कैलास: एक अभिजात शिल्पवैभव –
कैलास..एक अद्भुत अवर्णनीय पाषाणाला बोलकी करणारी शिल्पकला…कलाकाराच्या कल्पनाशक्तीला मुर्तरूप देऊन साकारलेला प्रचंड देखावा…केवढे हे अद्भुत शिल्पवैभव !! केवढे हे अथक परिश्रम!!
खरोखरच ”कैलास” म्हणजे एक अद्वितीय शिल्पकलेचे प्रतिक आहे….केवळ एकाच सलग प्रस्तरातून निर्माण केलेला कैलास पाहण्यास,दोन डोळे ही अपुरे पडल्याचा भास होतो…इतकी सुंदर,अप्रतिम वास्तू न्याहाळताना,आपण किती सामान्य आणि क्षुल्लक आहोत,असा विचार नकळत मनी डोकावतो…
लेणी म्हणजेच लयनस्थापत्य..लेण म्हणजे दागिना…म्हणजेच निसर्गात कोरलेला अनमोल दागिना होय…लेणी म्हटल की क्षणार्धात डोळ्यासमोर अजिंठा वेरूळ लेण्यांची चित्रे तरळतात… वेरूळ येथील लेणींमध्ये जैन,बौद्ध व हिंदू अशा तिन्ही धर्मीय लेण्यांचा मिलाफ आढळून येतो…येथील 16 क्रमांकाची लेणी म्हणजेच कैलास मंदिर होय..या मंदिराची रचना ही उभट तासून झालेली असून,त्यास असंख्य कलाकारांच्या हातांचे साहाय्य लाभले आहे..पर्वताच्या वरील बाजूने पाहीले असता,कैलास म्हणजे ”एका तबकात मध्यभागी रत्नजडित अलंकार”ठेवल्यागत दिसून येते…सद्यकाळात काळाच्या ओघात बरीच शिल्प जरी ढासळत्या अवस्थेत असली तरी,त्यातल जिवंतपण अजून ही तटस्थ आहे..प्रत्येक पाषाण आपल अस्तित्व टिकवून आपली एक वेगळी कहाणी सांगत आहे..खरे पाहता,पाषाण ही बोलतात,गरज आहे ती फक्त आपल्या दृष्टीकोनाची,आपल्या रसिकतेची..
रामायण,महाभारत या महाकाव्यांतील काही प्रसंग,वेद-पुराणांतील कथा,प्रसंगांना पाषाणाच्या साहाय्याने मुर्तरूप दिले आहे..या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात शिवाच्या विविध रूपांचे शिल्पांकन केल्याचे दिसून येते,त्यात विवाह प्रसंग,शिव-पार्वती संवाद इ.बाबींची तरतूद केली आहे..त्याचप्रमाणे येथे विविध प्रकारचे भारवाहक ही दिसून येतात..मंदिराच्या तीनही बाजूस पूर्णाकृती गजराज कोरण्यात आले आहेत..
रावणाची शिव तपश्चर्या,सीताहरणासमयी जटायू पक्षासोबत केलेला संघर्ष,घृष्णेश्वराची मूळकथा, अंधकासूर,वराहदेव,नटराज मूर्ती,युगूल शिल्पे,कामशिल्पे,द्वारशाखा,व्याल-मकरव्याल,वितानावरील कमलपुष्प,सप्तमातृका पट,कुबेर,चामुंडा,महाकाल,मद्यकुंभासहीत दासी,गंधर्व,विष्णू मूर्ती,स्त्रीशिल्पे,इ. बाबींचे शिल्पांकन अत्यंत कलाकुसरीने केले आहे..मंदिराच्या बाह्य भागात 38 पूर्णाकृती स्तंभ तर काही अर्धस्तंभ आहेत..मंदिराच्या दोन्ही बाजूस सुंदर शिल्पांकन केलेले कैलासचे दोन किर्तीस्तंभ आजही आपले आगळेवेगळे अस्तित्व टिकवून तटस्थ आहेत..
लेणी च्या मध्यभागी मंदिराची रचना असून,वर जाण्यास दोन्ही बाजूने पायर्या आहेत..वरील प्रांगणात भव्य सभागृहे आहेत,गर्भगृहात शिवलिंग असून त्यासमोरील सभागृहात मोठमोठी स्तंभ आहेत,त्या स्तंभांवर नाजूक कमलपुष्प,पदक,मयूर इ.चे शिल्पांकन केले आहे..गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणा पथ असून,त्या पथावर लहान आकाराची पाच मंदिर आहेत,त्यास ”पंचायतम”असे म्हणतात..त्यात कुठलीच देवता दिसून येत नाही..स्तंभांनी समाविष्ट असलेल्या सभागृहाच्या समोर लहानसे प्रांगण असून,त्याच्या वितानावर रेखीव कमलपुष्प कोरले आहे..त्यासमोरील भागात नंदीकरीता प्रशस्त असे सभागृह आहे..या सभागृहास दोन गवाक्षं असून,त्यातून किर्तीस्तंभाचा देखावा दिसतो..त्यापुढे सलग तीन दालनं असून,त्या दालनातून पुढे गेले असता,डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूस प्रशस्त प्रांगण आढळते..या प्रांगणात थांबून कैलासाचे प्रचंड शिल्पवैभव निरखता येते..असे जरी कैलासाचे ओझरते रूप असले,तरी ”कैलास” या अथांग व आढेवेढे असलेल्या विषयाच अध्ययन कठीण असलं तरी अशक्य मात्र मुळीच नाही..
-Shrimala K.G