कैलास मंदिर, वेरुळ –
“विमानांतून जानाऱ्या देवांनी कैलासाचे देवालय पाहिले आणि येथील सौंदर्य याहून विस्मित झालेले देव चर्चा करू लागले, की इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. कारण कृत्रिम गोष्टीमध्ये इतके सौंदर्य कसे बरे असेल! असा विस्मय देवांना पडला, ज्या शिल्पीने हे घडविले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, ही कलाकृती मी कशी बरे निर्माण केली हेच माझे मला कळत नाही.”(कैलास मंदिर, वेरुळ)
वरील उल्लेख राष्ट्रकूटवंशीय राजा कर्क दुसरा याच्या ९ व्या शतकात बडोदा येथे सापडलेल्या ताम्रपटातील आहे. याच ताम्रपटात दंतिदुर्गानंतर आलेला राजा कृष्ण पहिला याने ८ व्या शतकात कैलास लेणे कोरले तसेच यातील शिवलिंग हिरे-माणकांनी सजविले असाही उल्लेख आहे. कैलास मंदिराचे वर्णन करताना शब्द तोकडे पडतात. विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर अर्जुन जसा भांबावला तशीच स्थिती जाणत्या प्रेक्षकाची येथे होते.
जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या वेरुळ च्या कैलास मंदिराला स्थापत्यकलेतलं एक शिल्प म्हटलं जातं; कारण ते पर्वताच्या उतरणीवर एका २०० फूट लांब, १५० फूट रुंद आणि १०० फूट उंच अशा प्रचंड खडकातून एकसंध मंदिर आतून बाहेरून कोरून काढलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्या प्रमाणे “चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले आधी कळस मग पाया रे” या वर्णनानुसार हे एकाच कातळात प्रचंड मोठे असे शैलमंदिर बांधले आहे. याची बांधणी द्राविड पद्धतीची असून प्रवेशद्वारी दुमजली गोपुर असून त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर दिक्पालांसहित शिवाच्या विविध रूपांतील मूर्ती कोरलेल्या आहेत. आतमध्ये मंदिरांच्या दोन्ही बाजूंना दोन प्रशस्त हत्ती झुलत असून प्रत्येक हत्तीच्या बाजूला एक एक भव्य स्तंभ आहे. गोपुर, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मुख्य मंदिराची रचना आहे. कैलास मंदिर हे भारतवर्षातील अनामिक कलाकारांनी भक्तवत्सल शिवाला वाहिलेले एक सुकुमार कमलपुष्प आहे.
Rohan Gadekar