जोगेश्वर महादेव मंदिर, देवळाणे –
देवळाणे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सटाण्यापासून १६ कि.मी. अंतरावर दोध्याड नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. गावातील दोध्याड नदी व ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर जोगेश्वर किंवा जोगेश्वरी या नावाने परिचित असणारे बाराव्या शतकातील एक देखणे शिल्पंमंदिर साकारलेले आहे. खजुराहोच्या कामशिल्पां प्रमाणे या मंदिरावर देखील कामशिल्पे मोठ्या प्रमाणात असल्याने या मंदिराला “जोगेश्वर कामदेव मंदिर” म्हणूनही ओळखले जाते.(जोगेश्वर महादेव मंदिर, देवळाणे)
पंधराव्या शतकात सुमारास मालेगाव तालुक्यातील सोनज ही पेठ लुटण्यासाठी रजपुत घराण्यांतील पवार जमातीतील देवसिंग व रामसिंग हे पराक्रमी बंधू जात असतांना ते या मंदिरात मुक्कामाला थांबले होते. यावेळी काही कारणाने दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला. यावेळी रामसिंग हा रागाने निघून गेला व देवसिंगला हा परिसर आवडल्यामुळे त्याने या ठिकाणी जंगल तोडून या परिसरात गाव वसवले. त्याच्या नावानुसार गावाचे देवळाणे हे नाव पडले अशी कथा स्थानिक नागरिक आपल्याला सांगतात.
कळसाचं नंतर पुन्हा बांधकाम करून त्याला शेंद्री पिवळ्या रंगाने रंगवण्यात आले आहे. कोणी म्हणतो नवसपूर्तीसाठी कुणी गावकऱ्याने देवाला ‘कळस’ चढवला आहे, तर जाणकारांच्या मते ब्रिटिशकालीन पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली केलेला हा उद्योग आहे. पण या साऱ्या प्रकारामुळे मंदिराचे मूळ सौंदर्य हरवले आहे. या पूर्वाभिमुख मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशा स्वरूपाची आहे. तारकाकृती आकाराच्या अष्टकोनी दगडी चौथऱ्यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे.
सुरुवातीला मंदिराच्या बाहेर बसूनच मंदिराची बाह्यरचना पाहत भान हरपायला होते. मुखमंडपाच्या बाह्य भिंतीवर मैथुनशिल्पे, युगलशिल्पे, नागशिल्पे, मकरशिल्पं, भारवाहक यक्ष, कृष्ण-गोपिका लीला, वाद्य वाजवणारे यक्ष, शिव-पार्वती, गणपती, खांबांची नक्षीदार रचना, अंतराळ, सभामंडप, गर्भगृह या सर्वांवर अक्षरशः बारीक आणि नक्षीदार कलाकुसरीची रेलचेल आहे. सभामंडपात कोरलेला सारीपाटाचा खेळ असो, युद्धाचे प्रसंग असो किंवा पाना-फुलांचे अथवा भौमितिक नक्षीकाम सार काही अद्भुत आणि विलोभनीय. आपला हा पुरातन ठेवा पाहताना अगदी स्तिमित व्हायला होतं. प्राचीन भारतीयांची भान हरपून टाकणारी ही कलाकृती प्रत्येकाने एकदा अवश्य पहावी.
©️ रोहन गाडेकर