श्री काळाराम मंदिर…
नाशिक क्षेत्रातील श्री काळाराम मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता, त्या ठिकाणी पुरातन मंदिर होते. हया पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार पेशव्यांचे सरदार श्री. ओढेकर यांनी केला.
इ.स.१७७८ ते १७९० म्हणजेच १२ वर्षे मंदिराचे बांधकाम चालले हाते. भव्य मंदिर व सभामंडप यासाठी २३ लाख रूपये खर्च झाल्याची नोंद आहे. हे मंदिर रामसेज येथील काळया दगडांचे बांधले असून अतिशय सुंदर व कलात्मक असे आहे.
मंदिराच्या चारही दिशांना भव्य द्वार आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत. तसेच मंदिराचा कळस सोन्याचा आहे. चैत्र शुध्द प्रतिपद (गुडीपाडवा) ते शुध्द नवमी (रामनवमीपर्यंत) ‘‘श्रीराम जन्मोत्सव‘‘ मोठया प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र शुध्द एकादशीला रामरथ व हनुमानरथाची यात्रा निघते. हया रथयात्रेचे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक नाशिकला येतात.
मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
काळाराम मंदिर सत्याग्रह : भारतातील दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २० मार्च इ.स. १९३० रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते.