महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,307

कंधार

Views: 4882
21 Min Read

कंधार

कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या शेवटी मन्याड नदीच्या खोऱ्यात वसलेल आहे. चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती करून त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती केली. आज महाराष्ट्रातील हा सर्वात प्राचीन पाणीसाठा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या ह्या व्यवस्थेचे अवशेष आजही कंधार किल्ल्यावर अनेक ठिकाणी दिसतात.

राष्ट्रकुटांच्या काळात कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला चौथे शतक ते अठरावे शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात होता. त्यांनी या किल्ल्यात केलेली अनेक बांधकामे व बदल आजही आपल्याला पहाता येतात. किल्ल्यात अनेक वास्तूअवशेष असुन त्यांच्या बांधकाम शैलीत विविधता आहे. किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असुन किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पहाण्यासाठी पूर्ण दिवस लागतो. कंधारला जाण्यासाठी नांदेड हे जवळचे शहर आहे. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने संपुर्ण देशाशी जोडलेले असल्याने येथे येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नांदेडहून कंधारला जाण्यासाठी अनेक एसटी आणि खाजगी गाड्या आहेत.

कंधारचा भुईकोट किल्ला कंधार शहरापासून ४ कि.मी.वर आहे. कंधार किल्ला भूईकोट असल्याने संरक्षणासाठी त्याच्या चारी बाजूला खंदक खोदलेला असुन हा खंदक घडीव दगडानी बांधला आहे. खंदकातील पाणी पाझरू नये यासाठी भिंतीची जाडी १२ फुटापेक्षा जास्त आहे. खंदकाची रुंदी १४० फ़ूट आणि खोली ५० फ़ूट असुन खंदकात पाणीसाठा करायला पावसाच्या पाणी साठवणी बरोबर जगत्तुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेले उच्छ्वास व कालवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहाता येतात. खंदक साफ तसेच दुरुस्त करण्यासाठी ठराविक अंतरावर पायऱ्या बांधल्या आहेत. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे. पूर्वी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता.

आज किल्ल्यात जाण्यासाठी पुरातत्व विभागाने खंदकात मार्ग बांधला आहे. प्रवेशव्दारातून खंदकात उतरल्यावर पूरातत्व विभागाने केलेल्या बांधकामात एक कमान बांधलेली आहे. या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक चौकोनी विहिर तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे. आयताकृती आकाराचा हा किल्ला पुर्वपश्चिम खंदकासाहित २२ एकरांमधे पसरलेला असून किल्ल्याचा तटबंदीतील परीसर ८ एकर आहे. खंदक पार करुन किल्ल्यासमोर पोहोचल्यावर उत्तराभिमुख लोखंडी खिळे मारलेले लोहबंदी दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजावर थेट मारा करता येउ नये यासाठी त्यासमोर भिंत बांधलेली आहे.या बांधकामास जिभी म्हणतात. जिभिच्या वरील बाजुस चर्या असुन वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. लोहबंदी दरवाजाची उंची १२ फ़ूट आणि रुंदी १० फ़ूट असुन कोसळलेला हा दरवाजा आतील बाजुस पडला आहे व पुरातत्व खात्याने तेथे नविन लोखंडी दरवाजा बसविला आहे. हा दरवाजा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० या वेळेतच उघडलेला असतो.

किल्ल्याला दुहेरी तटबंदी असुन लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. बाहेरील तटबंदीची उंची ४० फ़ूट असून रूंदी १२ फ़ूट आहे. आतील तटबंदीची उंची ६० फ़ूट असून रूंदी १२ फ़ूट आहे. आतील व बाहेरील तटबंदीमध्ये साधारण १५ फ़ूट अंतर आहे. दोन्ही तटबंदींना फ़ांज्या असुन तटबंदीवर चर्या आहेत. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत १८ बुरूज असुन आतील तटबंदीत १६ बुरूज असे एकुण ३४ बुरूज आहेत. लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर समोरच काटकोनात किल्ल्याचे दुसरे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. या दरवाजाच्या आत त्याच्या घुमटाकार छतातील नक्षीकामात दोन मासे कोरलेले असुन त्यावरुन या दरवाजाला मछली दरवाजा म्हणुन ओळखले जाते. या दरवाजाची उंची १५ फ़ूट आणि रुंदी ८ फ़ूट आहे. दरवाजासमोर उजव्या चौथऱ्यावर गजशिल्प असुन डाव्या बाजुच्या तटबंदीत वर तटावर जाण्यासाठी दरवाजा आहे. मछली दरवाजाच्या आत एक व बाहेरच्या बाजूस एक असे दोन पर्शियन शिलालेख आहे. बाहेरील शिलालेख मुहम्मद तुघलक या़चा हिजरी ७४४/इ.स.१३४४चा असून त्यात सरदार सैफ़ुद्दीन या किल्लेदाराचे नाव लिहिलेले आहे.

मछ्ली दरवाजाच्या आतील उजव्या बाजूचा शिलालेख बुऱ्हाण निजामशाह याच्या काळातील हिजरी ९४७/ इ.स.१५२७चा आहे. ईश्वर सर्वांचा मित्र आहे. निजामशाह याने बाराव्या इमामसाठी सगळे नवस फ़ेडले असे त्यात लिहिले आहे. मछली दरवाजातून आत आल्यावर समोर प्रशस्त पटांगण असुन त्यात एक तुटलेली तोफ आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूला ६ देवड्या आहेत.या देवड्यांच्या शेवटी तटावर जाण्यासाठी जीना असुन त्या ठिकाणी एक पर्शियन शिलालेख आहे. दरवाजाच्या समोरच्या बाजूला पटांगणात उजव्या बाजूला एक मजली इमारत आहे. या इमारतीला अंबरखाना म्हणतात. या इमारतीच्या भिंतीत एक व्यालाशिल्प पाहायला मिळते. किल्ल्यातील मंदिरे व इतर वास्तू पाडून त्याचे दगड किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरल्याने असे अवशेष जागोजागी पहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजा जवळ अंबरखाना (धान्यकोठार) असण्याची शक्यता कमी आहे. या इमारतीचा उपयोग कचेरी सारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने कामासाठी आलेल्या लोकांना किल्ल्यात न जाता त्यांची कामे बाहेरच व्हावी याकरीता याठिकाणी कचेरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता या इमारतीत पुरातत्त्व खात्याच कार्यालय आहे.

दरवाजाकडे पाहताना अंबरखान्याच्या मागच्या बाजूस डावीकडे उंचावलेला टेहळणी बुरुज दिसतो. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली एक खोली आहे. लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातल्या इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये आहे. देवड्या संपल्यावर उजव्या व डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेने गेल्यास बाहेरील संपुर्ण तटबंदीवरुन फिरता येते. या तटबंदी वरून फिरताना आतील तटबंदी व बुरुजावर ठिकठिकाणी कोरीव शिल्पे व शिलालेख दिसतात. गडाच्या या दुहेरी तटबंदीत दोन विहिरी असुन अनेक ठिकाणी खंदकात ओवऱ्या व त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. खंदकात एका चौथऱ्यावर दर्गा असुन त्या दर्ग्यासमोर एक कबर आहे. बाहेरील तटावरील हि फेरी अर्ध्या तासात आटोपून आपण मूळ जागी परत येतो. बुरुजाच्या बाहेरील तटावरील दरवाजाने बाहेरील दरवाजे व तट यांच्या माथ्यावर जाऊन दरवाजांची सरंक्षण व्यवस्था पहाता येते. मछली दरवाजा शेजारील एका बुरुजावर मध्यम आकाराची तोफ दिसुन येते. येथुन खाली मछली दरवाजात आल्यावर डावीकडे वळताच गडाचा तिसरा दरवाजा दिसतो. हा दरवाजा रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दोन बुरुजामध्ये असलेल्या या दरवाजाची उंची २० फ़ूट आणि रुंदी ८ फ़ूट असुन उजव्या बाजूच्या महाकाली उर्फ़ धन बुरुजावर पर्शियन शिलालेख आहे. त्यात जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही विजयाच्या अगदी जवळ आहात अशा आशयाचा सैनिकांचा उत्साह वाढविणारा शिलालेख आहे. डाव्या बाजूचा बुरुज शहाबुरुज किंवा इब्राहिमी बुरुज म्हणुन ओळखला जातो.

औरंगजेबाच्या बहादूरशहा या किल्लेदाराने किल्ल्याचे मजबूतीकरण करताना हा बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला १ व आत २ असे एकुण ३ पर्शियन शिलालेख आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. या ओवऱ्याच्या छ्तावरील रंगीत नक्षीकामाने या दरवाजाला रंगीन दरवाजा असे नाव पडले. दरवाजातून आत येताच समोर राजवाड्याची भिंत दिसते तर डाव्या बाजूला काही भग्न दगडी शिल्प अवशेष आहेत. १९६० साली पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त उत्खनन मोहिमे अंतर्गत मानसपुरी येथे केलेल्या उत्खननात आठव्या शतकातील काही बौद्धकालीन मूर्ती तसेच जैन मूर्ती सापडल्या. या उत्खननात ६२ फूट उंचीची भग्न क्षेत्रपाल मूर्ती मिळाली. या मूर्तीच्या पायाची लांबी ५ फुट व रूंदी २ फुट आहे. राष्ट्रकुट राजा कृष्ण तिसरा याने कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रपालची ही मुर्ती असावी. या मुर्तीचा नाकापासून डोक्यापर्यंत भाग, पाऊल, बीजफ़ळ धरलेला हात तसेच कंधार गावात केलेल्या उत्खननात सापडलेल्या गणेशमुर्ती, पार्श्वनाथमुर्ती व इतर अनेक मुर्ती येथे पहायला मिळतात. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची बसलेली मुर्ती आहे. ती मुर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली/धन बुरुजात ३ x २ फुट आकाराचा दरवाजा आहे. हा भाग रत्नशाळा किंवा जवाहिरखाना म्हणून वापरण्यात येत होता. येथुन समोरच्या बाजूस असलेल्या मशिदीचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो.

निजामाच्या काळात येथील शिवमंदिर पाडून मशिद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवून उत्तराभिमुख प्रवेशव्दार बांधले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूना असलेली नागशिल्प आणि नक्षी आजही पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबीरूंदी ५०x२५ फ़ूट आहे. मशिदीवर तीन घुमट असुन चार पर्शियन शिलालेख आहेत. मशिदी समोर १५ x १५ x ४ फ़ूट लांबीरुंदीचा तलाव आहे. या तलावाच्या मागील बाजूचे शिवमंदिराचे प्रवेशव्दार बंद करून त्याठिकाणी दोन मजली महाल बांधलेला आहे. मशिदीच्या दरवाजा बाहेर चुन्याचा घाणा व जात ठेवलेल आहे. मशिदीच्या बाजूने जाणाऱ्या जीन्याने अंबरी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फ़ेरबांधणी केल्याने किल्ल्यावरील हा सर्वात मोठा बुरुज त्याच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावरून गडाचा आतील संपुर्ण परीसर दिसतो. या बुरुजावर व्याघ्रमुख असलेली १५ फ़ूट लांब लोखंडी बांगडी तोफ़ आहे. तोफ़ेच्या मुखाच्या बाजूला वाघाची प्रतिमा असून वाघाच्या मानेवर माळा कोरल्या आहेत.

तोफ़ेला मुखाकडे आणि मागील बाजूस दोन फुट अंतर सोडून दोन्ही बाजूला गोलाकार लोखंडी कडी आहेत. अंबरी बुरुजावरून उतरून उत्तरेकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज त्याखाली दुसरी तटबंदी व त्याखाली खंदक दिसतो तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतील वास्तू दिसतात. अंबरी बुरुजापासून दुसऱ्या बुरुजावर एक खोली आहे. पुढे गेल्यावर फ़ांजीला लागून डाव्या बाजूला शाही हमामखाना आहे. किल्ल्यातील महालात हमामखाना असुनही हा हमामखाना बांधलेला आहे. यात वापरलेले तांब्याचे नळ आजही पहायला मिळतात. येथुन पुढच्या बुरुजावर एक कोठार आहे. त्याच्या पुढील बुरुजाच्या खाली खंदकात एका चौथऱ्यावर दर्गा असल्याने हा बुरुज दर्गाबुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावरून खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरुन पाणी आणण्यासाठी केलेला बोगदा पाहायला मिळतो. दर्गा बुरुजावरुन डाव्या बाजूला फांजीला लागून अंबरखान्याचे छत दिसते. या छताला सुर्यप्रकाश आत जाण्यासाठी २ चौकोनी व ४ गोल आकाराची ३ फुट व्यासाची तोंडे असुन अंबरखान्याची उंची २० फूट आहे.

अंबरखान्याच्या टोकाचा उत्तरेकडील शेवटचा बुरुज बहाद्दरपूर गावाच्या दिशेला असल्याने बहाद्दरपूर बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर एक तोफ व कोठार आहे. या बुरुजाच्या फांजीवरुन पश्चिमेला निघाल्यावर फांजीला लागून दरबाराची जागा व त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यानी खाली उतरल्यावर एक ५ x ३ फूट लांबरुंद दरवाजा दिसतो. दरवाजाच्या आत कमानी असलेली ८ दालने आहे. या दालनात हवा खेळती राहावी यासाठी ३x२ फ़ूट लांबीरुंदीचे झरोके आहेत. हे दरबारातील बायका बसण्याचे दालन असुन या दालनाबाहेर पहारेकऱ्यासाठी ३ खोल्या आहेत. दरबाराची वास्तू काटकोनात असुन तटबंदीला समांतर आहे. येथुन पुढील दोन बुरूज पार करून आपण पश्चिम तटबंदीतील शेवटच्या मानसपूरी बुरुजापाशी पोहोचतो. मानसपूर बुरुजावरदेखील एक तोफ आणि कोठार आहे. मानसपूर बुरुजावरुन दक्षिणेकडे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजाखाली एक खोली असुन त्यावर एक पर्शियन शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. या बुरुजाच्या पुढे गेल्यावर एक बुरूज सोडुन पश्चिम तटबंदीतील दक्षिण टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. या बुरुजाच्या उजव्या बाजूला तटाला लागून अजुन एक अंबरखाना आहे. या अंबरखान्याचच्या छताला सुर्यप्रकाश आत जाण्यासाठी ९ गोल आकाराची ३ फुट व्यासाची तोंडे असुन अंबरखान्याची उंची १५ फूट आहे.

बुरुजासमोर तटबंदीला लागून तीन मजली राणीमहाल आहे. राणी महालात जाण्यासाठी फांजीवरुन जीना असुन टोकाला दरवाजा आहे. दरवाजाच्या शेवटी असलेल्या पायऱ्या चढून उजव्या बाजुस वळल्यावर आपण राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर येतो. या ठिकाणी आपल्याला अनेक दालन, त्यातील कोनाडे, हौद, स्नानगृह, शौचालय आणि त्यात तांब्याच्या नळांद्वारे खेळवलेले पाणी असे अनेक अवशेष पहायला मिळतात. राणी महालापुढे शहाबुरुजापर्यंत राजमहाल आहे. राजमहालातून शहा बुरुजावर जाताना दोन कमानदार दरवाजे व एक पर्शियन शिलालेख आहे. शहाबुरुजावर अजुन एक शिलालेख असुन एक बांगडी तोफ उलट उभी करुन ठेवली आहे. राजमहाल व राणीमहाल ही दोन्ही ठिकाणे बुरुज आणि किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी तीन दिशांना दरवाजे ठेवले आहेत. खाली उतरल्यावर आपण रंगीन दरवाजासमोर पोहोचतो. येथे आपली किल्ल्याची आतील तटबंदीची प्रदक्षिणा पुर्ण होते. शहाबुरुजाच्या पायथ्याशी जिन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या आतील वास्तु पहाण्यासाठी रंगीन दरवाजा समोरून सुरवात करावी. या ठिकाणी एक चौकोनी पायऱ्यांची विहिर आहे. येथे झालेल्या उत्खननात एक सार्वजनिक हमामखाना आढळून आला. त्याच्या बाजूला असलेल्या दोन मजली उध्वस्त नक्षीमहालात ५ हौद व स्नानगृह व शौचालय या वास्तू दिसतात. हा महाल मोगल सरदार बहादूरखानने बांधला होता.

नक्षीमहालाच्या बाजूच्या दरवाजाने आत गेल्यावर आपण शाही उद्यानात पोहोचतो. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नळांव्दारे कारंजी उडवली जात. या हौदातील तांब्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसऱ्या बाजुचा दरवाजा राजाबाघ दरवाजा नावाने ओळखला जातो. हा दरवाजा राष्ट्रकुट काळातील असून त्यावर असणाऱ्या व्याघ्र शिल्पामुळे याला पुढील काळात व्याघ्र दरवाजा आणि नंतर बाघ दरवाजा असे नाव पडले. वाघ दरवाजाच्या बाजूला १५ x १० फ़ूट लांबरुंद दुमजली शीशमहाल आहे. या महालाचे कोनाडे, देवळ्या चुन्यात कोरलेल्या असुन त्यात रंगीबेरंगी काचा व आरसे बसवून हा महाल सजवण्यात आला होता. महालाच्या पूर्व भिंतीवर पाण्याचा छोटा धबधबा तयार करून त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळ आतील बाजुस बसवला आहे. शिशमहालातुन वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद आहे तर डाव्या बाजूला कमानदार काटकोनी आकाराचे दारुकोठार आहे. त्यात अनेक आकाराचे तोफगोळे मांडून ठेवले आहेत. वाघ दरवाजातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला १०x १०x१० फ़ूट आकाराचा घुमटाकार छत असलेला दर्गा आहे. ही वास्तू ही एका सुफ़ी संताची कबर आहे. दर्ग्याच्या बाजूला कमानी असलेल्या वास्तू आहेत. त्याच्या बाजूला अनेक कोनाडे असलेला दोन मजली महाल आहे. महाला समोर राजस्थानी शैलीतील एक छत्री आहे. या संकुलातील कमानीतून बाहेर पडतांना डाव्या बाजूला घोड्याच्या पागा आहेत तर उजव्या बाजूला आपण एका मोठ्या चौथऱ्यावर बांधलेल्या महालाच्या परिसरात येतो.

निजामाच्या काळात हा महाल आणि त्यासमोरचा तलाव बांधण्यात आला. या तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेली नक्षीदार नाली पाहाण्यासारखी आहे. या महालाच्या दक्षिण बाजुला कुंपणाच्या भिंतीत अनेक कोनाडे असलेला कबूतरखाना होता. लालमहालाबाहेर उजव्या बाजूच्या दरवाजासमोर पायऱ्या असलेली परीस विहिर आहे. या पायऱ्यांच्या बाजूला भिंतीवर हत्तीशिल्प आहेत. पायऱ्यानी खाली न उतरता डाव्या बाजूला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण एका पटांगणात येतो. याठिकाणी विहीरीच्या भिंतीला लागून पूर्वाभिमुख दरवाजा असलेला दुमजली जलमहाल असुन उन्हाळ्यात थंडाव्यासाठी हि वास्तू राष्ट्रकुटांच्या काळात बांधली गेली. हा जलमहाल १८x११x१२ फ़ूट लांबरुंद असुन त्याला विहिरीच्या पाण्यावरुन येणारी गार हवा महालात येण्यासाठी विहिरीच्या बाजूला ३ खिडक्या आहेत. आज महालाचा वरचा भाग नष्ट झालेला आहे. महालाच्या आतील बाजूस दगडी व्दारपट्टीवर गणपती आणि फ़ुल कोरलेली आहेत. या जलमहालात डाव्या बाजुला १०x२ फ़ूट लांबरुंद आणि ८ फ़ूट उंच खोली आहे. मुख्य जलमहालाला लागून एक छोटा जलमहाल असुन उत्तराभिमुख दरवाजा असलेल्या या जलमहालाला एक झरोका आहे. हे पाहून तटबंदीच्या दिशेने गेल्यावर एक खांबी मशिद दिसते. मशिदीच्या मागे तटबंदीला लागुन घोड्याच्या पागा आहेत.

मशिद पाहून परत विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी येउन बाहेर पडल्यावर एक चौथरा आणि त्याच्या दोन्ही बाजूला इमारत व समोर पटांगण दिसते. हा नाचगाण्याच्या कार्यक्रमाचा रंगमहाल आहे. रंगमहाला समोरील दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण राणीमहाला समोर बारादरी या महालापाशी पोहोचतो. या महालाला चारही बाजूला मिळून कमानदार १२ खिडक्या आहेत. बारादरी महालाच्या दक्षिणेस काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. बारादरी पाहून रंगीन दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्यावर या व्यतिरिक्त अनेक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्याबाहेर तटाबुरुजांवर अनेक शिल्प आहेत. मानसपूरी बुरुजावर शरभ आणि हत्तीचे शिल्प आहेत. बहाद्दुरपुरा बुरुजावर दोन शरभ शिल्प आहेत. दर्ग्याजवळील बुरुजावर माकडाची शिल्प आहेत. किल्ल्याबाहेर खंदकाकडून फ़ेरी मारतांना ही शिल्प पहाता येतात. संपुर्ण किल्ला पहाण्यास पाच तास लागतात. कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह या ठिकाणी झाला अशी आख्यायिका आहे. गोदावरी नदीकाठी वसलेले शहर नंदितट म्हणजेच आजचे नांदेड. ४/५ व्या शतकात इथे नंद कुळातील राजांची सत्ता होती म्हणून या नगरीला नंदीतट म्हणत असा उल्लेख वाशिम येथे सापडलेल्या एका ताम्रपटात आला आहे. चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे.

सातव्या शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधारला राजधानीचा दर्जा दिला. त्याच्या काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र तलाव आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने इ.स. ९४०-९६७ दरम्यान कंधार नगरी परत वसवली म्हणून त्यास कंधारपूरवराधीश्वर अशी पदवी मिळाली. कंधार नगरी उभारणी बरोबर त्याने किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळ म्यानखेटला येथे हलवली आणि कंधारला उपराजधानी बनवली. १९५०च्या सुमारास डॉ.सरकार आणि भट्टाचार्य यांना बहाद्दुरपुरा येथे सापडलेल्या शिलालेखात दहाव्या शतकातील कंधारपूरचे वर्णन आहे. या शिलालेखात राष्ट्रकुट परिवाराची वंशावळ तसेच राजाच्या दानशूर वृत्तीचे वर्णन करणाऱ्या काही ओळी तसेच नंदीतट (नांदेड) येथील आश्रमशाळांना दिलेल्या अनुदानाचा उल्लेख आहे. या शिलालेखानुसार कंधारपुर येथे दोन मोठ्या बाजारपेठा होत्या यापैकी एक गुर्जर व्यापाऱ्यांची होती. राजाने जनावरांसाठी चारा जनतेसाठी मंडप,पाणपोया व लोकांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी शेकोट्या अशी सोय केल्याचे या शिलालेखात कोरले आहे. या शिलालेखात शहराच्या उत्तरेस बंकेश्वर तर नगरात वीरनारायण,छल्लेश्वर, कृष्णेश्वर, कालप्रीय, तुम्बेश्वर, तुडीगेश्वर, कामदेव मंदिर अशा मंदिरांचा उल्लेख आहे.

कालप्रीय मंदिराच्या मंडपात गायन-नृत्य कार्यक्रम होत असत. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घातली. १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले. १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले. त्याच्यानंतर काही काळ खतलब व नंतर इ.स.१३१७ ते इ.स.१३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी होता. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स.१३३६ सालातील आहे. इ.स.१३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी सत्तेचा अस्त झाल्यावर इ.स.१५६५ मध्ये किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात गेला. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स.१६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम अदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. इ.स.१५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने १६२० मध्ये हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला. किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा, मशीद बांधली आणि किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या काळात पोलादखान व घोरीखान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले.

मोगल बादशाह शहाजहानने १६३१मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १७ व्या शतकात औरंगजेबाच्या अधिपत्याखाली असलेल्या तेलंगण सुभ्याची नांदेड हि राजधानी होती. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंदसिंह इथे रहायला आले. १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला. त्यानंतर १९४७ पर्यंत तो त्याच्या ताब्यात होता. कंधार येथे झालेल्या उत्खननांमधे बऱ्याच राष्ट्रकूटकालीन मूर्ती आणि शिलालेख सापडलेले आहेत. यावरून त्याकाळी कंधार हे महत्त्वाचे शहर असल्याचे कळते. कंधार किल्ल्यापासून अर्धा किलोमीटरवर बहाद्दरपुरा हे गाव आहे. या गावात रस्त्यालगत आणि संग्रहालयात काही मुर्ती ठेवल्या आहेत.

Leave a Comment