषयी समजले; तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले. तरणाबांड-भरदार मान-जाड पल्लेदार मिशा, सरळ नाक, भलेमोठे कपाळ आणि भेदक नजर ,पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते. शरीराने वाघ-सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे तो अतिशय चपळ होता.

शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या दरबारात बडी बेगमने सर्व मातब्बर सेनापती, सरदारांना बोलावले होते. तिने सर्वांना सवाल केला, शिवाजीला कोण पकडून आणेल? दरबारात तर शांतता पसरली. तेवढ्यात मागून एक प्रचंड देहाचा, पायातील वहाणा कर्रकर्र वाजवत दरबारात आला. त्याने बडी बेगमचे आव्हान स्वीकारले. अफजल खान निश्चितच हे काम फत्ते करणार असा विश्वास तिला वाटू लागला. भल्याबु-या मार्गाने किंवा विश्वासघाताने अनेक शत्रूंना संपवण्यात तो तरबेज होता.

अफजल खान आपल्यासोबत हजारो सैनिक, घोडदळ-पायदळ घेऊन मजल दरमजल करत महाराष्‍ट्रात दाखल झाला. तेव्हा शिवराय रायगडावर होते. रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला. कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता. शिवाय डोंगरी किल्ला असल्याने एकावेळी एकच व्यक्ती तेथे जाऊ शकत होती. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला, त्यात हिंस्र पशू-प्राणी, जंगली श्वापदांचा वावर असल्याने प्रतापगडावर जाणे खूपच अवघड होते. शिवराय प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त समजताच अफजल खान खूप चिडला. त्याने हिंदू देवदेवतांची देवळे पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तर शिवाजीराजे खाली येतील असा त्याचा कयास होता. शिवरायांना ही नीती माहिती होती. ते पाहून त्यानी सेवकामार्फत शिवाजीराजांना भेटण्याचा निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलांसारखे; मला भेटण्यास या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला आदिलशहाकडून जहागिरी देतो. शिवरायांनी टोला मारला, मला तुम्हाला भेटायची भीती वाटते, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या. असे म्हणताच अफजल खान खुश झाला. भेटीची तारीख आणि वेळ ठरली. महाराजांनी सगळ्यांना कामे वाटून दिली. जिवा तु सय्यद बंडावर नजर ठेवायची, असे सांगून त्यांना सोबत घेतले.

भेटीचा दिवस उजाडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजल खानाचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पाय-या उतरत असताना, थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. त्याला तेथून दूर करण्यास सांगितले. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सागितले.अफजल खान व त्याचा वकील कृष्णाजी भास्कर शामियान्यात होते. अफजल खानाने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले. मृत्यूचा जबडा च तो त्या जबड्यात एकदम महाराजांना मिठी मारली . महाराज खुजे होते . त्यांचे डोके खानाच्या छातीला लागले. आणि एकदम महाराजांची मान आपल्या डाव्या काखेत खानाने पकडली व डाव्या कुशीत दाबून ठेवली .आणि उजव्या हाताने कट्यारीने पाठीवर वार केला. अंगात चिलखत असल्याने कट्यार घसरत गेली.

अंगरखा टराटरा फाटत होता. शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तन्यात लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला. शिवरायांवर त्याच्या वकिलाने हल्ला चढवला. इकडे सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला. महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जिवा महालेने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला. ” महाराज ! याला मीच ठार करतो ! येऊ द्या त्याला ! ”

सय्यदाचा वार जिवाने आपल्या अंगावर घेत अडविला आणि सपकन घाव घालून सय्यद बंडाच्या चिरफाकळ्या केल्या.! शिवरायांनाही या चपळाईचे कौतुक वाटले. तेव्हापासूनच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा वाक्प्रचार रूढ झाला.

सुरतेच्या स्वारीतही जिवाजींनी महाराजांना वाचवल्याची नोंद आहे.

प्रतापगडाच्या रणसंग्राम याप्रसंगी जिवा महालाने जी मर्दुमकी गाजविली त्याबद्दल शिवछत्रपतींनी त्याची सर्फराजी करून त्यास गुंजन मावळातील साखर हे गाव इनाम दिले.

लेखन – डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment