काळाराम मंदिर, पंचवटी –
नाशिक येथील पंचवटी मधील काळाराम मंदिर हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे.
त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना “रघूनायका मागणे हेचि आता” हे पद येथेच सुचले.