महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,450

तीन खाड्यांचा संगम, करजुवे

By Discover Maharashtra Views: 1514 3 Min Read

तीन खाड्यांचा संगम, करजुवे..!!

कोकणची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आपल्या भटकंतीमध्ये आपल्याला अनेकदा विविध नद्या, खाड्या आडव्या येत असतात. अनेकठिकाणी आता या नद्यांवर पूल बांधलेले आहेत, तर अनेक ठिकाणी अजूनही या काठावरून पलीकडे जाण्यासाठी होडीचा वापर होतो. या होडीला ‘तर’ असे म्हणतात. अतिशय माफक दरात या तरीतून आपण पलीकडच्या काठावरील गावात जाऊ शकतो. करजुवे या गावची तर विविध गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे. म्हणजे इथे समोर असलेल्या भातगावला जाता येते हा झाला एक भाग. पण करजुवेगावाचे स्थान अगदी मोक्याचे असे असल्यामुळे इथल्या नौकाविहाराला जास्त महत्त्व प्राप्त होते. संगमेश्वरहून करजुवेइथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग संगमेश्वर-धामणी-तुरळ-गोळवली मावळंगे तिठा-धामापूर-आरवली डिंगणी तिठा मार्गे करजुवेला जातो. हे अंतर ३२ कि.मी. इतके आहे. दुसरा रस्ता संगमेश्वर आसुर्डे डिंगणी पूल-पिरंदवणे-करजुवे असा आहे. हे अंतर सुद्धा अंदाजे ३५ कि.मी. आहे.(तीन खाड्यांचा संगम, करजुवे)

आपण अनेकदा तीन नद्यांचा संगम झालेला पाहतो. त्याला त्रिवेणी संगम असेही संबोधले जाते. धार्मिकदृष्ट्या देखील या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व आहे. पण करजुवे इथे तीन खाड्यांचा संगम झालेला आहे. खाडी म्हणजे खरेतर नदीच असते. मात्र समुद्राच्या जवळ गेल्यावर त्या नदीचे पाणी गोड रहात नाही तर त्यात समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळल्यामुळे ते खारे झालेले असते. त्यामुळे त्या नदीला पुढे खाडी असे म्हटले जाते. करजुवे इथून समुद्र जवळ असल्यामुळे इथे असलेल्या तीन खाड्या महत्त्वाच्या ठरतात. अबलोली वरुण येणारी कापशी नदी आणि आरवली वरुण येणारी गड नदी यांचा संगम करजुवे इथे होतो, आणि लगेचच पुढे या दोन्ही नद्या मिळून संगमेश्वरवरुण येणाऱ्या शास्त्री नदीला मिळतात. पुढे ही शास्त्री नदी जयगडपाशी समुद्राला जाऊन मिळते. तिथे तिला जयगडची खाडी म्हटलेले आहे.

तीन खाड्यांचा हा अनोखा संगम आपल्याला करजुवे इथे बघायला मिळतो. करजुवे हे ठिकाण अत्यंत शांत-निवांत असे आहे. कसलाही आवाज नाही. समोर खाडीचे निवळशंख पाणी, त्यात असलेले विविध मासे, क्वचित एखादी होडी इकडून तिकडे चाललेली असे हे सगळे रमणीय दृश्य असते. इथल्या तरीवर उभे राहिले की आपल्या चारही बाजूंनी डोंगराचा गराडा पडलेला दिसतो. इथले अजून एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे आपण चार तालुक्यांच्या सीमेवर उभे असतो.

करजुवेपाशी गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि संगमेश्वर हे चार तालुके एकत्र येतात. तीन खाड्या आणि चार तालुक्यांच्या संगमावर असलेले हे आगळेवेगळे ठिकाण करजुवे आपल्या भटकंतीमध्ये अवश्य समाविष्ट करून घ्यायला हवे. ‘संतोष महांकाळ’ हे इथल्या होडीवाल्याचे नाव. तो इथेच असतो. इथे नसला तर समोरच्या तीरावर तो असतो. करजुवे तरीवरून आपल्याला होडीतून चांगला मोठा फेरफटका मारायचा असेल तर भातगावच्या पुलापर्यंत आपण या होडीतून जाऊ शकतो. कुठलाही गडबड गोंगाट नसलेल्या या ठिकाणी होडीतून केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय होते.

तीन खाड्यांच्या आणि चार तालुक्यांच्या संगमाचा हा करजुवे परिसर शांत-निवांत आहे. इथली शांतता, इथले सौंदर्य तसेच अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे याचे भान मात्र असायला हवे. इथे निसर्गाने भरभरून दिलेले आहे. त्याचा शांतपणे आस्वाद घेणे हेच आपल्या भटकंतीचे फलित म्हणावे लागेल.

आशुतोष बापट

Leave a Comment