कराडे खुर्द गढी –
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनीजवळ असलेल्या कराडे खुर्द या गावी पेशवेकालीन गढी, गारमाता मंदिर, पाताळगंगा नदीकाठी पाताळेश्वर मंदिर, नदीवरील घाट आणि तिथे असलेला शिलालेख असा ऐतिहासिक वारसा आहे.ह्या गढीचे बांधकाम पेशव्यांच्या काळातील म्हणजेच साधारण १८ व्या शतकातील आहे. कुलकर्णी घराण्याकडून ही गढी वैद्य परिवाराने विकत घेतल्याचें समजते.
गढीचे प्रवेशद्वार उध्वस्त झालेले आहे. चार बुरुजांपैकी तीन बुरूज भक्कम स्थितीत आहेत, तटबंदी आहे.जोत्याचे अवशेष आहेत पण झाडी वाढल्यामुळे काही पहाता येत नाही.गढीच्या पूर्वेच्या तटाला लागून दोन बांधीव विहिरी आहेत. बुरुजावरून पाणी घेण्याची पूर्वी सोय होती. तटबंदीलाच लागून ह्या विहिरी आहेत.
ह्या गावातील गारमाता मंदिर म्हणजे निसर्ग सौंदर्याचे वरदान होय. गावात प्रवेश करतानाच डाव्या हाताला एक तलाव आणि तलावाच्या पलीकडे असलेले सव्वाशे वर्ष जुने श्री गारमातेचे मंदिर आहे. कोकणच्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे कौलारू वास्तू. हाच आपला ग्रामीण बाज या मंदिराने अजूनही जपला आहे. गावची ग्रामदैवत असलेल्या श्री गारमातेचे हे मंदिर शके १८२३ म्हणजेच इ.स.१९०१ साली बांधलेले आहे.लाल रंगात रंगवलेले लाकडी खांब यामुळे मंदिर अंतर्बाह्य उठून दिसते. मंदिरात तांदळा स्वरूपातील श्री गारमाता स्थापन आहे.
टीम- पुढची मोहीम