काकतीय | काकडे राजवंश –
काकतीय अर्थात काकडे हा इ.सनाच्या अकराव्या शतकाच्या अंताला अथवा बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात दक्षिणेत उदयाला पावलेला एक क्षत्रिय मराठा राजवंश होय. या घराण्याने चौदाव्या शतकापर्यंत आपल्या घराण्याची सत्ता टिकवून ठेवलेली असली तरी त्यांना म्हणावा तेवढ्या भूप्रदेशात साम्राज्यविस्तार करता न आल्याने इतिहास अभ्यासक या घराण्याकडे दक्षिणेतील मोठा राजवंश म्हणून बघत नसल्याचे जाणवते.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट उत्तरकालीन कल्याण चाळुक्य साळुंखे राजांच्या उत्तेजनाने वारंगळचे काकतीय क्षत्रिय घराणे उदयास येऊन भरभराटीस पावले. काकतीय घराणे म्हणजे महाराष्ट्रातील या राजवंशाचे आजचे वंशज असलेले काकडे हे मराठा घराणे होय. वारंगळचे काकतीय कल्याणच्या चाळुक्यांचे मांडलिक होते. सोमेश्वर साळुंखे प्रथम याने केलेल्या कोकण आणि चक्रकोटच्या मोहिमेत पहिल्या प्रोल काकतीयाने सहभाग नोंदवून विशेष पराक्रम गाजवला होता. त्यामुळे सोमेश्वर चाळुक्याने काकतीयास अनमकोंडा (वरंगळ) प्रदेश बहाल केला होता. तेव्हापासून काकतीयांची इतिहासातील ओळख वारंगळचे काकतीय अशीच झालेली दिसते.
काकतीय घराण्याच्या इतिहासातील नोंदीचा उल्लेख सोमेश्वर साळुंखे प्रथम याच्या कारकिर्दीपासून बघावयास मिळतो. सोमेश्वर याने शिलाहारांना कायमचा धडा शिकविण्यासाठी जी मोहीम हाती घेतली, त्यात काकतीयांचा समावेश होता. काकतीयांनी चोळाविरुद्धच्या मोहिमांत सहाव्या विक्रमादित्य साळुंखेस सुद्धा मोलाचे सहाय्य केले होते. त्याचे बक्षीस म्हणून विक्रमादित्याने प्रोल काकतीय याचा उत्तराधिकारी बेट याला सव्विनाडू-१००० हा प्रदेश देऊन त्याची मांडलिक म्हणून नेमणूक केली होती.
काकतीयांनी राजे साळुंखे चाळुक्यांचे एकनिष्ठ मांडलिक म्हणून विक्रमादित्य साळुंखे षष्ठ राजाची सेवा केली त्याबदल्यात चाळुक्यांच्या आश्रयाखाली काकतीयांची सत्ता दृढ होऊन त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेत वाढ होत गेली. नंतरच्या म्हणजे विक्रमादित्य याच्या नातवाच्या काळात चाळुक्यांचा मांडलिक असलेल्या हनमकोंडा येथील काकतीय दुसरा प्रोल याने कल्याणवर आक्रमण करून तिसऱ्या तैलाचा पराभव केला होता. पुढील काळात सोमेश्वर चौथा याच्या काळात देखील काकतीयांची चाळुक्य प्रदेशावर आक्रमणे सुरूच होती. काकतीय राजा दुसरा प्रोल याने चाळुक्यांचे सामंत असलेल्या कोंडापल्लीच्या गोविंद दंडनायक याच्या ताब्यातील प्रदेशावर आक्रमण करून ते आपल्या राज्यास जोडले होते.
देवगिरीचा यादवराजा दुसरा मल्लुगी याने काकतीयांच्या प्रदेशावर आक्रमण केले, परंतु काकतीय रुद्रदेवाच्या अनकोंडा येथील शिलालेखानुसार त्याने मल्लगीचा पराभव केला होता. यादवराजा पाचव्या भिल्लमाच्या काळात चाळुक्यांचे पूर्वीचे मांडलिक असलेले काकतीय पूर्वेकडून आक्रमण करत होते हे तात्कालीन अभिलेखिय साधनावरून लक्षात येते. यादवराजा जैतुगी याच्या काळात त्याच्या राज्याच्या पूर्वेकडील भागातील समकालीन राजा काकतीय रूद्र हा होता. हा काकतीय राजा त्याच्या राज्याचा पश्चिमेकडे विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होता. होयसळ बल्लाळाने जैतुगीचा पराभव केला त्यावेळी काकतीयांनी सरहद्दीवरील यादवांच्या प्रदेशावर आक्रमण केले होते. यादव राजांनीही या आक्रमणाचे चोख प्रत्युत्तर दिले होते. बहुतेक या युद्धात काकतीय राजा रूद्रदेव मारला गेला असावा. ही लढाई इ.स.११९६ च्या आसपास झालेली असावी.
सतीशकुमार सोळंके-देशमुख