काळी जोगेश्वरी मंदिर, पुणे
श्रीमंत दगडूशेठ दत्त मंदिराच्या डाव्या हाताला असलेला रस्ता बुधवार पेठेत जातो, त्या रस्त्यावर १/२ दुकाने सोडली कि डाव्या हाताला एक बोळ लागतो. हा बोळ सरळ काळ्या जोगेश्वरीच्या मंदिरात नेतो.(काळी जोगेश्वरी मंदिर, पुणे)
जोगेश्वरी ही श्री काळभैरव पत्नी आहे. काळभैरव हे शंकराचे उग्र रूप आहे. जोगेश्वरीच्या देवळात काळभैरवाची मूर्ती असलेले हे एकमेव स्थान आहे. तसेच देवीची मूर्ती त्रिनेत्र व तिसरा डोळा आडवा असलेली आहे. अशा देवीच्या मूर्ती दुर्मीळ आहेत. मूर्ती काळ्या पाषाणातील असून सुमारे २।। ते ३ फूट उंच आहे. दगडी गाभाऱ्यात विराजमान झालेली ही मूर्ती चतुर्भुज व बसलेली आहे. मूर्तीच्या हातात चक्र, पद्म, शंख ही आयुधे आहेत. चौथा हात वरद मुद्रेत आहे. सध्याची मूर्ती १९५५ साली जयपूरहून घडवून आणलेली आहे. समोर सभा मंडपात श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती आहे. उत्तर पेशवाईत उभारलेल्या या मंदिराची मालकी देवदेवेश्वर संस्थान (पर्वती) यांच्याकडे आहे. संस्थानकडून मंदिराला वर्षासन मिळते. संस्थानकडून मंदिराला वर्षासन मिळते.
या मंदिराच्या स्थापनेचा निश्चित कालावधी माहिती नाही. परंतु पेशवे दफ्तरात या देवळाचा उल्लेख आढळतो. १९०२ साली या मंदिराची मालकी सरदार रास्ते यांच्याकडून भिडे कुटुंबीयांकडे आली. या भागास पूर्वी ‘काळं वावर’ म्हणत असत. त्यावरून किंवा काळ्या पाषाणातील मूर्ती म्हणून यास काळी जोगेश्वरी असे नाव पडले असावे.
संदर्भ :
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे शहरातली मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/zeg6au8cV59dS8vC6