कर्मवीर भाऊराव पाटील…
जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करून ज्ञानाचा दिवा घराघरांत प्रज्वलित करणा-या आणि स्वातंत्र्यचळवळीस आधारवड ठरलेल्या रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणा-या डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज जन्मदिवस २२ सप्टेंबर १८८७* रोजी कुंभोज (कोल्हापूर) गावी भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाजमनावर केले.
शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रूढिवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचे निर्दालन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती. त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होते. ‘प्रत्येक खेडय़ात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारा आणि ते प्रत्यक्षात उतरविणारा हा कर्मवीर अण्णांचा व फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे अनेक वर्षांपासून स्नेहसंबंध होते.अण्णांच्या कार्याचे राजांना भारी कौतुक वाटे.ता.3 डिसेंबर 1939 रोजी बडोद्याचे युवराज श्रीमंत प्रतापसिंह महाराज सातार्यात आले होते.त्यांचे अण्णांनी जंगी स्वागत केले होते.त्यावेळी फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे खास उपस्थित होते.कर्मवीर संस्थेतर्फे महाराज सयाजीराव मुक्तनिवासी विद्यालय जून 1947 पासून सुरू करण्याची घोषणा केली. सदर हायस्कूलला इमारत नव्हती म्हणून अण्णांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन आपली अडचण सांगितली.राजेसाहेबांनी सातारा येथील कलेक्टर बंगल्याच्या पिछाडीस असलेला आपला फलटण लाॅज हा बंगला ,भोवतालची 8 ते 9 एकरांच्या आवारासह ,रयतशिक्षण संस्थेस बक्षिसपत्राने दिला.याच फलटण लाॅजमध्ये जून 1947 पासून सयाजीराव हायस्कूल सुरु झाले. या वास्तूत जयप्रकाश नारायण आले होते. “येथे कर्मवीर भाऊरावांनी समाज- वादाचा खराखुरा प्रयोग सुरू केला.
*स्वातंत्र्यचळवळीसाठी हजारो कार्यकर्ते तयार करणारा हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते.
महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वस्तीगृहामध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला.
भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे.
इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.
कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थान चे राजे राजर्षी शाहू महाराज होते. भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ ‘युनियन बोर्डींग’ ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये ‘महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.
एकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कर्मवीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्व:त जवळ बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूर ला नेऊन ‘मिस क्लार्क होस्टेल’ला दाखल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या ‘मूकनायक’वर्तमान पत्राचे ते काही काल संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आईने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.अण्णा हायस्कूला असताना होते.
पुढील काळात कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ केले.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे. मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण, बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली.
२५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा “कर्मवीर “ही ऊपाधी देऊन गौरव केला. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे