महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,073

करंजी : एक दिव्य दुर्लक्षित इतिहास…

By Discover Maharashtra Views: 166 3 Min Read

करंजी : एक दिव्य दुर्लक्षित इतिहास…

मित्रांनो मालेगाव तालुक्यात मालेगाव(जहागीर) येथून अमानिमार्गाने पुढे गेल्यास दहा किलोमीटर अंतरावर करंजी हे लहानसे गाव आहे. या गावामध्ये करूनेश्वराचे शिव मंदिर आहे. मंदिराच्या समोर काही मूर्ती शिळा असल्याचे येथील स्थानिक व आपल्या ग्रुपचे (।।फक्तइतिहास।।) सदस्य श्री नितीन लहाने यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आणि त्या निमित्ताने काल(७ मे) करंजी येथे जाणे झाले. गावामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूस करणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणात काही मूर्ती शिळा ठेवलेल्या आहेत. बारकाईने बघितल्यावर ती मूर्तीशिल्पे प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या एका भव्य शिव मंदिराच्या द्वार शाखेचा भाग असावा असे अनुमान काढता येते.

प्रस्तुत शिल्पे ही बहुतांश शिवाच्या शैव द्वारपालांची आहेत असे वाटते. या शिल्पांच्या वरील भागात सुंदर कीर्तीमुख कोरलेले आहे. शैव द्वारपाल हे चतुर्भुज आहेत. हातामध्ये खटवांग/कपाल, गदा आणि डमरू अशी आहेत.
दुसरा द्वारपाल चतुर्भुज असून हातात त्रिशूल, गदा, डावा हात वरदमुद्रेत आणि हातात नाग आहे. दोन्ही द्वारपाल जटा मुकुट, कर्ण आभूषणे, कंठहार, मुंडमाळ धारण केलेले दिसतात. त्यांची आभूषणे अतिशय सुंदर आणि सुबक आहेत. याशिवाय दोन शिल्प निधीचे आहेत. सुंदर आभूषणे आणि वस्त्रालंकाराने आभूषित अशी ही दोन शिल्प आहेत. हातात मुंगसाची पिशवी आहे. निधी अर्थात कुबेराच्या कोशाचे मूर्त रूप ज्याचे नऊ प्रकार पडतात. याशिवाय शिळेच्या कोपऱ्यात हातात कलशधारी स्त्रीदेवता जया/ नदी देवता असावी. त्यांची कर्णभूषणे अतिशय सुबक आहेत. बाजूबंद तसेच गळ्यातील व कमरेचे अलंकार स्पष्ट दिसतात.
आज अस्तित्वात असलेले मंदिर सिमेंटने बांधलेले असले तरीही या मंदिराच्या द्वाराच्या पायथ्याशी चंद्रशिळा आणि कीर्ती मुखे ही जुन्या मंदिराची लावलेली दिसतात. तसेच द्वाराच्या वर गणेशपट्टी सुद्धा पूर्वीच्या मंदिराची लावलेली दिसते.

या मंदिराच्या समोर पूर्वी बारव असल्याचे लोक सांगतात तसेच मागील बाजूस भव्य तलाव असल्याचे सुद्धा बोलतात. अर्थात एकेकाळी जिथे तत्कालीन राज व्यवस्थेद्वारे प्रचंड राजकोष खर्च करून आणि भूशास्त्राचा अचूक अभ्यास करून नामांकित स्थपतीच्या मदतीने प्रशस्त आणि सुंदर देवालय, तलाव आणि बारव बांधल्याचे अनुमान काढता येते. किमान मूर्ती शिल्पाच्या अंगावरील, गळ्यातील व कटी वरील सुबक रेखीव मोती अलंकार पाहिल्यावर मंदिराच्या सुंदरतेची कल्पना येते. तसेच उत्कृष्ट मूर्ती शिल्पे यांचा कालखंड यादवांच्या सुरुवातीचा किंवा चालुक्यांचा अखेर कालखंड असावा असे वाटते. अर्थात शिल्पसौंदर्यावरून येथे प्राचीन काळी देवालय असल्याचे अनुमान काढता येते. तसेच शैवद्वारपालांवरून मंदिर शिवाचे असावे असे अनुमान काढता येते. गावामध्ये मारुतीच्या मंदिराचा पाया बहुतांश बारावीच्या दगडांनीच निर्माण झाला असावा. तसेच परिसरात स्तंभाचे तळखडे दिसतात. एकूणच मंदिराच्या भव्य दिव्यतेची कल्पना करता येते.

असो, मालेगाव तालुक्यात कधीकाळी सुंदर शिवालय होते हा तर दिव्य इतिहासच आहे.! ज्याची नोंद कदाचित कुठेच न मिळावी पण साक्षीदार प्रांगणात खडे आहेत- शैव द्वारपाल बनून.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Leave a Comment