महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,586

इतिहासाच्या पाऊलखुणा, कल्याण कोट

By Discover Maharashtra Views: 2756 4 Min Read

इतिहासाच्या पाऊलखुणा, कल्याण कोट –

कल्याणचे नाव प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहासात अनेकदा येत असते. प्राचीनकाळी कल्याण हे एक महत्त्वाचे बंदर होते. छत्रपति शिवाजी महाराजांनी कल्याणमध्ये आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली, उल्हास नदीच्या खाडीवर दुर्गाडी किल्ला बांधला. आज त्या जागी सिमेंटचे तटबुरुज बांधल्यामुळे दुर्गाडी किल्ला वाटत नाही. पण त्याव्यतिरिक्त कल्याण ला एक कोट होता.

कल्याण मोगलांकडे असताना, शहाजहानच्या काळात त्याचा मंत्री नवाब महातबरखानने संपूर्ण कल्याणभोवती कोट बांधला. या तटबंदीचे बांधकाम १६३० साली सुरू झाले व औरंगजेबाच्या काळात १६९५ला पूर्ण झाले. दोन हजार एकशे चोवीस वार लांबीची व चार ते सहा फूट रुंदीची ही तटबंदी खंदकाने संरक्षित असून खंदक तेहतीस फूट रुंद व वीस फूट खोल होता. तटबंदीत चार मोठे व सात लहान असे अकरा बुरुज आणि गांधार, बंदर, पनवेल, दिल्ली असे चार दरवाजे होते. या कोटाच्या आत सुमारे सत्तर एकराचा गावाचा परिसर होता. कोटाला लागून पेठ होती. छत्रपति शाहू महाराजांच्या काळात रामचंद्र महादेव चासकर यांनी १७१९ मध्ये कल्याण घेतले तेव्हाच्या एका पोर्तुगीज वृत्तान्तामध्ये कल्याणचे वर्णन आहे : ‘हे शहर म्हणजे एक किल्ला आहे. तेथे बारा चांगले बुरुज व फार खोल असा खंदक आहे.’

पुढे ब्रिटिशकाळात १८६५ मध्ये कल्याणच्या या कोटाची पूर्व व दक्षिणेकडची तटबंदी पाडण्यात आली व रस्ता बनवला. तर पश्चिमेकडील तटबंदी पाडल्यावर तिचे दगड कल्याण व ठाण्यात घरांचा पाया बांधण्यासाठी कस्टम अधिकाऱ्यांनी नेले. कल्याणच्या लालचौकीजवळ शारदा विद्यामंदिर मागे एका म्हशींच्या तबेल्याजवळ थोडीशी तटबंदी, त्यात जंग्या, बुजवलेला छोटासा दरवाजा आणि एक बुरुज असे कल्याणच्या कोटाचे अवशेष शिल्लक आहेत. Nikhil Karambelkar यांच्या पोस्टमुळे ही माहिती कळली. कल्याणला अनेकदा जाणे झाले त्यामुळे जरा उत्सुकता होती. नुकतेच काही दिवसांपूर्वी जाऊन शोधून या तटबंदीचे अवशेष पाहिले आणि मन विषण्ण झाले.

हे असे अवस्थेच्या गर्तेत गेलेल्या ऐतिहासिक गोष्टी धुंडाळण्याचे बरेवाईट अनुभव आहेत आणि निखिल करंबेळकरांच्या पोस्टमध्ये फोटो बघितले होते त्यामुळे कल्पना होती; पण जाऊन बघितले तर बुरुजाच्या जवळ जी थोडीशी तटबंदी शिल्लक होती तीही ढासळली आहे. तिथे कचऱ्याचा ढीग आहे. बाजूला शिल्लक असलेला एकमेव बुरुजही झाडीत गुरफटून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लवकर लक्षातही येत नाही. निखिल करंबेळकरांनी काढलेले चार वर्षांपूर्वीचे फोटो आणि आत्ताचे फोटो बघा. तिथून बाहेर पडल्यावर त्यांना फोन करून सांगितले. जवळच एक पेशवेकालीन विहीर आहे तीही बुजली आहे. या तटबंदीच्या अवशेषांपाशी मोकळी जागा आहे तिथे काही लोकं पाहणी करण्यासाठी आले होते. कल्याणच्या कोटाचे हे शेवटचे अवशेषही लवकरच नामशेष होणार आहे असे दिसते. कल्याणमध्ये अनेक इतिहासप्रेमी, ‘ट्रेकर्स’ आहेत. पालिकेला काही घेणेदेणे नाही. काही माहितीच नाही.

इथून जवळच पारनाका परिसरात काही पेशवेकालीन मंदिरं आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांची सासुरवाडी कल्याण. १७१३ साली त्यांचे व कल्याणच्या काशीबाई जोशींचे लग्न कल्याणला झाले. त्यांच्या लग्नात वापरलेला संगमरवरी अष्टकोनी चौरंग तिथल्या त्रिविक्रम मंदिरात ठेवलेला आहे. पानिपतवर पडलेले पेशव्यांचे सरदार बळवंतराव मेहेंदळे यांनी गुजरात मोहिमेवरून परतताना त्रिविक्रम विष्णूची गंडकी पाषाणातली मूर्ती सोबत आणून इथे प्रतिष्ठापना केली. त्रिविक्रमाची मंदिरं फार कमी आहेत. जवळच पारनाक्यावर अभिनव विद्यामंदिर शाळेवर थोरले बाजीरावांचा विवाह या ठिकाणी झाला असा फलक लावला आहे. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या बाजीरावांची पत्नी काशीबाईंच्याच घराण्यातल्या, त्यांचाही वाडा याच परिसरात होता.

– प्रणव कुलकर्णी.

Leave a Comment