महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,358

पुरातन जोरी पाटील घराणे

By Discover Maharashtra Views: 1565 4 Min Read

पुरातन जोरी पाटील घराणे –

मुळशीतील ‘पौड’ या तालुक्याच्या गावापासून १० किमी अंतरावर वाघजाई डोंगराच्या पायथ्याशी ‘भादस’ गाव वसलेले आहे. मुळा नदीच्या तीरावरील ‘मौजे भादस बु. शिवकाळात उल्लेखले गेले आहे. या नावाने शिवशाहीतील कागदपत्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीत डोंगरकपारीतील राहणाऱ्या बलदंड आणि निष्ठावंत माणसांचे साहाय्य मिळवले. अशाच या गावचा ‘जोरी पाटील’ घराणा! त्यांचा पूर्णावस्थेत वाडा आज नसला तरी अवशेषरुपी गाव या  घराण्याच्या कार्यकर्तृत्त्वाची आठवण करुन देतात.पुरात.न जोरी पाटील घराणे

घडीव जोती व विस्तीर्ण पसाऱ्यावरुन वाडा आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्याच्या चौसोप्यांचे चिरे पडले आहेत. काही चिऱ्यांचा भैरवनाथाच्या मंदिराच्या जिर्णोध्दारात वापर झाला आहे. घोटीव, सुबकता, लांब-रुंद दगड पाहून वाड्याच्या रेखीव आकृतीची कल्पना येऊ शकते. मावळातील हा रांगडा पाटील किती साधा, पण भव्य वाड्यात राहून मुकादमीचा कारभार करीत असावा? या वाड्यात ब्रिटिश अमदानीत जिल्हा लोकल बोर्डाची शाळा होती. धान्याने भरलेली बैलगाडी वाड्यात जात होती.

गावाच्या तळ्याकाठी ‘मौजे भादस येथे आमची आंब्याची झाडे व तेथे बांधला होता.’ असा उल्लेख आढळतो.

सध्या मंदीरात ‘बाजी उर्फ छबाजी’ पाटील यांचे शिल्प आहे. यांची वाघजाई पालखी दरम्यान वाटेत त्यांनी वाघाशी झुंज दिल्याची आठवण हे शिल्प करुन देते. जवळच उध्वस्त महादेव मंदीर व बऱ्याच समाधी शिळा आहेत. भैरवनाथाच्या पायऱ्यांजवळ दोन वीरगळ, गजलक्ष्मी पाहायला मिळतात. जोरी-पाटील घराण्याच्या इतिहासाची साक्ष देण्यास या पुरेशा आहेत. गावातील वेदमूर्ती कर्वे भट या घराण्याला थोरल्या पेशव्यांनी सरदेशमुखीचे हक्क दिल्याचे पत्र आहे.

अशा भादस येथील जोरी पाटील या दुर्लक्षित घराण्याचा इतिहास सध्या सापडलेल्या त्यांच्याकडील कागदपत्रांवरुन समजतो.

ऐतिहासिक वास्तुरंग-

या घराण्याकडे शिवपूर्वकालाआधीपासून पाटीलकीचे वतन असल्याचे समजते. इ.स. १६१७ च्या महादजी गोसावी चिंचवडकर यांच्या कागदात जोरी मुकादम (पाटील) नत रुके पाऊण व २४ मण गला भात, मण पाऊण दिल्हे’ असा उल्लेख आहे. दुसरा उल्लेख खामगाव (खडकवासला भोसले पाटील वाडा) येथील १० आॕक्टोबर १६७५ च्या मजहरात ‘मालोजी बीन विठोजी जोरी मुकादम हे हजर’ असल्याचा उल्लेख आहे.

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत एका मजहरात हे वतनदार पाटील खरे असल्याचा निवाडा झाल्याचा दिसतो. भादस आणि संभवे या गावातील कृष्णाजी व सामजी या दोन भावांत झालेल्या तंट्यात तत्कालीन देशमुखांनी कान्होजी जोरी संभवेकर (ता. मुळशी) यांना वतन करुन दिले होते. तेव्हा देशमुख , देशपांडे व जमेदार व महालातून सडे (साक्षीपत्र) आणवून कृष्णाजी सामजी जे पेशजीपासून वतनदार आहेत असा मजहर  छ. संभाजी महाराजांसमोर झाला. सामजी यास डोंगरगाव सीमेस वसाहत करुन दिली. (सध्याच्या कोळवणजवळील डोंगरगावच्या जोरी पाटलांकडे घराण्याचे कागद आहेत).

वरील वाद पुन्हा पेशवाईत उद्भवला. संभवेकरांबरोबर वाद विकोपास जाऊन यापूर्वी सामजी आपसातल्या वादात भादस डोंगरातील खिंडीत मारला गेला.(वीरखंड). थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत एका आज्ञापत्रात मुकादम जोरी पाटील-भादस यांना सरदेशमुखी, चौथाईच्या अमलाचा उल्लेख आढळतो. तसेच दरोबस्त गाव असल्याची कागदपत्रे आहेत. वरील भादस बु.- संभवे वाद श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत मिटला. १८३२ सालच्या एका आज्ञापत्रात पवन मावळातील मौजे मुगावडे या गावच्या माझिरे पाटलास गुन्ह्यासंबंंधी पकडून आणण्याचे एक आज्ञापत्र उपलब्ध आहे. सरदेशमुखीच्या हक्कांचा, ब्रिटिश अमदानीतील कंपनी सरकारचा चलनासंबंधाचा, गुन्हेगार पकडण्याचा जाहिरनामा या कागदांत आढळतो.

‘आळवस’ गाव मुळशी धरणात गेले. पूर्वी हे बाजारपेठेचे ठिकाण होते. तेथे मोठेमोठे व्यापारी होते. १८३० साली तिथे पडलेल्या दरोड्याबाबत सरकारी शिबंदीला मदत करण्यासाठी जोरी पाटलांना ताकीदनामा दिल्याचा कागद आजही पाहायला मिळतो.

यावरुन या घराण्याकडे इलाख्याची जबाबदारी होती हे सिद्ध होते. हा घराणा या भागातील मातब्बर घराणा होता.

मुळा नदीच्या तीरी जमिनीची वतनपत्रे असून त्यात जोरी पाटलांची तीन गावे वसली आहेत. भोरकर सचिवांचे इलाख्यास लागूनच ही गावे वसली आहेत. सचिवांचे कोळवण हे महालाचे गाव डोंगरगावजवळ असून महालाच्या कचेरीचा वाडा अजूनही सुस्थितीत पाहता येतो.

वाघजाई देवीच्या उत्सवात भादस चे जोरी पाटील व डोंगरगावचे जोरी पाटील यांत देवीचा गळाचा वाद होऊन लढाई झाली (१८४२) . एकमेकांवर हत्यारे चालवल्याने कंपनी सरकारने अठरा जणांना कैद केली होती. जोरी पाटील घराणा सेनापती दाभाडे तळेगावकर व बडोदेकर गायकवाड यांच्या अखत्यारित कामगिरी करत असावा असे यांच्या संस्थानच्या स्टँम्प पेपवरील कागद सांगतो.

साभार विकास चौधरी

फोटो – भादस गाव ऐतिहासिक अवशेष, ता. मुळशी जि. पुणे

Leave a Comment