कल्याणसुंदरम | आमची ओळख आम्हाला द्या –
भारतातील मंदिरावरील आजवर बऱ्याच मूर्ती आपण पाहिलल्या आहेत.मूर्तीची आयुधे,वाहन, आणि त्यांच्या लक्षणावरून आपण मूर्तीची ओळख करतो. परंतु त्यामागे काही कथा असतात हे विसरून चालणार नाही. मंदिराच्या मंडोवरावर विविध देवदेवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात. त्यांनाही काहीतरी कथा असते. अशाच प्रकारचे शिव आणि पार्वतीची मूर्ती मदुराई मीनाक्षी मंदिरावर आहे. त्या मूर्तीसमोर श्री चंद्रशेखर असा बोर्ड लावला आहे. वास्तविक पाहता चंद्रशेखर म्हणजे शिव होय.शिवाच्या विविध अवतारातल्या अनेक मूर्ती पहावयास मिळतात. त्यापैकी चंद्रशेखर मूर्ती म्हणजे ज्याच्या भाळावर चंद्र आहे . मग ही मूर्ती चंद्रशेखरची आहे का? या मूर्तीच्या कपाळावर चंद्र नाही मग हा चंद्रशेखर कसा?(कल्याणसुंदरम)
प्रस्तुत मूर्ती शिवपार्वतीची कल्याणसुंदरम् मूर्ती म्हणून ग्रंथात उल्लेखित आहे.हा शिवपार्वती विवाह सोहळा आहे. दक्षिण भारतात अशा मूर्ती विपुल प्रमाणात आढळून येतात. यापैकी मूर्तीमधील शिव संमपाद अवस्थेत उभा असून चतुर्भुज आहे. डोक्यावर जटामुकुट आहे. कानात चक्राकार कुंडले ,गळ्यात ग्रीवा, हार, स्तनसूत्र, कटकवलय, केयूर ,कटीसूत्र,पादवलय व पादजालक इत्यादी अलंकार आहेत.शिव चर्तुभुज असून उजव्या खालचा हातात वरद मुद्रेत आहे. उजव्या वरच्या हातात परशु तर डाव्या वरच्या हातात हरीण व डावा खालचा हातात अभयमुद्रेत आहे.
चेहरा अत्यंत प्रसन्न असून कपाळावर मधोमध तिसरा नेत्र दिसतो. नेसूचे अतिशय कलात्मकरीत्या कोरलेले आहे. सोबत असणारी पार्वती द्विभूज असून उजव्या हातात कमळकलिका असून डावा हात जमिनीकडे मोकळा सोडलेला आहे. पार्वती देखील संमपाद अवस्थेत उभी आहे. डोक्यावर मुकुट ,कानात चक्राकार कुंडले, गळ्यात ग्रीवा उदर बंद, केयूर, कटीसूत्र पादवलय व पादजालकलक इत्यादी अलंकार परिधान केलेले आहेत. नेसूचे वस्त्र अत्यंत कलात्मकरित्या कोरलेले आहे. अशा प्रकारे हि मूर्ती चंद्रशेखर शिव नसून कल्यिणसुंदरम् शिव आहे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर,
मूर्ती अभ्यासक,मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ,सोलापूर