महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,071

कारा कोट

Views: 3692
4 Min Read

कारा कोट…

कारा कोट किल्ला मेळघाट चे राजे पेशवाई च्या काळात अनेक सरकारांना स्वतंत्र जहागीरी मिळाल्या. होळकरांना महेश्वर (इंदोर), शिंद्याना ग्वाल्हेर, गायकवाडांना बडोदा, त्याच प्रमाणे पवारांना धार ईत्यादी याच पवार घराण्यातील फतेहसिंह पवार यांना मेळघाट ची जहागीर मिळाली. त्यांनी हरीसाल जवळ कारा – कोट (जहागीर) येथे स्वतःचा छोटेखानी गढीवजा किल्ला बांधला. तेंव्हा त्यांच्याकडे विभागातील 999 गावांची सारावसुली होती असे लोक सांगतात. फक्त नावाचीच सुखी नदीचा बारमाही पाणी असलेला नदीकाठचा संपन्न प्रदेश त्यांनी राजधानी साठी निवडला आणि त्यांची प्रजा असलेल्या गरीब आदिवासींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वारसाहक्काने जहागीरी राजा कुमानसिंह यांचे कडे आली.

1857 च्या राष्ट्रीय उठावाच्या वेळी तात्या टोपे जळगाव (जामोद) येथील मुगुटराव देशमुख यांच्या सोबत मेळघाटात आले. इंग्रजी फौज त्यांचा पाठलाग करीत होती. तेव्हा राजा कुमानसिंहाने तात्या टोपेंना माखला येथील महालात आश्रय दिला. इंग्रजांनी फौज माखला येथे पोहोचली तेव्हा राजा कुमानसिंहाने आपल्या आदिवासी फौजेसह त्यांचा कडवा प्रतिकार केला. परंतु इंग्रजांच्या बंदुकींपुढे आदिवासींच्या तिर – कमानिंचा निभाव लागला नाही. या लढाईत राजा कुमानसिंहाचा पराभव झाला. तात्या टोपे तेथून निसटले परंतु माखल्यात आदिवासींच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पडला. शेवटी ती प्रेते बैलगाडीत भरुन गावामागच्या दरीत (खोर्यात) फेकण्यात आली तो भुतखोरा नावाने आजही प्रसिद्ध आहे.

राजा कुमानसिंहाच्या महालाचे अवशेष सध्याच्या रेस्टहाऊस च्या मागे पहावयास मिळतात. गावातील मंडळी कोरीव दगडांचा उपयोग गुरे बांधण्यासाठी करतात. त्यानंतर राजा भरतसिंहाकडे जहागीर आली. त्यानंतर राजा मदनमोहन सिंह यांचे कडे जहागीर आली तेंव्हा ब्रिटीश राजवटी तर्फे त्यांचे राज्य खालसा न करता त्यांचे कडे सारा वसुलीचे काम देण्यात आले. त्यांचा काही वर्षांपुर्वी देहांत झाला. शेवटापर्यंत ब्रिटिश राजवटी तर्फे त्यांना मानधन मिळत होते. स्वराज्यानंतर त्यांच्या कडे असलेली साडेतीन हजार एकर शेतजमीन सिलिंग मध्ये सरकार जमा करण्याचे आदेश आले त्या बदल्यात महीना बाराहजार रूपये वेतन सरकारने कबुल केले. परंतु संपूर्ण जमीन सरकारजमा न करता त्यांनी पिढ्यानपिढ्या त्यांच्या सोबत असलेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या नावाचे जमिनीचे पट्टे लिहुन दिले व सरकारी मानधन नाकारले. त्यांच्या नंतर जहागीरी राजा योगेंद्रसिह यांचे कडे आली.

सध्या ते धारणी जवळ सुसरदा येथे राहतात. सुसरदा येथील महाल सुध्दा बघण्यासारखा आहे. त्यांचे धाकटे बंधू राजा मानसिंह बऱ्हाणपूर येथे स्थायिक झाले आहेत. ही माहिती त्यांच्याच भाऊबंदकीतील श्री पद्मसिंह काकुसिंह पवार यांनी दिली. अजूनही राजघराण्याचा दबदबा कायम आहे. हरीसाल जवळील चिखली गावाच्या पश्चिमेस 7कि.मी. अंतरावर नांदुरी कारया नंतर कोट (जहागीर) गावाजवळ छोटेखानी टेकडीवर हा गढी वजा किल्ला आहे. या प्रदेशातील ही सर्वात उंच टेकडी असुन आजुबाजुची नांदुरी, कारा, कोट जांबु, लवादा, कोठा अशी सहा गावे स्पष्ट दिसतात.. टेकडी खालील सुखी नदीत बारमाही पाणी वाहते. त्यामुळे तेथील शेतकरी बारमाही उत्पन्न घेतात. नैसर्गिक व भौगोलिक दुरुषटीने संपन्न प्रदेशामध्ये किल्याची बांधनी केली आहे.

किल्ल्याला पुर्व आणि पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. ओबडधोबड दगडांनी बांधलेला परकोट जवळपास उध्वस्त झाला आहे. दोन्ही दरवाजा जवळील देवडया स्पष्ट दिसतात. मध्यभागी सर्वात उंच ठिकाणी भाजलेल्या चापट विटांनी भक्कम महाल बांधला आहे. छत पुर्णपणे कोसळले आहे. तरीही महालाच्या भव्यतेची कल्पना येते. खिडक्यांच्या काठाने महिरपीत सुबक कोरीवकाम केलेले आढळते. महालात अनेक दालने असुन तो बहुतेक दोन मजली असावा. वर जाण्याच्या दरवाजे व पायर्यांचे अवशेष शिल्लक आहेत. टेकडीवर पाण्याच्या विहिरी व टाक्याचे अवशेष आढळतात. मेळघाटातील अनेक घडामोडींचा साक्षीदार हा कारा कोट चा किल्ला आहे.

संदीप सरडे, अकोला.

Leave a Comment