महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,356

कलानंदीगड | Kalanandigad Fort

Views: 4385
4 Min Read

कलानंदीगड | Kalanandigad Fort

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यात लहानशा आकाराचा व सोपी चढण असल्याने सहज पाहता येण्यासारखा पण दुर्लक्षित असा कलानंदीगड(Kalanandigad Fort) हा डोंगरी किल्ला वसला आहे. सभासद बखरीनुसार हा किल्ला शिवरायांनी बांधला आहे. तसेच गोव्याकडील पोर्तुगिज दप्तरात कलानिधी गडाचा वारंवार उल्लेख येतो. हा महाराष्ट्रात असला तरी इथे जाण्यासाठी बेळगाव मार्गे शिनोले-पाटने फाटयावरून कलिवडे गावात यावे. कलिवडे हे गडाचे पायथ्याचे गाव आहे.

कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावापासून शेतातून जाणाऱ्या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वाडीवर पोहचतो. ही वस्ती पार करुन पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो.या वाटेने जाताना विजेच्या ट्रान्सफोर्मरची खूण लक्षात ठेऊन उजवीकडील पायवाटेवर वळावे अन्यथा हा रस्ता फिरुन गडावर जात असल्याने आपला गडावर जाण्याचा एक तास वाढतो. पण पावसाळयात या रस्त्याने गेल्यास निसर्गाचे अतिशय सुंदर दर्शन होते. कारवीच्या छोटया छोट्या हिरव्या झाडांनी पुर्ण डोंगर व हि वाट हिरवीगार झालेली असते.

पायवाटेने गेल्यावर डोंगराच्या पहिल्या टप्प्यात एक खिंड लागते हि बहुधा टेहळणीची जागा अथवा गडाचे मेट असावे कारण या ठिकाणी एका उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. हे ओलांडून आणखी १५ मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या दरवाज्यात पोहचतो. कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. उजव्या भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे तर दरवाज्यासमोर डाव्या भागात आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात.

समोरच कमी उंचीचे व पसरट छप्पर असलेले वैशिष्टय़पूर्ण मंदिर संकुल आहे. यात एक मंदिर असुन त्यात शिवलिंग आहे व त्यामागे भैरवाची मुर्ती आहे याशिवाय मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या दारात होयसाळ शैलीतील गणेशाची मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन व एक दगडात बांधलेली ओवारी आहे. अशीच दोन वृन्दावने दूरसंचार खात्याचा मनोरा असलेल्या भागात आहेत. .मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायऱ्याचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे.या विहिर संकुलात दगडात कोरलेल्या अनेक पायऱ्या, देवळया व चौथरे दिसतात.

विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील समोरचे व उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणावरून पुढे आल्यावर किल्ल्याचे शेवटचे टोक लागते.या तटालगत समोरच्या डोंगराची सोंड आल्याने तटाखाली मैदान झाले आहे.या बाजूने शत्रूचा किल्ल्यात प्रवेश होणे सहज शक्य असल्याने या ठिकाणी दोन मोठे बुरुज बांधून त्यावर तशाच मोठया तोफांची सोय करण्यात आलेली आहे पण किल्ल्यावर तोफा मात्र कुठेही नजरेस पडत नाही. यातील टोकाकडील बुरुजाच्या बाहेरील अंगास ढासळलेळले काही बांधकाम नजरेस पडते. गडाच्या या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. येथील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली आहे दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच मनोहारी दृष्य दिसते.

दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात तसेच दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. येथे एका ठिकाणी तटाला लागुनच असलेले जमीनीतील बांधकाम व पोकळी जाणवते. या ठिकाणी बहुदा गडाबाहेर विरूद्ध दिशेला बाहेर पडणारा चोर दरवाजा असावा. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.संपुर्ण किल्ला पाहून परत गावात येण्यास चार तास लागतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर

Leave a Comment