महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,386

महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

Views: 1838
4 Min Read

महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे –

प्राचीन भारत देशात अनेक राजे आणि राजघराणी होऊन गेली.त्या काळात या राजघराण्याची मोठ्या दिमाखात आपली राजसत्ता उपभोगली,मात्र काळाच्या ओघात त्यांची राजसत्ता आणि इतिहास विस्मृतीत गेला.अशाच एका राजसत्तेपैकी एक राजघराण म्हणजे कलचुरी राजघराणे.

कलचुरी घराण्याच्या दोन शाखा राज्य करत होत्या. एक होती मध्य भारतात तर दुसरी दक्षिण भारतात. दक्षिण भारतातील शाखा कल्याणीचे कलचुरी घराणे म्हणून ओळखली जाई. या घराण्याने महाराष्ट्र व कर्नाटक भूभागावर राज्य केलं.कराड,सांगली,सोलापूर या भागात या कलचुरी राजांचे बरेचसे शिलालेख सापडतात त्यावरून दक्षिण महाराष्ट्रातले हे एक महत्त्वाचे राजघराणे होते.आणि त्यांची मंगळवेढा (सोलापूर) ही राजधानी होती.

माडगिहाळ (जि- सांगली;ता- जत) येथे सापडलेल्या शिलालेखावरून या कलचुरी घराण्याची वंशावळ समजते. ती अशी ज्ञात पुरुष कन्नम, याचा पुत्र राज,या राजला तीन पुत्र- अम्मुगि, संकम आणि जोगम्म , यातील जोगम्म याला हेम्माडी/ पेमार्डी नावाचा पुत्र होता. भाळवण(सांगली) येथील शिलालेखावरून असे समजते की, तो इ.स.११२८ च्या दरम्यान कल्याणी चालुक्य नृपती तृतीय सोमेश्वराचा मांडलिक म्हणून सध्याच्या विजापूर- जत भागातील तरडवाडीनाडू प्रदेशावर राज्य करत होता.कलचुरी राजा हेम्माडी / पेमार्डी याचे चालुक्य घराण्याशी वैवाहिक संबंध होते. चालुक्य नृपती तृतीय सोमेश्वर याची बहीण (म्हणजेच चालुक्य नृपती विक्रमादित्य (सहावा) व त्याची पट्टराणी चंद्रलेखा यांची एक कन्या) हीचा विवाह हेम्माडी/ पेमार्डी याचाशी झाला होता.या राजाची मंगळवेढा ही राजधानी होती.

मंगळवेढा,जत,खानापूर, विजापूर सारखी नगरे आज जरी दुष्काळी पट्यातली म्हणून ओळख असली तरी कधी काळी हा भाग राजे राजघराण्याच्या सुवर्ण पर्वातील महत्त्वाचा भाग होता.

हेम्माडी/ पेमार्डी याच्या नंतर त्याचा पुत्र बिज्जल हा इतिहास प्रसिद्ध,पराक्रमी कलचुरी नरेश होऊन गेला. बिज्जलाने आपणास “कळचुर्यकमळमार्तंड” म्हंटले आहे.आणि ते यथार्थ ही वाटते.कारण त्याच्यामुळेच दक्षिणेत कलचुरी वंश विख्यात झाला. देसिंगे बोरगाव येथे सापडलेल्या आणि केत गावूंड याने बांधलेल्या श्री पार्श्वदेव बस्तीला अन्नदान आणि जिर्णोद्धारसाठी बाबतच्या शिलालेखात महामंडलेश्वर बिज्जल बाबत माहिती मिळते. या जैन शिलालेखात बिज्जलाची स्तुती करून त्यास कलचुरी कुळातील दुर्दम्य सिंह असे म्हंटले आहे.

बिज्जल हा जैन धर्मानुयायी होता.असे ‘बसव पुराण’ आणि ‘चन्नबसव पुराण’ या वीर शैवांच्या व ‘बिज्जलदेवराय चरित्र’ या जैन ग्रंथात म्हंटले आहे. असे असले तरी बिज्जल आणि कलचुरी घराण्यातील राजांची धार्मिक सहिष्णुता दिसून येते. चालुक्य नृपती जगदेकमल्ल याच्या काळात बिज्जल याने अनेक मोठ्या लढायांत भाग घेऊन मोठा पराक्रम गाजवला होता.याच्या मुळे चालुक्य सत्ता उत्तरेत पसरण्यास मदत झाली होती.

जगदेकमल्ल नंतर त्याचा भाऊ तृतीय तैलप गादीवर आला.तो अत्यंत दुर्बल होता, राजशासन कौशल्य ही त्याच्याजवळ नव्हते. याच्या उलट बिज्जल अत्यंत पराक्रमी, महत्त्वकांक्षी आणि चतुर राजकारणी होता.इतिहास पाहिला तर दुर्बळाला राजा होण्याचा अधिकारच नाही अस दिसत. चालुक्य सत्ता दुर्बळ होताच बिज्जलाने याचा फायदा घेऊन चालुक्य राजधानी कल्याणीची सारी सूत्रे आपल्या हाती घेऊन तृतीय तैलप याला बाजूला केले (इ.स.११५६) आणि कलचुरी सत्ता स्थापन केली.त्रिभुवनमल्ल, भुजबल चक्रवर्ती, कळचुर्य चक्रवर्ती अशी बिरुदे स्वतःस लावून,स्वतःचे राजवर्ष ही सुरू केले.

देशिंगे बोरगाव येथील शिलालेखावरून बिज्जलाचा भाऊ मैळुगीदेव हा “कऱ्हाड ४०००” या विभागावर भाळवणी ( सांगली) येथून राज्य करत होता.

वीर शैव धर्माची स्थापना बिज्जल याच्या काळातच झाली.बिज्जलाचा मुख्य प्रधान बलदेव याचा भाचा बसवेश्र्वर यानी वीर शैव धर्माची स्थापना केली. बलदेवाने आपली मुलगीचा विवाह बसवशी लावून त्यास आपला जावई केला. बिज्जलानंतर त्याच्या पुत्रांनी क्रमाने कल्याणी येथून कलचुरी राज्य चालवलं.मात्र बिज्जला इतका पराक्रमी राजा कलचुरी राजघराण्यास पुन्हा मिळाला नाही.महाराष्ट्रातील असलेलं हे महत्त्वाचं घराणं आज मात्र इतिहासात लुप्त झाल आहे.

अश्या अनेक महाराष्ट्रीयन राज घराण्यांचा इतिहास माहीत असणे हे आपणास गर्वाचे असून महाराष्ट्रीय असल्याचा आम्हास अभिमान आहे.

संदर्भ: महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख – डॉ. वि. भि. कोलते.

शब्दांकन: श्री.वर्धमान श्रीपाल दिगंबरे

Leave a Comment