महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,49,169

करमाळा भुईकोट

By Discover Maharashtra Views: 4269 5 Min Read

करमाळा भुईकोट

 पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १२५ कि.मी.वर भिगवणला करमाळा फाटा लागतो. तिथून ६० कि.मी.वर करमाळा हे तालुक्याचं ठिकाण असलेल गाव आहे. या गावात लोकांना फारसा माहीत नसणारा व दुर्लक्षित असा करमाळा भुईकोट आहे. सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने ऐतिहासिकदृष्टीने करमाळा किल्ल्याला खूप महत्व होते.

हैदराबादच्या निजामाचे सरदार रावरंभा निंबाळकर यांच्याकडे असलेल्या जहागिरीत बीड, उस्मानाबाद, जामखेड, खर्डा, भूम, कर्जत, करमाळा या प्रदेशांचा समावेश होता. करमाळा शहर म्हणजे रंभाजीराव निंबाळकर यांच्या जहागिरीमधील मुख्य गाव होय. सूफी संत करमेमौला हे करमाळा येथे वास्तव्य करून होते. या सूफी संताच्या करमेमौला या नावावरून या गावाला करमाळा नाव पडले असे सांगितले जाते. रंभाजीराव उर्फ रावरंभा हे तुळजापूरच्या तुळजा भवानीचे परमभक्त होते. या आदिशक्तीचे एक भव्य मंदिर उभारण्याचे ठरवुन करमाळा गावाच्या पूर्वेस रावरंभाराव व त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी इ.स. १७२७ -१७३०च्या दरम्यान कमलाभवानी मंदिर व या मंदिराबरोबर करमाळा भुईकोट बांधला. दक्षिणोत्तर असलेला अंडाकृती आकाराचा हा किल्ला १५ एकरवर पसरलेला असुन या गडाच्या तटबंदीत गोलाकार एकोणीस व मुख्य दरवाजा शेजारी अष्टकोनी दोन असे एकूण एकवीस बुरूज आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर व तटावर विटांनी बांधलेल्या सुंदर चर्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीने संपुर्ण गावाला आपल्या कवेत घेतले आहे पण किल्ल्यात असलेल्या गावानेच या किल्ल्याचा घास घेतला असुन आत वाढत असलेल्या वस्तीने किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे.

किल्ल्याचे दगड घरांच्या बांधकामासाठी वापरले गेले असुन गावाचा आकार वाढतच असल्यामुळे किल्ल्याचे अवशेष अतिक्रमणात लुप्त होत चालले आहेत. किल्ल्याच्या तटबंदीची मोठया प्रमाणात पडझड झाली असल्याने तटबंदीवरुन सलगपणे फिरता येत नाही व तटबंदीच्या कडेने फेरी मारावी लागते. बाहेरून पाहताना किल्ल्याचे बुरुज जरी भक्कम वाटत असले तरी आत मात्र तटबंदी आणि बुरुज पोखरलेले आहेत. किल्ला नीटपणे पाहायचा झाल्यास स्थानिक लोक वेस म्हणुन ज्या भागाला ओळखतात तेथुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. वेशीतील पूर्वेकडील दरवाजाने किल्ल्यात शिरताना उजव्या हाताने थोडेसे पुढे गेल्यास एक दगडी बांधकामाची भिंतीत नक्षीदार कोनाडे असलेली पुष्कर्णी दिसुन येते. हि पुष्कर्णी पाहून परत आल्यावर किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीत असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. आत शिरल्यावर समोरच वेशीवरील मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ काही उध्वस्त प्राचीन मुर्त्या, भग्न वीरगळ आणि सतीच्या दोन शिळा पहायला मिळतात.

मारुती मंदिराच्या समोरच किल्ल्याचे दगडात बांधलेले उत्तराभिमुख प्रवेशव्दार असून त्याच्या वरील बाजुस तोफेच्या मारगिरीसाठी वीटांनी बांधलेले ३ झरोके आहेत. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि त्यावरील लोखण्डी खिळे आजही शिल्लक असुन प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या या भागाला अधिक संरक्षण मिळावे यासाठी येथे मुख्य कोटाबाहेर परकोटाची रचना केलेली आहे. या परकोटात उजव्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे (खोलेश्वर) मंदिर पाहावयास मिळते. यातील ब्रम्हाच्या मंदिराचे मस्जिदमध्ये रुपांतर झालेले असुन विष्णुमंदीर अलीकडील काळातील तर शिवमंदीर मध्ययुगीन आहे. या परकोटाच्या बाहेरील बाजुस बांधीव खंदक असुन सध्या त्याचे रुपांतर सांडपाण्याच्या नाल्यात झाले आहे. पुर्वी संपुर्ण किल्ल्यालाच खंदक असावा पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. किल्ल्याच्या या बाजुचा बाहेरील रस्ता खंदक रोड म्हणुन ओळखला जातो.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे ध्वजस्तंभ असुन खुप मोठया प्रमाणात झुडुपे वाढलेली आहे. या भागातुन किल्ल्यात वसलेले गाव पसरलेली तटबंदी आणि बुरुज दिसतात. किल्ल्याचे बहुतेक अवशेष तटबंदी शेजारी असल्याने फक्त तटबंदी वरून फेरफटका मारून देखील किल्ला पहाता आला असता पण अनेक ठिकाणी तटबंदी ढासळलेली असल्याने ते शक्य होत नाही. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला चालत गेल्यावर एक मोठी बांधिव बारव आहे. या बारवमध्ये उतरण्यासाठी दोन बाजूने पायऱ्या असुन काठावर कमानी असलेला छोटेखानी महाल आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी पाण्याशेजारी जमिनीखाली हा महाल बांधला गेला असावा. या महालातून जानोजीरावांच्या महालात जाण्यासाठी भुमिगत रस्ता असल्याचे सांगितले जाते. सध्या या बारवचा उपयोग कचरा टाकण्यासाठी व गणेश विसर्जनासाठी केला जातो.या बारवच्या उजव्या बाजुला तटबंदीलगत एक पिराची कबर आहे.

बारव पाहून रस्त्याने पुढे चालत गेल्यावर रावरंभा निंबाळकर यांनी बांधलेला राजवाडा असून सध्या इथे कोर्टाची इमारत इतर सरकारी कार्यालय आहेत. आयताकृती आकाराच्या या राजवाडयात मध्यभागी असलेल्या अंगणात एक विहिर आहे. वाडयाच्या मागील बाजूस बाहेर जाण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. इथुन पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाच्या तटबंदीत असलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. याठिकाणी दुहेरी तटबंदी असुन बाहेरील तटबंदीत असणारा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. दरवाजातून बाहेर पडून तटबंदीच्या कडेकडेने चालताना आपल्याला खंदकात असलेली विहिर तसेच एक चोर दरवाजा दिसतो.किल्ल्यात असणारी वस्ती आणि घाण यामुळे बाकीचे किल्ल्याचे अवशेष पाहाण्यासाठी तटबंदी व बुरुजाच्या कडेकडेने फ़िरावे लागते. यातील बऱ्याच बुरुजांच्या आतील भागात खोल्या असुन बुरुजावर जाण्यासाठी अंतर्गत जिने आहेत. किल्ला पूर्ण पाहायला एक ते दीड तास पुरेसा आहे. करमाळा किल्ल्याव्यतिरिक्त गावात कमलाभवानी मंदिर, बारव आणि समाध्या पाहाण्यासारख्या आहेत.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment