महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,233

कैलासगड

By Discover Maharashtra Views: 4417 6 Min Read

कैलासगड

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा – खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून तीन घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुधागड,सरसगड,मृगगड तर वरील भागात असणारे घनगड,तेलबैला कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात.

कैलासगड हा यातील एक अपरिचित किल्ला मुळशी धरणाच्या परिसरात वसलेला आहे. सामान्यांना तर सोडाच पण ब-याच डोंगरभटक्यानासुद्धा हा किल्ला माहीत नाही. किल्ल्याचे स्थान,आकार आणि त्यावरील अवशेष पाहाता हा टेहळणीचा किल्ला होता. वडुस्ते हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लोणावळ्यापासून भुशी धरण कोरीगड-भांबर्डे–अहिरवाडी- पिंप्री फाटा- वांद्रे मार्गे ५१ किमी अंतरावर आहे. या मार्गावर रहदारी फ़ारशी नसल्याने खाजगी वहानाने गेलेले चांगले. या रस्त्यावर वडुस्ते गावाच्या पुढे दोन किलोमीटरवर कैलास गडाची खिंड आहे. या ठिकाणी किल्ले कैलासगड उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर असा फलक लावलेला आहे. येथे उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे. या वाटेने एक दीड तासात गडावर पोहोचता येते.

गडाच्या वाटेची सुरवात होते तिथे उजवाबाजूला कैलासगडचा डोंगर आणि डाव्या बाजूला पाण्याची टाकी असलेली छोटी टेकडी आहे. गडाच्या डोंगराची अखंड सोंड असणारा हा भाग रस्त्यासाठी खोदलेल्या खिंडीमुळे विभागुन डाव्या बाजूला छोटी टेकडी आणि उजव्या बाजूला गड असा झाला आहे. गडावर जाण्यासाठी एकच ठळक वाट असुन चुकण्याचा शक्यता कमी आहे. वाटेतील झाडावर गडावर जाणारा मार्ग दाखवणारे बाणाचे चिन्ह लावलेले आहेत. गड चढायला सुरवात करताच १५ मिनिटात आपण एका दरीजवळ पोहोचतो. हा झाला पहिला टप्पा. येथुन मागे वळून पाहिल्यावर तिन्ही बाजूंना मुळशी जलाशय पसरलेला दिसतो. इथे पुढे असलेली दुसरी टेकडी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली आहे. हि टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत ३० मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. इथे आपला दुसरा टप्पा संपतो.

टेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याच्या डोंगराचा सरळसोट कडा खाली उतरलेला आहे. एका टेकाडाचा टप्पा पार करून अजून दोन टप्पे पार केले की पुढची वाट वर न जाता गड उजवीकडे ठेवून वळसा घालू लागते. काही ठिकाणी सरळ रेषेत असणारी ही वाट मध्येच खडय़ा चढणीची आहे. एका बाजूला खोल दरी, पायाखालचा मुरमाड घसारा आणि दुसऱ्या बाजुस डोंगराचा कडा यामुळे ही वाट दमछाक करणारी व नवशिक्या भटक्यांसाठी धोकादायक आहे. किल्ल्याचा डोंगराला वळसा घालत डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत एक तासात आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. पठारावर उजव्या बाजूला भगवा झेंडा लावलेला आहे. त्याच्या पुढे एक पावसाळी साचपाण्याचा छोटासा सुकलेला तलाव दिसतो. या टोकावरून समोरच अस्ताव्यस्त पसरलेले मुळशी धरण, धरणाची भिंत आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेला हिरवागार परिसर दिसतो तर डावीकडे घनगड आणि तैलबैला दिसतो. या पठारावरून दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.

पठाराच्या विरुध्द बाजूला एक छोट टेकाड आहे. त्यावर चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक खाली उतरणारी पायवाट दिसते. सध्या हि वाट अतिशय धोकादायक झालेली असुन दोरीशिवाय या वाटेने जाणे शक्य नाही. या अवघड वाटेने ५ मिनिटे उतरल्यावर गडाच्या भिंतीत कोरलेली लेण्यासारखी गुहांमधील पाण्याची टाकी पाहता येतात. इथे अर्धवट खोदलेली गुहा आहे त्यात पाणी साचून पाण्याची टाकी झाली असावी असे वाटते. गडाच्या निर्मितीचा इतिहास शेकडो वर्ष मागे नेणारी ही टाकी सध्या वापरात नसल्यानं यातलं पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून परत पठारावर येऊन डावीकडच्या टेकाडावर चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक पडकी वास्तू दिसते. हे बहुधा देवीचे स्थान असावे कारण स्थानिक लोक आजही या ठिकाणी देवीचे ओटीचे समान ठेवतात. समोरच उध्वस्त घरांचे काही चौथरे पाहायला मिळतात. निघाल्यापासून दीड तासात आपण गडावर या ठिकाणी पोहोचतो. येथुन उजव्या बाजूला वर गडाच्या माथ्यावर जाण्यास वाट आहे. माथ्यावर काहीही अवशेष नाही पण येथुन संपुर्ण गड व त्याचा परिसर नजरेस पडतो.

पश्चिमेकडे बांधकाम अवशेषांचे ढीगच ढीग दिसतात पण कुठल्याही वास्तुचा अंदाज बांधता येत नाही इतकं दुर्लक्ष या किल्ल्याबाबत झालं आहे. गडावर किल्ला म्हणता येईल असं फारस काही नाही. गडाला कुठेही तटबंदी आणि बुरुज असल्याचे दिसत नाही. माथ्यावरून पुन्हा खाली वास्तुजवळ येऊन पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजूला २ ते ३ फुटांची एक रचीव दगडांची भिंत घातलेली दिसते. त्याच्या आत उघडयावर कातळावर कोरलेल शिवलिंग आहे. गडाच्या दक्षिणेला अजुन एक डोंगर आडवा पसरला असुन गडाचा डोंगर त्या दुसऱ्या डोंगराला जुळलेला आहे. या जुळलेल्या भागाच्या टोकाला काही दगड तटबंदीसारखे एकावर एक रचलेले आढळतात. बहुतेक गडाचा पसारा इथवरच असावा कारण पुढे काही अवशेष किंवा वास्तु काहीच दिसत नाही. इथे आपली गड प्रदक्षिणा संपते. गडावर फिरायला ३० मिनिटे पुरतात. येथुन भादसकोंडा या दुसऱ्या गावात उतरायला वाट आहे. भादसकोंडा गावाच्या पायवाटेने खाली उतरल्यावर रस्त्याच्या कडेला वाघदेवाचे मंदीराच्या वरील बाजुस एक गुहा आहे. ती पाहून डांबरी रस्त्याने आपण १० मिनिटात परत खिंडीपाशी पोहोचतो.

कैलासगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. किल्ल्यातील टाक्यावरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख ताराराणीच्या काळात इ.स. १७०६ मध्ये शंकराजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या एका पत्रात मिळतो. या पत्रात त्यांना लिहिले आहे हणमंतराउ फाटक हल्फ हजारी यासि शंकराजी नारायण सचिव… तुम्ही पुर्वी किले कैलासगड व किले सिंहगड गानिमापासून हस्तगत केले. त्याचा सरंजाम पूर्वी तुमचा हुजुरुत करून दिला. तो तुमच्या तुम्हास करारा आहे. यावरून इ.स. १७०६ पुर्वी हणमंतराव फाटकांनी कैलासगड जिंकला हे स्पष्ट होते. महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असलेला स्वराज्य निर्मितीचा इतिहास येथल्या बलदंड आणि राकट अशा गड-कोटांवर घडला. एकेकाळी वैभवात नांदणारे हेच गड-किल्ले दिवसागणिक ढासळत चालले आहेत. गड-किल्ले फिरणा-या भटक्या डोंगरमित्रांनी इथे एकदा तरी भेट दयावी. पावसाळ्याच्या दिवसात मात्र या किल्ल्यावर जपून भ्रमंती करावी.

सुरेश निंबाळकर

Leave a Comment