महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,625

कलाडगड

By Discover Maharashtra Views: 3699 4 Min Read

कलाडगड

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी साधले घाटातुन हरीश्चंद्रगडावर येणाऱ्या मार्गावर तसेच मुळा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी साधले घाटाच्या माथ्यावर कलाडगड हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. हरिश्चंद्रगडाच्या पश्चिमेला कलाडगड आहे. गडाची एकुण रचना पहाता हा किल्ला हरिश्चंद्रगडाला समकालीन असावा.

कलाडगडला भेट दयायला मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ-कोथळे-पाचनई किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर- लव्हाळी ओतुर या मार्गाने पाचनई गावात जावे लागते. पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले असुन या गावाच्या समोरच मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला एक डोंगर दिसतो तोच कलाडगड. कलाडगडच्या पायथ्याचे पेठेवाडी गाव पाचनई पासुन ७ कि.मी.वर असुन किल्ल्यावर जाणारी वाट गावाच्या अलीकडे म्हणजे पाचनई पासुन ५ किमीवर आहे. हा किल्ला एका बाजूला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याचा मार्ग कठीण असल्यामुळे येथे फारसा वावर नाही परंतु त्याच्या सभोवताली असणारे निसर्गसौंदर्य आणि जनजीवन पहाण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दिली पाहिजे.

पाचनई गावातुन चालत तासाभरात तर गाडीने १५ मिनिटात आपण कलाडगडाच्या पायथ्याला पोहचतो. कलाडगडाच्या उत्तर-दक्षिण पसरलेल्या धारेवर दक्षिणेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. पेठेच्या वाडीकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुला वनखात्याने सिमेंटचा निवारा बांधला आहे. येथे एका झाडाखालून गडाची पायवाट वर जाताना दिसते. गडावरच्या भैरोबाला स्थानिक गावकरी जात असल्याने गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. कलाडगड आहे लहानसा पण पहिल्या पाउलापासून जी चढण सुरु होते ती अगदी माथा गाठेपर्यंत. साधारण १० मिनिटे झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. इथुन माथ्यावर जाईपर्यंत तीन ठिकाणी खड्या चढाईचे कातळ-टप्पे लागतात. पहिल्या टप्प्यात सुरवातीला काही दगडाना शेंदुर फासुन देवपण देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यातच कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या पार करून साधारण अर्ध्या तासाची उभी चढण असलेला दुसरा टप्पा पार करून आपण एका कातळ भिंतीसमोर खडकात खोदलेल्या तिसऱ्या टप्प्यातील पायऱ्यापाशी येऊन पोहोचतो.

जेमतेम पाउल ठेवता येईल अशा या पायऱ्या कातळात तिरकस कोरलल्या आहेत. या पायऱ्यावर पाय रोवत व हातांचा आधार घेत समोर आलेली कातळभिंत सांभाळून पार करत आपण एका चौकोनी जमिनीखाली खोदलेल्या भैरोबाच्या गुहेपाशी पोहोचतो. जमिनीखाली खडकात खोदलेल्या या गुहेत शेंदूर फासलेला भैरोबा असुन बाहेरील बाजुस उघडयावर २ सर्पशिल्प ठेवलेली दिसतात. गुहेच्या वरील अंगास उजव्या बाजुस काही अंतरावर पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन या टाक्याच्या अलीकडे एका उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. पायथ्यापासून येथे यायला साधारण १ तास लागतो. कलाडगगडाची उंची समुद्रसपाटीपासून ३४०० फुट असुन चिंचोळा माथा असलेला हा गड दक्षिणोत्तर साधारण ५ एकरवर पसरलेला आहे. भैरोबाचे दर्शन घेउन किल्ल्याच्या माथा उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत अरुंद पायवाटेने दक्षिणेकडील सोंडेवर जाताना वाटेत दोन कातळातील खोदीव टाकी दिसतात. या टाक्या भंगलेल्या असुन त्यात दगड कोसळुन टाकी बुजलेली आहेत.

डावीकडील कड्यावर काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. येथुन पुढे गेल्यावर सोंडेच्या शेवटी एक छोटीशी घुमटी अन त्याच्यासमोर शेंदूर फासलेले दोन मोठे गोल दगड आहेत. याला वेताळाचा चाळा म्हणतात. येथुन मागे फिरल्यावर भंगलेल्या टाक्याकडून एक वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. ५ मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो. गडाचा माथा उत्तरेकडे अरुंद असुन दक्षिणेकडे रुंद आहे. दक्षिणेकडील या टोकाला ढालकाठीची म्हणजेच ध्वजस्तंभाची जागा व काही वास्तुंचे दगडी अवशेष तसेच एक साचपाण्याचे टाके दिसुन येते. माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबा डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, शिरपुंजे भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी एक तास लागतो. गडमाथा फिरुन टाक्यांजवळ उतरावे आणि आल्या वाटेने परत फिरावे. गडावर पाणी नसल्याने पुरेसे पाणी सोबत बाळगावे तसेच पावसाळ्यात किल्ल्यावर जाणे टाळावे.

Leave a Comment