कार्ले लेणी | Karla Caves –
लोणावळ्यापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर आणि मळवली रेल्वेस्थानकापासून ९ कि.मी. अंतरावर कार्ले येथील प्राचीन लेणी आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील म्हणजेच सातवाहन काळातील हीनयान बौद्ध लेणीकलेचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे कार्ले लेणी (Karla Caves).
या लेणीसमूहामध्ये १ चैत्यगृह, १५ विहार आणि काही पाण्याच्या टाक्या आहेत. यातील विहारांची रचना हि अनेक ठिकाणी एकमजली व दुमजली अशी आहे. दुमजली विहारांवर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. विहारांना छोटेसे प्रवेशदार, दगडी बाक, धान्य साठविण्याची जागा व काहींना खिडक्या आहेत. चैत्यगृहात जाताना सर्वांत प्रथम सिंहस्तंभ दिसतो. कार्ले लेण्याचा सिंहस्तंभ वैशिष्ट्यपूर्ण आहे. तब्बल १३.५ मी. उंचीचा एकसंध पाषाणाचा, वर्तुळाकृती बैठकीचा, षटकोनी स्तंभ, त्यावर वाटोळा कंगोरेदार कळस, त्यावर चौकोनी हर्मिका आणि हर्मिकेला पाठ लावून बसलेले सिंह ही सारी रचना महारथी अग्निमित्राने करवून घेतली आहे, असा शिलालेख तिथे ब्राह्मी भाषेत कोरलेला आहे.
या सिंहस्तंभाच्या पुढे चैत्यगृहाचा व्हरांडा आहे.तिथे पिंपळाच्या पानाच्या आकाराची कमान आहे. या व्हरांड्यात अनेक मिथुन युगुलांच्या जोड्या सुबकरीत्या कोरलेल्या दिसतात. यातील स्त्री- प्रतिमा कमनीय, आकर्षक, तर पुरुष मजबूत दिसतात. स्त्रियांच्या डोक्यावर पदर व कमरेला शेला असून, पुरुषांनी धोतर व डोक्यावर मुंडासे बांधलेले आहेत. स्त्रियांच्या अंगावर आभूषणे आहेत. याच व्हरांड्यात तळाशी ३ मोठे हत्ती कोरले आहेत. या हत्तींवर बुद्धाच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. व्हरांड्यातील दोन्ही बाजूंच्या भिंतीवर छतापर्यंत नक्षीकाम केलेले आहे. याच्या पुढे मुख्य चैत्यगृह आहे. कार्ले लेण्यातील चैत्यगृह हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे खोदीव दालन असावे. याच्या छताकडील भागात लावलेल्या सागवानी तुळया किंवा फासळ्या गेली २००० वर्षे न कुजता राहिल्या आहेत. त्यावर नेमकी कोणती रासायनिक प्रक्रिया केली गेली, याचा उलगडा अजूनपर्यंत तरी झालेला नाही.
चैत्यगृहात ३७ अष्टकोनी खांब आहेत. या खांबांची रचना खाली वर्तुळाकार बैठक वर अष्टकोनी खांब त्यावर उलटे कमळ, हर्मिका व त्यावर मिथुन शिल्प अशी आहे. यांतील अनेक खांबांवर ब्राह्मी भाषेत कोरलेले शिलालेख आहेत. ज्या व्यक्तींनी हे खांब घडवण्यासाठी दान दिले, त्यांच्या नावाचा व गावाचा उल्लेख या शिलालेखात केलेला आहे. अजंठा लेण्यांमध्ये जशी रंगीत भित्तिचित्रे आहेत, तशीच चित्रे कार्ल्याच्या चैत्यगृहात मागील बाजूस आहेत. या चित्रांचे संवर्धन न झाल्यामुळे ही चित्रे आता अखेरच्या घटका मोजत आहेत. काही तर अगदी पुसटशी दिसतात, यातले एक बुद्धचित्र मात्र ओळखता येते. चैत्यगृहातील व्हरांड्यातच खाली एका भिंतीवर कोरलेला एक शिलालेख या लेण्यांविषयी अगदी समर्पक भाष्य करतो;
“वैजयंततितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम जंबुद्विपम्ही उतमम”
या शिलालेखाचा अर्थ असा की, ‘वैजयंती गावचा हा भूतपाल असे सांगतो की, हे लेणे जम्बुद्विपात म्हणजेच संपूर्ण भारतवर्षात उत्तम, अद्वितीय असे आहे.’
तळाचा पेटारा, मधला गाभारा अन् वरचा नगारा यांचा उत्कृष्ट समतोल इथल्या स्तूपात साधलेला आहे. हे चैत्यगृह ३७.८ मी. लांब, १३.९ मी. रुंद अन् १४ मी. उंचीचं आहे. चैत्यगृहाच्या दक्षिणेत असणाऱ्या मोठ्या विहारातील मागच्या भिंतीत एक कमलासनस्थ बुद्धमूर्ती आहे. त्या कमळाखाली दोन हरणांमध्ये चक्र आहे.
या लेण्याच्याच परिसरात श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील विविध समाजांचे हे श्रद्धास्थान आहे. या देवीची स्थापना येथे कशी झाली. याबद्दल निश्चित स्वरूपात माहिती उपलब्ध नाही.
संदर्भ:
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या … – प्र. के. घाणेकर
महाराष्ट्रातील प्राचीन लेणी – ओंकार वर्तले
आडवाटेवारचा महाराष्ट्र – प्र. के. घाणेकर
पत्ता : https://goo.gl/maps/EVBMXoTNuACLfCoY8
आठवणी इतिहासाच्या