महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,65,478

करंजांची खूप मजेदार कातणी भाग २ | Karanji Cutter

By Discover Maharashtra Views: 3620 3 Min Read

करंजांची खूप मजेदार कातणी भाग २ | Karanji Cutter

माझ्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या दिव्यांचा आणि विविध वस्तूंचा संग्रह आहे. त्यापैकी करंजांच्या कांही कातण्यांवर मी एक ” करंजांचा ब्युटीशियन “हा छोटासा लेख लिहून त्या कातण्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यावेळी असे वाटत होते की मला जरी हे जुन्या वस्तू जमविण्याचे वेड असले तरी ते इतरांना कितपत आवडेल ? … पण ही छायाचित्रे आणि हा लेख फेसबुकवर / ईमेलवर अक्षरश: हजारो लोकांना आवडला. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. बाहेरच्या देशातून, अमेरिका, इंग्लंड पासून दुबई, इस्रायल पर्यंत अक्षरश: हजारो मंडळींनी कौतुक तर केलेच पण आम्हालाही यातील काही कातणी तरी मिळवून द्या, असा आग्रह धरला. अशा प्रतिसादामुळे मला जरा धीर आला – हुरूप वाढला. यावर्षी माझ्या या संग्रहवेडाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

या निमित्ताने मी माझ्या अगदी खास ठेवणीतील मजेदार कातण्यांची आज तुम्हाला माहिती करून देत आहे.
यातील पहिलेच कातणे म्हणजे कोंबड्याच्या तुऱ्याच्या जागी चक्र बसवलेले सुंदर कातणे आहे. कोंबडा हातात धरून करंजी कातायची. दुसरे कातणे म्हणजे जणू कंपासपेटीतील कंपासच ! आपण सर्वांनीच भूमितीत वापरला जाणारा कंपासपेटीतील कंपास वापरून अर्धवर्तुळ काढले असेल. करंजीच्या सारण भरलेल्या पोटाच्या कडेला मधोमध कमळाचे टोक ठेवायचे. कापायच्या असलेल्या कडेवरून कातण्याचे चक्र अर्धगोलाकार फिरवायचे असे हे अगदी वेगळे कातणे आहे. नंतरच्या छायाचित्रातील जोड कातण्यांची गाडी ही शंकरपाळे किंवा पोह्याच्या पापडाची मिरगुंडे कातण्यासाठी आहे. याच्या साहाय्याने शंकरपाळे आणि मिरगुंडे उभी – आडवी कापणे अधिक सुलभ जाते.

ही सर्व कातणी खूप जुनी तर आहेतच पण आता दुर्मिळही झाली आहेत. परंतु सायकलचे कातणे म्हणजे अगदी मॉडर्न कातणे आहे. या सायकलीच्या दोन्ही चाकांना दाते नसून खूप चांगली विळीसारखी धार आहे. याने शंकरपाळे कापणे शक्य असले तरी हे त्यासाठी नाही तर पिझासाठी आहे. ही ‘ सायकल ‘ उभी करायला एक छोटासा स्टॅन्डही आहे. पुण्याच्या तुळशीबागेत ही सायकल आजही उपलब्ध आहे.

करंजी कापतानासुद्धा थोडे सूर ऐकू अशा हेतूने एका कातण्याला घुंगुर लावलेले आहेत. तर दुसऱ्या एका कातण्याला, कातलेली करंजी किंवा पुरी हलकेच तळणीत टाकण्यासाठी जोडलेला चिमटा आहे. तीन कातण्याचा सेटही वैशिष्ठयपूर्ण आहे. ही तिन्ही कातणी चांगलीच वजनदार आहेत आणि त्यांचे दातेही खूप वेगवेगळे आहेत. त्यापैकी एका कातण्याच्या दात्यांचा आकार खूप मोठा आहे. लग्न आणि मुंजीला रुखवतात पूर्वी मोठाल्या करंजा करीत असत. त्यासाठी हे कातणे वापरले जात असावे. पूर्वी लहान मुलांसाठी, काठीच्या एका टोकाला पत्र्याच्या डब्याचे झाकण एका खिळ्यामध्ये ठोकून गाडी बनविली जात असे. अनेकांनी लहानपणी ही गाडी पळवत नेण्याचा खेळ खेळला असेल. यातील एक कातणे चक्क या खेळाची आठवण करून देणारे आहे.

सर्वात शेवटची करंजांची पर्स आपण नक्कीच पाहिलेली असेल, वापरलीही असेल. ही पर्स उघडून त्यावर करंजीसाठी लाटलेली पुरी पसरायची. खोलगटभागात सारण भरून पर्स बंद केली की करंजी तयार ! करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. बहीणभावाचे नाते अधोरेखित करणारी अशी ही प्रथा आहे.
दसरा झाला की दिवाळीचे आणि पर्यायाने फराळाचे वेध लागतात. त्याची तयारी करण्याआधी ही थोडी जुन्या काळात नेणारी वेगळी माहिती आपल्याला वाचायला नक्कीच आवडेल.





माहिती साभार – Makarand Karandikar

Leave a comment