महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,526

नायिकाप्रधान कामशिल्प

By Discover Maharashtra Views: 1543 4 Min Read

नायिकाप्रधान कामशिल्प –

भारतीय कामशिल्पाची मीमांसा करताना इतिहासातील अनेक परिवर्तने आणि स्थित्यंतराचा विचार अपरिहार्य ठरतो. प्राचीन भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक होती. तिथं त्या वेळी प्रादेशिक आणि राजकीय असे सीमांचे काहीच बंधन नव्हते. तिचा प्रभाव कालपरत्वे कमी-अधिक प्रमाणात सर्व भारतभर अस्तित्वात होता. वंशविविधता व विविध धर्मश्रद्धा यांनी ती समृद्ध झाली होती. भारतीय मूर्तीकलेच्या उद्गमाबरोबरच भारतीय कामशिल्पास प्रारंभ झाला असावा, असे बहुतेक कलासमीक्षक मानतात; तथापि भारतीय शिल्पकलेच्या उद्गमाविषयी तज्ज्ञात एकमत आढळत नाही. नवाश्मयुगीन व मध्याश्मयुगीन काळात डोंगरांच्या व टेकड्यांच्या आश्रयाने काही गुहेतून रंगीत चित्रकाम केलेले आढळून येते. त्यांचा आणि भारतीय शिल्पकलेचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी कामशिल्पाशी संबंधित अशी काही चित्रे आढळून येतात. यातील काही संभोग क्रियेच्या चित्रणासोबतच एकूणच स्त्री चित्रणात जघनप्रदेश व स्तन यांना अवाजवी महत्त्व दिलेले दिसते. त्‍यामुळे प्रागैतिहासिक कलेतही भारतात स्त्री या वर्ण्यविषयास असलेले महत्त्व दृग्गोचर होते आणि हाच विषय पुढील काळात मंदिर शिल्पातून हाताळलेला दिसतो.(नायिकाप्रधान कामशिल्प)

भारतीय कामशास्त्र ग्रंथांची निर्मिती आणि कामशिल्पाची निर्मिती हे पुरुषप्रधान आहे, असे मानले जाते. परंतु कामशिल्पा अंतर्गत नायिकाप्रधान कामशिल्पाची निर्मिती झाल्याचे ही दिसून येते.

कामशिल्प /चित्र हे हिंदू, बौद्ध आणि जैन या सर्व (तांत्रिक) कलाकृती मध्ये पहावयास मिळतात. त्यात महत्वाची बाब म्हणजे बहुतांशी कामशिल्प ही केवळ शिव मंदिरावरच पाहावयास मिळतात. यामागील महत्वाचे कारण म्हणजे लय आणि त्यानंतर उत्पत्तीसाठी क्षेत्र निर्माण करून देणारी, त्याचे ज्ञान देणारी ‘देवता’ म्हणून शिवाचा असलेला प्रमुख वाटा हेच होय. अर्थात निर्मिती आणि लय हे दोन्ही कार्य ‘शिव’ करीत असल्याने शिवमंदिरावर कामशिल्पांची निर्मिती झाली.

कामभावना ही अतिचंचल व प्राणीमात्रांना आजीव आच्छादून असते. कामभावनेवरील एकाग्र अवधानामुळे नर स्खलनशील असल्याने त्वरित निष्कासित होऊ शकतो. मात्र स्त्री उत्तरोत्तर उत्तेजित होत जाते. त्यामुळे पुरुषाला उत्तेजित ठेवणे किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुषांना गृहीत धरून अधिकाधिक कामशिल्प निर्माण केलेली आहेत. तरीही काही कामशिल्प ही ‘नायिकाप्रधान’ असल्याचे दिसून येतात. त्यातील नायिकेची देहबोली, कार्यमग्नता यावरून असे कामशिल्प ओळखता येतात.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ‘दशरथेश्वर’ नावाचे एक शिवमंदिर असून प्रस्तुत शिवमंदिराच्या अंतरंगात तीन आणि प्रत्यक्ष व्दारशाखेच्या उत्तरांगावर दोन आणि देव कोष्टकाच्यावर एक अशी एकूण सहा कामशिल्प आहेत. ‘केवळ मंदिराच्या बाह्यांगावर कामशिल्प असतात’ या गृहितकाला छेद देणारे हे मंदिर असून मंदिराच्या सभामंडपामध्ये कामशिल्प असलेली अशी मंदिरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. खिद्रापूरच्या ‘कोपेश्वर’ महादेव मंदिराच्या सभामंडपातील एका स्तंभावर कामशिल्प कोरलेले आहे. तद्वतच जालना जिल्ह्यातील अन्वा या ठिकाणी असलेल्या शिवमंदिराच्या सभामंडपातील स्तंभावर देशातील असे कामशिल्प कोरलेले आहे. या कामशिल्पाचा शोध अस्मादिकाने लावलेला आहे. अशीचकामशिल्प वेरुळच्या ‘कैलास’ मंदिराच्या सभामंडपातील स्तंभावर कोरलेली आहेत. प्रस्तुत मंदिर पूर्वाभिमुख असून याच बाजूस त्याचे मुख्यप्रवेशव्दार आहे. तर दुसरे प्रवेशव्दार हे दक्षिणेस आहे. या प्रवेशव्दाराच्या ललाटबिंबावर गणेश मूर्ती आहे. त्याच्या उत्तरांगावर मध्यभागी शिवाची मूर्ती व त्याच्या दोन्ही बाजूला नायिकाप्रधान  कामशिल्प कोरलेले आहे.

मंदिरातील सभामंडपाच्या स्तंभशीर्षावर तीनकामशिल्प आहेत. तसेच मंदिर गर्भगृहाच्या बाह्यांगावर तीन देवकोष्टक असून उत्तरेकडील देवकोष्टकाच्या उत्तर भागावर एक नायिकाप्रधान कामशिल्प असून हे लहान आकाराचे शिल्प आहे. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी आपल्या ‘सुरसुंदरी’ या पुस्तकात म्हटले आहे की, “मंदिराच्या बाह्यांगावरील सुरसुंदरी या मनातील सारे विकार बाहेर ठेऊन मंदिरात प्रवेश करावा असे सुचवितात.” हे तार्किकदृष्टीने तर शक्यच नाही, पण यास ग्रांथिक आधार ही नाही. अन्यथा मंदिराच्या बाह्यांगासोबतच मंदिराच्या सभामंडपातही कामशिल्प कोरलीच नसती.

ठिकाण – मुखेड, जि. नांदेड.
स्थळ – दशरथेश्वर मंदिर.
आभार :- श्री  Kishor Borkar , श्री  Aditya Phadke आणि प्रा. डॉ. Sanjeev Doibale

प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के, भोकर. जिल्हा नांदेड.

(ज्या अभ्यासकांना सविस्तर माहिती हवी त्यांनी B-Adhar चा अंक क्र. 261, अ. क्र. 31, पेज नं.137 पहावे.)

Leave a Comment