महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,901

कमळगड | कमालगड

By Discover Maharashtra Views: 3322 4 Min Read

कमळगड | कमालगड…

संपूर्ण जावळीच सुंदर…! जावळीच्या खोऱ्यात धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. जावळीच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गडकोट अलंकारासारखे धारण केले आहेत, त्यापैकी एक आहे कमळगड | कमालगड..!

दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक दोन्ही बाजूच्या पाण्यातून कमळ वरती यावे तसा एक देखणा किल्ला वर आलेला आहे तो म्हणजे कमळगड. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

जावळीच्या खोऱ्यात वाई मधून दोन मार्ग कमळगडाला गेलेले आहेत, एक आहे वाईहून नांदवणे गावातून, नांदवणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे. तर दुसरा आहे जांभळी रोडने तुपेवाडी मार्गे.

वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रेनावळे वासोळे गावी वाईहून एस.टी. ने येता येते. या दोन्ही गावातून पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहचता येते व साधारणतः दीड ते दोन तासांच्या चढणीनंतर तुम्ही गडावर येता. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदर्‍यांचा सुंदर मुलूख दृष्टिपथात येतो.

महाराष्ट्रातील बाकीच्या किल्ल्यावर आढळणारे प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला एक वाट जाते ती एका खोबणीतून तुम्हाला गडमाथ्यावर आणते. गडावर पाहण्यासारखी मोठी अशी ठिकाणे नाहीत फक्त एक कावेची देखणी विहीर आहे. वरती पोहचताच गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. या डोंगररांगेला नवरानवरी चे डोंगर म्हणतात.

थोडं पुढे गेल्यावर जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० – ५५ खोलखोल पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. या विहिरीत जाताना आजूबाजूच्या वातावरणातील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.

गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथर्‍यांचे अवशेष दिसतात.

नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. गडाला भेट देताना धोमचे हेमाडपंती शिवमंदिर जरूर पाहावे, खूपच प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.

वाईपासून वाटेतच मेनवलीचा प्रसिद्ध घाट लागतो. भारतीय चित्रपट सृष्टीत बऱ्याच चित्रपटात (गंगाजल, स्वदेश) या घाटाचे चित्रण केले आहे. इथंच शेजारी नाना फडणवीस यांचा ऐतिहासिक वाडाही आहे. जवळच मराठी कवी वामन पंडित यांची भोमगावाला समाधी आहे.

कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

गडावर जाताना कचरा करू नका..गडाचे पावित्र्य राखा..! कोणत्याही गडावर गेल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बॉटल्स इकडेतिकडे टाकू नका..! सोबत नेलेले सर्व साहित्य सोबत घेऊन परत जा.

गडावर मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा, गडाच्या परिसरात वन्यजीव असतात त्यामुळे त्यांचे आधिवास अबाधित ठेवा. गडाच्या परिसरातील वन्यजीवांचा माणसाला व माणसाचा वन्यजीवला धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा.

गडकिल्ले फिरताना शक्यतो कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त पंधरा लोकांचा ग्रुप बनवा, त्यापेक्षा जास्त लोकं नसावीत, शिवाय शनिवार रविवार सोडून गडकोट भटकंतीला जा. गडावर आपल्या सोबत गडाचा व वन्यजीवांची चांगली माहिती असणारा माणूस हवाच.

गडावर पावसाळ्यात निसरडे होते, गडाचे दगड सुटतात तरी फोटोसाठी अति हौशी पणा करून गडाच्या कडेला जाऊ नका, धोका होऊ शकतो. आपले किल्ले गडकोट आणि आपल्या भागातील सुंदर ठिकाणं ही सुंदर राहिलीच पाहिजेत हे आपलं कर्तव्य आहे, त्यांचे पावित्र्य राखूनच पर्यटन करा..

उमाकांत चव्हाण.

सह्याद्री संवर्धन केंद्र, कोल्हापूर.

Leave a Comment