महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,030

करवीर

By Discover Maharashtra Views: 1357 3 Min Read

करवीर –

एक वैभवशाली नगरी, करवीर. बरेच राजे त्यांच्या राजवटी ईथं नांदलेल्या या मातीनं पाहिलंय. आजही ईथला कानाकोपरा ऐतिहासिक स्पर्शाचा दाखला देतो. हाच स्पर्श आणि ईथं नांदलेली संस्कृती आजही आपल्याला दिसून येते, ती ईथल्या देवळांमधून, नाण्यांमधून आणि खास करून तळ्यांमधून. करवीरला तळ्यांची नगरी म्हणूनही ओळखलं जातं. कुठल्याही शहराला लाभली नसतील एवढी तळी ईथं आजही पहायला मिळतात. आणि म्हणूनच कित्येक शतकांपासून धरतीच्या पोटात गडप झालेलं असंच एक तळं आज मी तुम्हाला सांगतोय.

कोल्हापूरच्या पश्चिमेला बरीच छोटी-मोठी खेडी वसलेली आहेत. त्यातलंच शहरापासून अवघ्या १२-१३ किमी वर असलेलं वाकरे हे गाव. याच गावात बारव शिल्पाचा सुमारे बाराव्या शतकाच्या आसपासचा एक प्राचीन, भव्य आणि उत्कृष्ठ असा तळ्याचा नमुना नुकताच समोर आला आहे. शिलाहारांनंतर ईथं आलेल्या सिंघनदेव यादवांच्या काळातील याची निर्मीती असण्याची शक्यता आहे. यामागचं कारण असं, शिलाहारांच्या काळात घडलेली देवळं, विहीरी, तलाव, गडकोट हे सारं काळ्या पाषाणातून उदयास आलेल्या वास्तू आहेत. पण, नुकतंच सापडलेलं तळं पूर्णपणे जांभ्या खडकांत जन्माला घातलेलं आहे. इ. स. सुमारे १००० पासून ईथं नांदलेल्या शिलाहारांपैकी शेवटच्या भोज दुसऱ्या शिलाहाराने १२१२ पर्यंत ईथली राजसत्ता चालवली. नंतर देवगिरीच्या यादवांच्या आक्रमणानंतर १२१२ ला शिलाहारांचं राज्य खालसा झालं. यानंतर दुसरा सिंघनदेव याने (जवळपास १२१८-१२४०) करवीर राज्य केलं. आणि याच्या काळात जी नवनिर्मीती झाली, त्यातलीच हि एक निर्मीती असावी असा अंदाज व्यक्त होतोय.

गावातल्या सौरप्रकल्पाच्या कामासाठी गावाबाहेरील पडीक जागेवर जेसीबीच्या सहाय्याने सफाईचं काम सुरू असताना मशिनला खोदकामात एकाठिकाणी दगड लागले. सुरवातीला काही दगड फुटले. पण, नंतर एका सरळ रेषेत खाली-वर आकारात सलगपणे हे दगड असून ईथं काहीतरी वेगळं आहे. असं गावकऱ्यांच्या लक्षात आलं. तेव्हा जेसीबी बंद करून हातांनी ईथलं काम सुरू झालं. आणि मग हळूहळू बघता बघता कित्येक शतकं जमिनीत बुजलेला हा देखणा अविष्कार एकाबाजूने वर आला. फार पूर्वी ईथं एक तळं होतं एवढंच गावकऱ्यांना ऐकून माहित होतं. पण हे तळं ईतकं प्रमाणबद्ध बांधणीचं आणि उत्कृष्ठ बांधकाम शैलीचं असेल असं त्यांना किचिंतही वाटलं नव्हतं. जवळपास दिड एकरात पसरेलेलं हे तळं चहूबाजूंनी जांभ्या दगडी पायऱ्यांनी एखाद्या पुष्करणी प्रमाणे बांधीव आहे. बाजूला थोडसं वर सुरेख दगडी घाट आहे. चारही बाजूला पायऱ्यांच्या खालच्या बाजूला मोऱ्या काढलेल्या आहेत. या तळ्याने गावकऱ्यांना आपल्या पोट्यातल्या गाळासोबत इंग्रजांच्या काळातील काही नाणी, चांदीचं नाणं, भोकाचा पैसा, जुनी फुटलेली मडकी याचबरोबर लाकडी घान्याचे काही अवशेषही दिले आहेत.

आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. पण या साऱ्यांपेक्षा देखणेपणा आणि बांधीव पायऱ्यांची श्रीमंती लाभलेल्या या अशा वास्तूंचा डौलच काही वेगळा असतो. गावातील तरूण तसेच काही वयस्कर लोकांच्या श्रमातून हे तळं लवकरच मोकळा श्वास घेत परत मोठ्या दिमाखात लवकरच सर्वांसमोर येईल आणि या करवीर नगरीच्या जुन्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक दिमाखदार तुरा नक्कीच रोवेल..!!

© विकास भोसले

Leave a Comment