महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,56,096

भारतीय शिल्पकलेला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न

By Discover Maharashtra Views: 1294 2 Min Read

भारतीय शिल्पकलेला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न – कैलास मंदिर :

कैलास मंदिराची ही मूळ वास्तूच इतकी देखणी, प्रमाणबद्ध आणि भव्य आहे की मंदिराच्या बाह्य भिंतीवर एकही शिल्प कोरलेले नसते तरी आपण ह्या मंदिराच्या भव्यतेने दिपूनच गेलो असतो. पण आपले पूर्वज इतके अल्पसंतुष्ट नव्हते म्हणून त्यांनी मुळातच सुंदर असलेल्या ह्या मंदिराला उत्कृष्ट शिल्पकलेचा साज चढवलेला आहे.

गोपुराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर, गरुडवाहन विष्णू, भगवान विष्णूचा वराह अवतार, अर्जुन-सुभद्रा विवाह अशांसारख्या पौराणिक देखाव्यांचे चित्रण आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला रामायण व महाभारताचे कथानक कोरलेले आहे. या सर्वात शिवपार्वतीचे अधिष्ठान असा कैलास पर्वत आपल्या बाहूने गदगदा हलवू पाहणारा दशानन हे शिल्पं अप्रतिम आहे.

श्री शिवशंकरांच्या मूर्तींचे जितके म्हणून विविध शिल्पाविष्कार शिवागम ग्रंथात वर्णिलेले आहेत, त्यापैकी बहुतेक आपल्याला वेरूळच्या कैलास मंदिरात सापडतात. पार्वतीशी विवाह करणारा कल्याणसुंदर शिव, मार्कंडेयाला यमपाशातून सोडवणारी मार्कंडेयानुग्रह मूर्ती, रावणाचे गर्वहरण करणारे शिव, कार्तिकेयासहित सोमस्कंदशिवमूर्ती, तांडव करणारी तांडवमूर्ती, अंधकासुराचा वध करणारे रौद्र शिव, त्रिपुरान्तकशिवमूर्ती असे शिवमूर्तींचे सर्व प्रकार ह्या मंदिरात अंकन केलेले आहेत.

शिल्पकारांच्या अनेक पिढ्या ह्या कामात खपल्या, पण इतके भव्य-दिव्य काम करून देखील त्यांनी कुठेही आपली नावे ह्या मंदिरात कोरून ठेवलेली नाहीत. तिथल्या कलाकारांच्या छिन्नी-हातोड्याच्या एकेक घावागणिक जीव ओवाळून टाकावा इतकं त्यांचं थोर कसब आहे. आपण घरी परतलो तरी डोळ्यांसमोर दिसतात ती कैलास लेण्यांमधली शिल्पे. विख्यात मूर्तीतज्ञ डॉ. देगलुरकरांच्या शब्दात सांगायचं तर नुसते ‘शिल्पबंबाळ’ होऊन परततो आपण!

Leave a Comment