महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,13,925

कोन्हेरराव फांकडे | पहिले फांकडे

Views: 1358
4 Min Read

कोन्हेरराव फांकडे | पहिले फांकडे –

फाकडा म्हणजे हुशारी, तडफ ,अलौकिक शौर्य, आणि  हजरजबाबीपणा दाखविणारी व्यक्ती .कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे हे पहिले फाकडे. दुसरे फाकडे मानाजीराव शिंदे. हे कन्हेरखेडच्या शिंद्यापैकी एक असून राघोबादादा पेशव्यांची बाजू उचलून धरणारे होते . आणी तिसरा फाकडा जेम्स स्टुअर्ट कॅप्टन जेम्स स्टुअर्टला मराठा लोक त्याच्या शौर्यामुळे मोठ्या कौतुकाने इष्टुर फाकडा असे म्हणत.कोन्हेरराव फांकडे.

बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीमध्ये कोन्हेरराव एक प्रसिद्ध शिलेदार होते. हे पुरंदरचे रहिवासी होते. ह्यांनी अनेक युद्धांमध्ये शत्रूच्या फौजेवर चढाई करून फार मर्दुमकीची कामे केली; त्यामुळे त्यांचे शौर्य श्रीमंतांच्या नजरेस येऊन त्यांस शिलेदारीचे स्वतंत्र पथक मिळाले. इ. स. १७५१-५२ मध्ये मोगलांचे व मराठ्यांचे जे तुंबळ युद्ध झाले, त्यामध्ये कोन्हेरराव त्रिंबक ह्यांनी आपल्या शौर्याचे असें कही चमत्कार दाखविले की, त्या योगाने त्यांची रणांगणावरील कीर्ती अजरामर झाली, असें म्हटले तरी चालेल. ह्या वेळी मराठ्यांचा प्रतिपक्षी सलाबतजंग हा होता , त्याच्या बाजूस सुप्रसिद्ध फ्रेंच सरदार बुसी हा आपल्या कवाइती सैन्यासह मिळाला होता. ह्यावेळी मोगलांचा विचार पुण्यावर चढाई करून मराठ्यांची मुख्य राजधानीच हस्तगत करावी असा होता. त्याप्रमाणे ते  तळेगाव ढमढेरे  व रांजणगाव येथपर्यंत चढाई करून आले.

तारीख २१ नोव्हेंबर रोजी बुसीने ग्रहणाच्या दिवशी हिंदू लोक धर्मकृत्यांत गुंतलेले असताना. त्यांच्यावर छापा घालून त्यांना सैरावैरा पळावयास लाविले व त्यांच्या लष्करांतून त्याने बरीचशी लूट नेली. त्यामध्ये पेशव्यांचे देव व पूजेची उपकरणेही गेली असें म्हणतात. हिला कुकडीची लढाई म्हणतात. त्यामुळे बुसीस मोठा विजयानंद वाटून तो अधिकच जोराने पुढे चाल करून आला. ह्या बिकट प्रसंगी मराठ्यांचे सरदार बिलकुल न डगमगता ते मोठ्या आवेशाने शत्रूशी युद्ध करण्यास सिद्ध झाले. ह्यावेळी मराठी सैन्याचे मुख्य सेनापती महादजीपंत पुरंदरे हे असून त्यांच्या हाताखाली दत्ताजी शिंदे व महादजी शिंदे हे दोन नवीन जोमाचे तरुण सरदार आणि कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे हे होतकरू शिलेदार हजर होते.

मराठ्यांचे व मोगलांचे ह्या समयी मोठे हातघाईचे युद्ध झाले (२७ नोव्हेंबर). ह्या युद्धांमध्ये कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे ह्यांनी आपल्या शौर्याची अगदी सीमा करून दाखविली. त्यांनी प्रतिपक्षाकडील फ्रेंचांच्या तोफांचा एकसारखा भडिमार होत असताना शत्रूवर निकराचे हल्ले करून त्यांना नेस्तनाबूत करून सोडिले. महादजीपंत, दत्ताजी व महादजी शिंदे  व कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे वगैरे अकरा असामींनी मोगलांची डोलाची अंबारी खाली केली… अंबारी लुटली. मोगल शिकस्त जाहला… सारा लुटला.” त्यानंतर ९ डिसेंबरी मांडवगण येथे कजारवीची लढाई झाली. ह्यावेळी कोन्हेरराव त्रिंबक यांनी दाखविलेल्या युद्धकौशल्याची फार तारीफ होऊन त्यास फाकडे अशी शौर्यपदक पदवी पेशव्यांनी दिली. तेव्हापासून त्यांची कोन्हेरराव त्रिंबक फाकडे ह्या नांवाने प्रसिद्धी झाली व त्यास पेशवे सरकारांतून मोठा बहुमान पालखीची वस्त्रे व नेमणूक व इनाम मिळाले आणि त्यांच्या बहादुरीबद्दल त्यांच्या घोड्याच्या पायांत चांदीचा वाळा घालण्याचा मान मिळाला.

हा बहुमान फारच थोड्या सरदारास पूर्वी मिळत असें. या मानाचा अर्थ असा की, हा घोडेस्वार एक तर समरांगणात जय मिळवील किंवा आपला देह धारातीर्थी अर्पण करील, पण शत्रूस पाठ दाखवून रणातून जिवंत परत येणार नाही. कोन्हेरराव त्रिंबक फाकडे हे होळीहुन्नुरच्या लढाईमध्ये हजर होते. तेथें त्यांनी शत्रूवर त्वेशाने चालून जाऊन आपले रणशौर्य चांगलेच दाखवून दिले.

होळीहुन्नुरच्या लढाईमध्ये कोन्हेरराव  मोठ्या पराकाष्टेने बचावले. पुढे ते श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब पेशवे ह्यांच्याबरोबर इ.स. १७५६  मध्ये सावनूरच्या स्वारीवर गेले. तेथें भाऊसाहेब व फाकडे हे बुसीच्या बातेर्‍याच्या मार्‍यात उभे असता त्यांच्या डोक्यावर बुसीच्या तोफखान्यातील तोफेचा एक गोळा पडून त्यांचा रणभूमीवरच अंत झाला. श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांस त्यांच्या मरणाने फार दु:ख झाले. परंतु त्यांनी त्यांच्या वंशजास चांगले इनाम देऊन ह्या शूर पुरुषांची निस्सीम स्वामिभक्ती आणि पराक्रमपटुत्व या गुणांचे योग्य चीज केले. पेशवाईमध्ये कोन्हेरराव फाकडे ह्यांची कीर्ती फार असून त्यांच्या शौर्यकथा तरुण वीरांना फार प्रोत्साहन देत असत. हे घराणे पेशव्यांच्या अत्यंत घरोब्यातील व ढेर्‍यांप्रमाणे विश्वासांतील होते.

कोन्हेरराव  यांची समाधी अद्याप अज्ञात आहे.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे

Leave a Comment