जोशी श्रीराम मंदिर, पुणे –
वीर मारुती मंदिराकडून शनिवारवाड्याकडे जाताना रस्त्यात उजव्या हाताला एक छोटे पेशवेकालीन मंदिर आहे. तेच जोशी श्रीराम मंदिर. हे मंदिर अंदाजे शके १७७९मध्ये हे बांधले गेले. मंदिर उत्तराभिमुख असून, मंदिराला ४’ X ४’ फुटांचा छोटा व दगडी गाभारा आहे. एका दगडी नक्षीदार लाकडाच्या देव्हाऱ्यात अंदाजे दीड फुटांच्या देखण्या संगमरवरी रामलक्ष्मणाच्या मूर्ती उभ्या आहेत. मूर्तीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे. पेशवेकालीन मूर्ती भंगल्यामुळे त्यांच्या जागी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यालाही शंभर वर्षे उलटून गेली आहेत.
शके १८६१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. गाभाऱ्याच्या समोरचा सभामंडप अंदाजे २२’ X ३०’ फुटांचा असून, नक्षीदार लाकडी कमानीमुळे तो अधिक आकर्षक वाटतो. सभामंडपात रामासमोर मारुतीची छोटीशी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला एका कोनाड्यात विठ्ठल रुक्मिणीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
रामनवमी दिवशी रामाची उत्सवमूर्ती पाळण्यात ठेवतात व रामजन्माच्या कीर्तनानंतर पाळणा म्हणून रामजन्म केला जातो. सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. तुळशीबागेतील रामाच्या पादुका रामनवमी दिवशी या मंदिरात रामाला भेटायला येतात. द्वादशीला सूर्योदयापूर्वी पाऊलघडीचे कीर्तन असते. राज्याभिषेक सोहळाही असतो. यानंतर उत्सवाची समाप्ती होते. सर्व जोशी बंधू व त्यांचा परिवार हा उत्सव साजरा करतात.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/SriJdcDnvffk1pXR6
आठवणी इतिहासाच्या