कराडे कोट | सिद्धेश्वर मंदिर, गूळसुंदे –
रसायनी जवळील गुळसुंदे गावातील सिद्धेश्वर मंदिर या परिसरात अत्यंत प्रसिद्ध आहे. पाताळगंगा नदीतीरावर वसलेले हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर. या मंदिराचा दगडी घाट आणि अतिशय रम्य परिसर पाहून मन प्रसन्न होते. मंदिराच्या बांधणीवरून मंदिराचे प्राचीनत्व समजते.मंदिरातील घुमटाचे नक्षीकाम लक्ष वेधून घेतो.कराडे कोट | सिद्धेश्वर मंदिर, गूळसुंदे !
रसायनी पासून ३ किमी अंतरावर कराडे खुर्द गाव आहे.गावात प्रवेश करताच दोन बुरुज आपले स्वागत करतात.हाच कराडे चा भुईकोट.येथील भुईकोट गढीत जाण्याआधी गढीला लागूनच असलेली कुलुपी विहीर आणि गोलाकार विहीर असे दोन्ही ही नीट पाहून घेतले. कुलुपी विहिरीतले पाणी अजूनही वापरात आहे. येथून मग गढीत शिरल्यावर उध्वस्त वाड्याचे अवशेष पहावयास मिळाले. ही गढी चौकोनी आकाराची अजूनही तिच्या चारही बाजूंचे बुरुज अगदी चांगल्या स्थितीत आहेत. संपूर्ण गढी बघायला अर्धा तास पुरतो.
पेशवे काळातील राजे सरदार यांच्या ताब्यात असलेली ही गढी सध्या मात्र येथील एक वैद्य म्हणून कुणी आहेत त्यांच्या ताब्यात आहे. गढी संवर्धनाची प्रतीक्षा करीत इतिहासाची साक्ष देत अजूनही उभी आहे.पाताळ गंगा नदीतून पेशवे काळात इथे व्यापार चालायचा. त्यावर देखरेख करण्यासाठी ही गढी बांधलेली होती. पनवेल बंदरातून देखील इथे मालाची ने आण त्याकाळी होत होती. अतिशय समृद्ध असे हे ठिकाण आहे.
मात्र इथे जपवणूक केली तर हा समृद्ध वारसा पुढील पिढीस नक्कीच पहावयास मिळेल. येथूनच आम्ही पाताळ गंगा नदीवर बांधलेला मजबूत दगडी घाट आणि पलीकडचे सिद्धेश्वर मंदिर पाहिले.या ठिकाणी एक शिलालेख ही आढळतो.
मराठे शाहीच्या एका उत्कर्ष काळातील आठवणींच जणू अजूनही साक्षच देत भक्कमपणे उभे आहे हा वारसा!! हा संपूर्ण भाग, किल्ले कर्नाळा, किल्ले इर्शाल गड आणि किल्ले माणिकगडच्या मधोमध आहे. त्यामुळे हे तिन्ही किल्ले अगदी नजरेने सतत दिसत होतेच. मराठेशाहीच्या उत्कर्ष काळातील एक भक्कम बांधणी असलेला कोट आणि मंदिर मात्र लक्ष्यात राहण्याजोगाच आहे. अर्ध्या दिवसाची छोटेखानी भटकंती ने मात्र मन सुखावून गेले.
माहिती आभार- Kiran Shelar